Home महाराष्ट्र कोकण सनातन संस्था धोकादायक!

सनातन संस्था धोकादायक!

0

सनातन संस्था ही ‘धोकादायक’ संघटना असल्याने या संघटनेवर बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात बोलताना केली.

पुणे- सनातन संस्था ही ‘धोकादायक’ संघटना असल्याने या संघटनेवर बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात बोलताना केली.

या संघटनेशी संबंधित विरेंद्र तावडेला दाभोलकर हत्या प्रकरणात शुक्रवारी रात्री पनवेल येथून केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

विरेंद्र तावडे हा गोवास्थित हिंदू जनजागृती समितीचा सभासद असून; ही समिती सनातन संस्थेचीच उपशाखा आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर या संस्थेच्या कारवाया वाढल्या होत्या.

आपण आपल्या कार्यकाळात या संस्थेवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्तावही सादर केला होता, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील दहशतवादविरोधी पथकाला मिळालेले पुरावे वकिलामार्फत सादर करून या संस्थेवर बंदी आणण्याकरता प्रयत्न करायला हवेत.

राज्य सरकार आणि केंद्रीय गृहखातेच याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल. जेणेकरून देशाला घातक ठरू पाहणा-या या संस्थेवर मोदी सरकार टाच आणू शकेल, असेही चव्हाण म्हणाले.

‘सनातन’ म्हणते प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न!

मुंबई- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सनातन’चा साधक विरेंद्र तावडे याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. यावर सनातन संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून; यातून संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे.

तावडे याच्या अटकेनंतर संतापलेल्या सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सीबीआयकडे कोणतेही ठोस पुरावे नसताना केवळ सनातन संस्थेची बदनामी करण्यासाठी मुद्दाम डॉ. विरेंद्र तावडे याला अटक करण्यात आल्याचे ‘सनातन’चे म्हणणे आहे.

हिंदू राष्ट्राचा आग्रह धरणा-या सनातन संघटनेला नष्ट करण्यासाठी पड्यंत्र रचण्यात आल्याचे अभय वर्तक म्हणाले. पोलिसांवर या प्रकरणात दबाव टाकण्यात येत होता. पोलिसांच्या काहीही हाती लागत नसल्यानेच तावडे याला अटक करण्यात आल्याचेही वर्तक यांचे म्हणणे आहे.

सनातन ही दहशतवादी संघटना

मुंबई- सनातन संस्था ही दहशतवादी संघटना असून, ही संस्था हिंदू समाजाला लागलेला कलंक असल्याची टीका आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी ट्विटरवरून केली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी मुंबईतून डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक केली होती. तीन वर्षापूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात ही पहिलीच अटक असून; या प्रकरणाच्या संथगती तपासाबद्दल न्यायालय तसेच माध्यमांमधून यंत्रणेवर जोरदार टीका होत होती.

खेतान यांनी काही दिवसांपूर्वी दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा होणार, असे ट्विट केले होते. त्यानंतर शनिवारी वीरेंद्र तावडेच्या अटकेनंतर आशिष खेतान यांनी काही ट्विटसच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य केले आहे.

आता तरी सनातनवर बंदी घाला, काँग्रेसची मागणी

मुंबई- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक झालेला संशयित आरोपी सनातनचा साधक असल्याने फडणवीस सरकारने सनातन संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, सनातनची दहशतवादी मानसिकता सुरुवातीपासूनच दिसून आली आहे.

समीर गायकवाडला अटक करणा-या पोलिसांना शिक्षा भोगावी लागेल, असे वृत्त ‘सनातन’चे मुखपत्र असलेल्या ‘सनातन प्रभात’मधून प्रकाशित झाले होते. पानसरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी असलेल्या शाळकरी मुलाच्या जीविताला धोका असल्याचे सांगून सनातनने एकप्रकारे धमकीच दिली होती.

साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनाही मॉìनग वॉक सुरू करा, असे सांगून धमकी दिली होती. मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही याच कट्टरवादी संघटनेचे कार्यकत्रे सापडले होते. या सर्व घटना पाहता सनातन संस्था अतिरेकी कारवायांत गुंतली असल्याचे दिसून येते. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.

आता सरकारने दिरंगाई करू नये. काँग्रेसने यापूर्वीही ही मागणी केली होती; परंतु सरकारने दखल घेतली नव्हती. सनातनचा खरा चेहरा जगासमोर आणायचा असेल तर सरकारने तातडीने जयंत आठवलेंसह या संघटनेच्या सर्व प्रमुख व्यक्तींना अटक करावी, अशीही मागणीही सचिन सावंत यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version