Home मध्यंतर उमंग समोशांसाठी सोडली ‘गुगल’ची नोकरी

समोशांसाठी सोडली ‘गुगल’ची नोकरी

0

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी तरुणांना रोजगाराच्या नावाखाली ‘पकोडे’ विकण्याचा सल्ला दिला होता. त्यावर चांगलेच काहूर माजले होते. पण, समोसे विकण्यासाठी एका तरुणाने चक्क ‘गुगल’ची नोकरी सोडली आणि हा तरुण आज वर्षाला ५० लाख रुपयांपेक्षाही अधिकची कमाई करत आहे. मुनाफ कपाडिया असे या युवकाचे नाव असून, केवळ जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मुनाफने येथपर्यंत मजल मारली आहे.

एका फेसबुक पोस्टद्वारे मुनाफ कपाडियाने आपला संघर्ष मांडला आहे. तो सांगतो, मीच ती व्यक्ती आहे जिने गुगलची नोकरी समोसे विकण्यासाठी सोडली. मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आणि बॉलिवूडच्या पाटर्य़ामध्ये मुनाफचे समोसे विशेष लोकप्रिय आहेत.

एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर मुनाफने काही कंपन्यांमध्ये नोकरीही केली आणि त्यानंतर त्याने परदेशाची वाट धरली. मुनाफने परदेशात काही कंपन्यांमध्ये मुलाखत दिल्यानंतर ‘गुगल’मध्ये त्याला नोकरी मिळाली. त्याने काही वर्षे गुगलची नोकरी केली. पण, यापेक्षा काहीतरी वेगळे आपल्याला करायचे आहे, असे त्याला वारंवार वाटत होते आणि त्याने शेवटी घरवापसी केली. मुनाफने त्यानंतर भारतात येऊन ‘द बोहरी किचन’ नावाने एक रेस्टॉरंट सुरू केले. टीव्ही पाहण्याची मुनाफची आई नफिसा यांना हौस आहे. त्यात त्यांना टीव्हीवरचे फूड शोज पाहण्याची आवड असल्यामुळे त्यांच्या हातालाही एक वेगळीच चव असल्याचे मुनाफ सांगतो. आपल्या आईकडून काही टिप्स घेऊन मुनाफने फूड चेन सुरू केली.

अवघ्या काही वर्षातच मुनाफचे ‘द बोहरी किचन’ मुंबईतच नाही, तर देशभरात प्रसिद्ध झाले. यामध्ये रेस्टॉरंटची खासियत म्हणजे त्यात मिळणारा ‘मटन समोसा’. ‘द बोहरी किचन’च्या केवळ मटन समोसाच नाही, तर मटन रान, नर्गिस कबाब, डब्बा गोश्त, करी चावल अशा अनेक डिश प्रसिद्ध आहेत. रेस्टॉरंटचा टर्नओव्हर गेल्या दोन वर्षात ५० लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version