Home संपादकीय विशेष लेख साधना, साध्य आणि साधक

साधना, साध्य आणि साधक

0

महाराष्ट्रातील पाच शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना आतापर्यंत महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले सर्व सनातन किंवा त्यांच्या सहयोगी संस्थांचे साधक आहेत. सनातनचे सर्व प्रवक्ते हे छातीठोकपणे आमची संस्था ही केवळ आध्यात्मिक असल्याचे सांगत आहेत. तर, ज्यांना अटक केली होती, ते आमचे अगोदर साधक होते, मात्र त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे सांगत आहेत. म्हणजे ज्या तरुणांनी सनातनची विचारधारा स्वीकारून धोकादायक काम केले आणि तुरुंगात गेले, त्यांना आता संस्था वा-यावर सोडीत आहे. हा ख-या अर्थाने यापुढे या संस्थेशी संबंध ठेवणा-यांसाठी बोलका इशारा आहे. दरम्यान, सनातनवरील बंदीबाबत जे राजकीय नेत्यांचे उलटसुलट वक्तव्य येत आहेत, ते अजूनहीच संभ्रम निर्माण करणारे आहे.

आध्यात्मिक संस्था म्हणून सनातन संस्था उदयास आली. सुरुवातीला काही दिवस सनातनच्या टोप्या घातलेल्या महिला सकाळी-सकाळी प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या बाहेर ‘सनातन प्रभात’ या दैनिकाचे अंक विकताना दिसत होत्या. सनातनचे साधक संध्याकाळी एखाद्या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायचे. तिथल्या कीर्तनकाराला भेटून आपल्या संस्थेची माहिती द्यायचे. अनेकदा कीर्तनात आपल्याला पाच-दहा मिनिटे बोलू द्यावे, असा आग्रह करायचे. झब्बा-पायजमा असा भारतीय धाटणीचा पेहराव, कपाळावर ठसठशीत टीळा, अशा सात्त्विकतेचे दर्शन त्यातून घडायचे. कीर्तनकार आणि हरिनाम सप्ताहाच्या आयोजकांशी जवळीक वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. गुरुपौर्णिमेला अनेकदा कीर्तनकारांना प्रवचनालाही बोलाविले जायचे. (मीही काही गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रवचनासाठी गेलो आहे). ठाणे येथे गडकरी रंगायतन नाटय़गृहाच्या पार्किंगमध्ये ४ जून २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सात जण जखमी झाले होते. या प्रकरणात सनातनचे साधक विक्रम भावे आणि रमेश गडकरी यांना अटक झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा बॉम्बस्फोट सनातनच्या साधकांनी का केला, तर हे नाटक हिंदू धर्माच्या विरोधात आहे, असा त्यांचा आरोप होता. त्यानंतर ही केवळ आध्यात्मिक संस्था नाही, तर यांचा अजेंडा काही तरी वेगळा आहे, याचा संशय येऊ लागला. १६ ऑक्टोबर २००९ ला गोव्यातल्या मडगाव येथे बॉम्बची जुळवाजुळव करताना सनातनचे साधक मलगोंडा पाटील यांचा मृत्यू झाला. जेव्हा गडकरी रंगायतनमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर सांगलीमध्ये दंगल झाली, त्यावेळी पाटील याचे नाव एटीएसच्या रडारवर होते. सनातन संस्थेने देखील हे मान्य केले की, मलगोंडा पाटील हे त्यांचे साधक होते. त्यानंतर अंधo्रद्धा निर्मूलन कायद्याचा लढा सुरू झाला. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि त्यांचे सहकारी अंधo्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा, यासाठी आग्रही होते. मंत्राने आजार बरा करणे, भूत, अद्भुत शक्तीच्या आधारे धन मिळवून देणे, आपण देवाचा अवतार आहोत, असे सांगून स्त्रियांचे शोषण करणे अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी डॉ. दाभोळकर आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करीत होते. तेव्हा सनातनचे साधक मात्र हा कायदा केवळ हिंदू धर्माच्या प्रथा आणि परंपरांच्या विरोधातील आहे, असा प्रचार करीत होते. वास्तविक कायदा हा कोणत्याही एका धर्मासाठी नसतो तर तो सर्वानाच लागू असतो, हे वास्तव ते जाणीवपूर्वक लपवून ठेवून तसा प्रचार करायचे. हा कायदा रोखण्याएवढी सनातनची शक्ती नसल्याने मग त्यांनी वारकरी संप्रदायाला पुढे करून हा कायदा रोखण्यासाठी प्रयत्न केला. श्रद्धा ही कधीही आंधळी नसते वगैरे, समर्थन केले जात होते. मग या कायद्याचे नाव बदलून ‘जादूटोणा आणि अघोरी प्रथा विरोधी कायदा’ असे त्याचे नामकरण करण्यात आले. आता कायदा होणार असे वाटत असतानाच, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा पुण्यात खून झाला. त्यावेळी सनातनवर त्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला. सनातनचे प्रवक्ते त्याचा इन्कार करीत आले आहेत. मात्र, आता जवळपास यातील सर्व उलगडा होत आहे.

