Home संपादकीय तात्पर्य संतापाचा उद्रेक चहूबाजूंनी

संतापाचा उद्रेक चहूबाजूंनी

0

देशभरात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत चालली आहे. महिलांची छेडछाड करणा-या रोडरोमिओंमुळे मुली, महिला, गृहिणींचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे.

देशभरात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत चालली आहे. महिलांची छेडछाड करणा-या रोडरोमिओंमुळे मुली, महिला, गृहिणींचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. कायद्याचा धाक न राहिल्यामुळेच या घटना वारंवार घडत आहेत, असा सामान्यांचा समज झाला आहे. त्यामुळे महिलांविरोधातील अशा गुन्ह्यांबाबत सामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आताही पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करत नसल्याचे दिसल्यामुळे या संतापाचा उद्रेक देशभरात पाहायला मिळाला. आता डोक्यावरून पाणी गेले आहे, असा सामान्यांचा सूर सर्वत्र आहे. दिल्लीतील बलात्काराच्या प्रकरणाने या उद्रेकासाठी ठिणगीचे काम केले.

या घटनेमुळे देशभरात महिलांसह सर्व समाजघटकांनी एकत्रितपणे आवाज उठवला. दिल्लीत १६ डिसेंबरला झालेला सामूहिक बलात्कार ही बलात्कारातील कौर्याची परिसीमा होती. त्यामुळे दिल्लीकरांसह देशही हादरला. दिल्लीमध्ये महिलांविरोधील गुन्ह्यांची फारच गंभीर समस्या आहे. कारण या शहरामध्ये गेल्या वर्षभरात बलात्काराचे ६०० गुन्हे नोंदले गेले आहेत. दिल्लीकरांना तर आपली घराबाहेर पडलेली मुलगी सुखरूप घरी येईल की नाही, याची सतत काळजी वाटत असते. अशा काळजीने ग्रस्त झालेल्या महिला, सतत होणाऱ्या छेडछाडीने अस्वस्थ झालेल्या तरुणी आणि त्यांचे पालक उत्स्फूर्तपणे संघटित झाले आणि त्यांनी सरकारवरचा, व्यवस्थेवरचा आपला राग तीव्र निदर्शनांच्या माध्यमातून व्यक्त केला.

राजधानीतल्या आंदोलनाने जोर पकडल्यामुळे माध्यमांनी त्याला व्यापक प्रसिद्धी दिली आणि त्यातून अशा आंदोलनाचे लोण देशभर पसरले. अनेक ठिकाणी महिला संघटित झाल्या, त्यांनी मोर्चे काढले, कारवाई आणखी कठोर व्हावी, यासाठी सह्यांची निवेदने अधिका-यांना दिली. नागरिकांच्या उद्रेकामुळे महिलांविरोधातील गुन्हे किती गंभीर थराला पोहोचले आहेत, याची जाणीव राज्यकर्त्यांना झाली आहे. राज्यात गेल्या वर्षभरात छेडछाडीमुळे ११६० मुलींनी आत्महत्या केल्या. कित्येकींना शिक्षणाला कायमचा रामराम ठोकावा लागला आहे. आसामच्या पोलिसांनी मात्र रोडरोमिआंचा पुरता बंदोबस्त करायचाच, असा निर्धार करून एक चांगला उपाय शोधला आहे.

त्यांनी मुलींचे एक पथक निर्माण केले आहे. या पथकांमध्ये साधारण: २० ते २५ वयोगटांतील मुलींना सहभागी करून घेण्यात आले आहे. या मुलींना कराटेचे शिक्षण दिले जाते. त्यांना पोलीस म्हणून भरती केलेले आहे आणि या पथकाचे नाव ‘वीरांगणा’ असे ठेवले आहे. या वीरांगणांची अशी तयारी करण्यात आलेली आहे की, त्यातली प्रत्येक मुलगी तीन-तीन मुलांना सहज लोळवू शकेल. वीरांगणांचे हे पथक येत्या २६ जानेवारीला प्रत्यक्ष सेवेत रुजू होणार आहे. या बातमीने असा काही प्रभाव पडला आहे की, गुवाहाटी शहरातली मुलींची छेडाछेड बंद झाली आहे. असे उपाय समाजातील विचारमंथनातून, चर्चामधून पुढे येतच असतात. त्यांना सरकारकडून, व्यवस्थेकडून आणि समाजाकडून पाठबळ मिळण्याची गरज असते. ते मिळालं तर अशा प्रकारांना आळा बसायला वेळ लागणार नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version