Home महाराष्ट्र सरसकट कर्जमाफी मग निकष कसले

सरसकट कर्जमाफी मग निकष कसले

0
Sharad Pawar

भाजपची सरसकट कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत महागाईच्या मुद्यावर आता राज्यभरात आंदोलने करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत दिला.

मुंबई- मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन ही जपानला आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी घातलेला घाट आहे. केंद्र सरकारच्या अशा निर्णयामुळेच आता सरकारविरोधात जनमत जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. सरसकट कर्जमाफी जाहीर केली होती, तर मग निकष कसले लावता, असा सवालही त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी अनेक विषयावर सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, सोशल मीडियावरून सरकारविरोधात मते मांडणा-या लोकांना नोटिसा पाठवून सरकार आपला आक्रस्ताळेपणा दाखवत असल्याची टीका करत महागाईच्या मुद्यावरून राष्ट्रवादीने संघर्षाची तयारी केली असून आता राज्यभरात आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा पाढाच शरद पवारांनी पत्रकार परिषदेत मांडला. सरकार आर्थिक क्षेत्रात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. प्रचंड महागाई वाढली आहे. देशातील उद्योगधंदे बंद पडताहेत, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे लोक सोशल मीडियावर व्यक्त होत असताना सरकार त्यांना नोटिसा पाठवण्याचे काम करते. घटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपला हे मान्य होते. आपल्याविरोधात मते मांडली जात आहेत हे पाहताच आता हेच नोटिसा पाठवत असल्याचे पवारांनी म्हटले.

परळ-एल्फिन्स्टन दुर्घटनेचा उल्लेख करत त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्रींचे उदाहरण दिले. एका अपघातानंतर त्यावेळी शास्त्रींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण सध्या असे काही होईल असे वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

येत्या ५ नोव्हेंबरला शेती क्षेत्रातील सर्व संघटनांचे औरंगाबादेत शेती परिषदेचे आयोजन करण्यात येणार असून या अधिवेशनानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे ते म्हणाले. महागाईच्या मुद्यावरून राष्ट्रवादीने संघर्षाची तयारी केली असून आता सर्व जिल्ह्यात व तालुक्याच्या ठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहे. राज्य सरकार एकीकडे सरसकट कर्जमाफी म्हणते मग तुम्ही निकष कसले लावता, असा सवाल उपस्थित करत भाजपची ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

जपानची आर्थिक मंदी दूर करण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट

जपानमध्ये सध्या आर्थिक मंदी सुरू आहे. ती दूर करण्यासाठीच केंद्र सरकारने अहमदाबाद-मुंबई हा बुलेट ट्रेनचा घाट घातल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची फक्त ३ स्थानके आहेत. बुलेट ट्रेनचा अवघ्या ३५ मिनिटांचा प्रवास हा महाराष्ट्रातून होतो. मग महाराष्ट्राने निम्मे पैसे का द्यायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version