Home टॉप स्टोरी स्वराज, इराणींनंतर आता संरक्षण मंत्री पर्रिकरही गोत्यात

स्वराज, इराणींनंतर आता संरक्षण मंत्री पर्रिकरही गोत्यात

0
Manohar Parrikar

केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात लपवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात लपवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून त्यामुळे स्मृती इराणी, सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्यानंतर आता मनोहर पर्रिकर गोत्यात येण्याची शक्यता आहे.

पर्रिकर यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्या विरोधात दाखल एफआयआरची माहिती लपवली असल्याचे काँग्रेसने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून काँग्रेस याप्रकरणाचा सखोल अभ्यास करणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या लीगल सेलचे सचिव के. सी. मित्तल यांनी सांगितले आहे.

पणजी येथे २७ जुलै २०११मध्ये एफआयआर क्रमांक २१९/११ नुसार तेथील काशीनाथ शेटय़े आणि अन्य दोन व्यक्तींनी मनोहर पर्रिकर यांच्या विरोधात फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरमधील नऊ आरोपींमध्ये पर्रिकरांचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. या एफआयआरची प्रतही काँग्रेसने जाहीर केली असून त्यामुळे पर्रिकर मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत.

तर दुसरीकडे आधीच ललित मोदी आणि स्मृती इराणी यांचे प्रकरण गाजत असतानाच आता पर्रिकरांचे हे प्रकरण उघडकीस आल्याने मोदी सरकारचीही चिंता वाढली आहे. शिवाय मोदी सरकारमधील या फसव्या आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली असून भाजपा सरकारला कोंडीत पकडले आहे. दरम्यान, पर्रिकर यांनी अद्याप याप्रकरणी कुठलेही भाष्य केलेले नसून निवडणूक आयोग यावर काय कारवाई करते, हे पाहणे सध्या महत्त्वाचे ठरणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version