Home महामुंबई साथीच्या आजारांनी कर्जतकर हैराण

साथीच्या आजारांनी कर्जतकर हैराण

0

नेरळ तालुक्याच्या खांडस ग्रामपंचायतीत मागील पाच दिवसांपासून साथीच्या विविध आजारांनी अक्षरक्ष: थैमान घातले आहे. 
नेरळ – तालुक्याच्या खांडस ग्रामपंचायतीत मागील पाच दिवसांपासून साथीच्या विविध आजारांनी अक्षरक्ष: थैमान घातले आहे. उलट्या, अतिसार, ताप, थंडी खोकला आदी आजारांमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असून जिल्हा परिषदेकडे मदतीची मागणी होत आहे. रविवारी दुपारी खांडस प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक तुंगी गावी पोहोचल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.

तुंगी गाव हे खांडसपासून चार किमी अंतरावर असून येथे ७० घरांची लोकवस्ती आहे. तुंगी गावातील रहिवासी विहीर व तलावातील पाण्यावर त्यांची तहान भागवत आहेत. या गावात मागील पाच दिवसांपासून साथीच्या विविध आजारांनी डोकेवर काढले आहे. ताप, थंडी, उलटय़ा, अतिसारासारख्या आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांना उपचारासाठी तीन किमीचा डोंगर पालथा घालून खांडस आरोग्य केंद्र गाठावे लागत आहे. ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पांडुरंग सुपेनाही आजार जडल्याने ते हैराण झाले आहेत. खांडसमधील आरोग्यसेविका तुंगीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत काम करत असल्याने त्या तुंगी गावातील रुग्णांवर उपचारासाठी कशा येणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. स्थानिकांनी जिल्हा परिषद सदस्य सुरेश टोकरे यांच्याकडे त्यांच्या समस्या मांडल्या.

त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांच्या सांगण्यावरून लसीकरण करणाऱ्या आरोग्यसेविकांनी तुंगी गावातील रुग्णांवर उपचारासाठी जाण्यास सुरुवात केली. आरोग्यसेविका म्हणून नियुक्ती केलेल्या सुशीला तांबे व शिलार उपकेंद्राच्या आरोग्यसेविका एस. एच. म्हात्रे, आरोग्यसेवक तांबडे यांना पाठवण्यात आले. त्यांनी घरोघर जाऊन आरोग्य तपासणी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीतर्फे ‘टीसीएल’ची पावडर नियमित विहिरींत टाकली जात असूनही ग्रामस्थांना उलटय़ा व अतिसाराचा त्रास होत असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांनी खांडस आरोग्य केंद्राच्या डॉ. गीता कदम यांच्यासह तुंगी गाव गाठले आहे. साथीच्या विविध आजारांनी त्रस्त रुग्णांना खांडस आरोग्य केंद्रात हलवणे शक्य होत नसल्याने तेथील मंदिरात उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. साथीच्या आजारांनी थैमान घातल्याने तुंगी गावातील संपूर्ण ७० घरांतील रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आणखी काही डॉक्टरांना मदतीसाठी आणण्याची तयारी जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी चालवली आहे. जवळपास सहा ते ५० वर्षे वयोगटांतील ग्रामस्थ आजारांनी त्रस्त झाले असून सुलोचना पारधी, राहीबाई ढोंगे, काळू ढोंगे, दगडू बांगारे, बबन तुंगेंसह विद्यार्थीवर्ग आजारांनी त्रस्त झाला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version