Home ताज्या घडामोडी सनातनच्या बंदीचा केंद्राकडे प्रस्ताव नाही

सनातनच्या बंदीचा केंद्राकडे प्रस्ताव नाही

0

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी केला केसरकरांचा खोटारडेपणा उघड

मुंबई- सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे, अशी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली माहिती खोटी असून ती दिशाभूल करण्यासाठी दिली असल्याच्या चर्चेला आता ऊत आला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनीच केसरकर यांच्या वक्तव्याचा भांडाफोड केला असून महराष्ट्र सरकारकडून सनतानवर बंदी घालण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे अहिर यांनी सांगितले. मात्र तसा प्रस्ताव आल्यास निश्चित कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नालासोपारा येथून सनातन संस्थेचा साधक वैभव राऊत याला अटक केल्यानंतर घडमोडींना वेग आला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली असून अनेकजणांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. डॉ. दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व लोक सनातन संस्थेशी संबंधित असल्याने या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता, सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठविला आहे, असे त्यांनी सांगितले होते. मात्र असा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नाही, अशी माहिती आता केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे. त्यामुळे केसरकर हे खोटी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचे वास्तवर समोर आले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) छापे टाकून सनातन संस्थेच्या साधकांना शस्त्रास्त्रांसह ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

‘सनातन’चे आठवले यांची चौकशी होणार?

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विचारवंतांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे साधकांना अटक झाल्यानंतर आता या हत्याकांडातील मागील मेंदूचा शोध घेण्याचा सीबीआय प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचीही चौकशी होणार असल्याचे समजते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना गोळय़ा घालणा-या सचिन अणदुरे याला अटक केल्यानंतर त्याचे धागेदोरे आता थेट सनतानपर्यंत पोहचले आहेत. म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. आठवले यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. त्यातच अटक केलेल्या आरोपींकडून पुढील जे टार्गेट ठरविण्यात आलेले होते त्यात काही पोलीस अधिकारी आणि सीबीआय अधिका-यांचीही नावे पुढे येत आहेत. इतके घातक कृत्य हे पकडलेले आरोपी करणे शक्य नसून त्या मागे इतर कुणाचा तरी मेंदू असल्याची शक्यता सीबीआयला आहे. त्यातूनच आता डॉ. आठवले यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यात सनातनला समर्थन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यात हजारो साधक सहभागी झाले होते. त्यात महिलांचा मोठा भरणा होता. कोणत्याही परिस्थितीत सनातनवर आम्ही बंदी घालू देणार नाही, असा निर्धार हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी व्यक्त केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version