Home टॉप स्टोरी गोंधळाचा सप्ताह

गोंधळाचा सप्ताह

0

कोळसा गैरव्यवहार प्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा ही मागणी भाजपसह विरोधी पक्षांनी संसदेत लावून धरल्याने दोन्ही सभागृह शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली.

नवी दिल्ली-  सलग सहा दिवस संसदेत गोंधळ घालणा-या भाजपच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी गुरुवारी सलग सातव्या दिवशीही संसदेचे कामकाज बंद पाडले. पंतप्रधानांसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण देऊनही आणि केंद्र सरकारने वारंवार चर्चेची तयारी दाखवूनही कोळसा खाणवाटप गैरव्यवहाराच्या मुद्यावरून भाजपच्या खासदारांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

कोणत्याही चर्चेशिवाय लोकसभेत गुरुवारी रासायनिक शस्र्विरोधी कायदा (दुरुस्ती) व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (दुरुस्ती) ही विधेयके मंजूर करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा लावून धरली आणि सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कामकाज प्रथम तासाभरासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही भाजप खासदारांनी गदारोळ घातल्याने दुपारनंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत कोळसा खाणवाटप गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी समाजवादी पक्षासह सात पक्षांनी केली असून शुक्रवारी संसदेसमोर ते धरणे आंदोलन करणार आहेत.

‘संसदेत चर्चा झाल्यास सत्य समोर येईल’

संसदेच्या कामकाजात भाजपकडून वारंवार अडथळे येत असल्याने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुन्हा भाजपवर टीका केली. ‘‘भाजपला संसदेत चर्चा नको आहे. कारण या प्रकरणी चर्चा झाल्यास सत्य जगासमोर येईल, याची भीती त्यांना वाटते. हिंमत असेल तर त्यांनी या मुद्दय़ावर संसदेत चर्चा करावी,’’ असे आव्हान सोनिया गांधी यांनी दिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version