Home संपादकीय तात्पर्य साक्षी महाराजांची बेताल बडबड

साक्षी महाराजांची बेताल बडबड

0

माणसाला तोंड दिलेले आहे, त्याचा वापर चांगले बोलण्यासाठी करावा, अशी एक माफक अपेक्षा असते. असे न करणा-याला वायफळ बोलणारा असे म्हणतात. भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांची गणना यातच करता येऊ शकते. कायम वादग्रस्त वक्तव्ये करून प्रसिद्धी झोतात राहण्याची किमया या महाराजांनी साध्य केलेली आहे. आता तर त्यांनी ‘मुसलमानांना कब्रस्तान हवेच कशाला, मृतदेहावर अग्निसंस्कार करावा,’ असा अनाहूत सल्ला दिलेला आहे. ‘देशात मुसलमानांची संख्या २० कोटींपेक्षा जास्त आहे. मुसलमानांना कब्रस्तानासाठी जागा देत बसलो तर देशात शेतीसाठी जागाच शिल्लक राहणार नाही,’ असा जावईशोधही त्यांनी लावलेला आहे.

उत्तर प्रदेशात निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. या प्रदेशातील राजकारणाचा कल कुठे न्यायचा, हे ठरवण्यासाठी मुस्लीम मते निर्णायक ठरतात. त्यामुळे आपोआपच मुस्लीम मतांसाठी सगळेच पक्ष लांगुनचालनाला लागलेले आहेत. समाजवादी पक्ष या मुस्लिमांचा मसीहा म्हणून ओळखला जायचा. पण अखिलेश यादव या समाजापासून काहीसे फटकून वागतात, असा ग्रह पसरण्यात आल्याने मुस्लीम व्होटबँक काहीशी बसपाकडे झुकताना दिसत आहे. त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाकडूनही जोरदार प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत कब्रस्तानचा प्रश्न कळीचा बनत चाललेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यात उडी घेतलेली आहे. त्यांनी तर मुसलमानांना कब्रस्तानसाठी जागा देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे साक्षी महाराजांचे पित्त खवळलेले असून त्यांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेऊन सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.

भारताच्या लोकसंख्येचा विचार केल्यास २०१२च्या जनगणनेनुसार हिंदूंची लोकसंख्या ९७ कोटी असून मुस्लिमांची लोकसंख्या १७ कोटींवर स्थिरावलेली आहे. असे असतानाही मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याचे पिल्लू संघ परिवाराकडून अनेक वर्षापासून सोडण्यात येते. यात साक्षी महाराजसारखे भरच घालत असतात. मध्यंतरी एका शंकराचार्यानी मुस्लिमांप्रमाणे हिंदूंनीही अपत्यांची संख्या वाढवावी, असे विधान केले होते. वास्तविक पाहता हे शंकराचार्य अविवाहित. त्यांचा प्रापंचिक व्यवहारांशी काडीचाही संबंध नाही. पण असे शंकराचार्य जेव्हा इहलोकीच्या बाबींत हस्तक्षेप करतात तेव्हा काहीतरी चुकीचे घडत आहे, असे प्रकर्षाने वाटते. साक्षी महाराजही तसे सडेफटिंगच आहेत. तरीही तेही कधी कधी प्रापंचिक बाबींबाबत मार्गदर्शन करतात तेव्हा हसूच येते. राहता राहिला प्रश्न मुस्लिमांच्या कब्रस्तानचा. घटनेने प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य दिलेले आहे. त्याचा अतिरेक न करता ते उपभोगण्याचे स्वातंत्र्यही बहाल केलेले आहे. यात जन्म व मृत्यू विधींचाही समावेश आहे. कोणत्या धर्माने कोणत्या पद्धतीने अत्यंविधी करावा, त्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. हिंदू धर्मात परंपरागत पद्धतीने मृताचे दहन करण्यात येते. तर ख्रिश्चन, मुस्लीम समाज हे मृत व्यक्तीचे दफन करतो. या अंत्यविधीमुळे समाजास तसा काही त्रास होत नसताना विनाकारण कोणतेही वाद उकरून काढण्यात अर्थ नाही. त्यामुळे साक्षी महाराज यांनी मांडलेल्या चमत्कारिक भूमिकेचे वर्णन ‘साक्षी महाराजांची बेताल बडबड’ असेच करावे लागेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version