डॉ. दाभोळकर यांच्यावर प्रत्यक्ष गोळीबार केल्याचा आरोप असणा-या सचिन अणदुरे याला पोलिसांनी थेट औरंगाबाद येथून अटक केली. या हत्येचा कटाचा सूत्रधार वीरेंद्र तावडे असल्याचेही आता तपासातून पुढे येत आहे. केवळ डॉ. दाभोळकरच नाही, तर त्यानंतर कोल्हापूर येथे कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटक प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमध्येही सनातनचा हात असल्याचे समोर आले आहे.

सनातनने घडविलेल्या विविध हिंसाचाराला जबाबदार धरून कर्नाटक आणि महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. नालासोपारा येथे स्फोटके घरात साठवून ठेवलेल्या वैभव राऊत याच्यासह सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर याला अटक केली आहे. अटक केलेल्या या सर्व संशयितांचे वय पाहिले, तर ते अत्यंत तरुण आहेत. वैभव राऊत, शरद कळसकर, सचिन अणदुरे पंचवीस ते तीसच्या दरम्यानचे आहेत. यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र, ते या षड्यंत्रात अडकले आणि त्यात त्यांचे आयुष्यच पणाला लागले आहे. आध्यात्मिक साधनेच्या नावाखाली या तरुणांना अगोदर आकर्षित केले जाते. हळूहळू त्यांच्या मनात मुसलमान, ख्रिश्चन, समधर्म समभावाचा विचार मांडणारे विचारवंत यांच्याविषयी द्वेष पसरविला जातो. त्यात ते अडकतात.

आतापर्यंत विविध हिंसाचाराच्या घटनांमध्ये सनातनचा असणारा संबंध स्पष्टपणे पुढे आल्यानंतर या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी पुढे येत आहे. मात्र, त्यातही मोठय़ा प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे. राज्यमंत्री केसरकर वेगळी माहिती सांगत आहेत, तर केंद्रीय गृह राज्यमंत्री वेगळी मागणी सांगत आहेत. त्यामुळे संभ्रम अधिकच वाढताना दिसत आहे. सनातनने हिंदू राष्ट्र निर्मितीचे ध्येय निश्चित केले आहे आणि त्यासाठी तरुणांना हिंसक कृत्य करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. खरे तर या तरुणांना हिंसेप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांच्याबद्दल संताप येण्याऐवजी आता दया येऊ लागली आहे. एका षड्यंत्रात ते अडकत गेले आणि त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. म्हणूनच या संस्थेची साधना ही कोणत्या साध्यासाठी आणि त्यात साधक म्हणून गेलेले तरुण कसे चक्रव्यूहात अडकत आहेत, याबाबत जनजागृती झाली पाहिजे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version