Home महामुंबई श्वान निर्बिजीकरण मोहीम कागदावरच

श्वान निर्बिजीकरण मोहीम कागदावरच

0
संग्रहित छायाचित्र

नागरी समस्यांच्या कचाटयामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे आता रस्त्यावर उतरणे कठीण झाले आहे

कल्याण – नागरी समस्यांच्या कचाटयामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे आता रस्त्यावर उतरणे कठीण झाले आहे. निर्बिजीकरण मोहिमेंतर्गत वर्षभरात ३३ लाख २० हजार २४० रुपये खर्च करून सुमारे ३ हजारांहून अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण करत असल्याचा दावा कल्याण-डोंबिवली महापालिका करत असली तरी भटक्या कुत्र्यांच्या दहशतीतून नागरिकांची अद्याप सुटका झालेली नाही. परिणामी सकाळी कामानिमित्त मुंबईला जाणारे चाकरमानी, दुचाकीस्वार, विद्यार्थी आदींना कुत्र्यांचा डोळा चुकवत इच्छित स्थळ गाठावे लागत आहे.

२००७ साली पशुसंवर्धन विभागाने केलेल्या परीक्षणातून सादर केलेल्या अहवालानुसार, कल्याण-डोंबिवली शहरात सुमारे १८ हजार ५३४ भटके कुत्रे आहेत. त्यानंतर होणारी वाढ लक्षात घेता, हा आकडा पाच पटीने वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या परीक्षण अहवालानंतर तब्बल पाच वर्षे उलटून गेली तरी नव्याने सर्वेक्षण केलेले नाही. त्यात मुंबई उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास मनाई केल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे निर्बिजीकरणाच्या माध्यमातून कुत्र्यांच्या प्रजनन क्षमतेला रोख लावण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा ठेका अंबरनाथ येथील अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीला दिला आहे. कुत्र्यांना पकडणे, जखमी कुत्र्यांवर प्रथमोपचार करणे आणि निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करून त्यांना त्या त्या परिसरात सोडून देणे यासाठी महापालिका प्रत्येक कुत्र्यामागे ८८० रुपये खर्च करते. या संस्थेने महिन्याला सुमारे २५० ते ३०० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करत असल्याची माहिती महापालिकेला दिली आहे. दरम्यान, निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या कुत्र्यांच्या उजव्या कानाला ‘व्ही’ आकाराची, त्याचे वर्णन आणि तो कुत्रा कोणत्या भागातील आहे, याची नोंद घेऊन त्या कुत्र्यांना पुन्हा सोडून देण्यात येते. ज्या भागातून भटक्या कुत्र्यांच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त होतात, त्या भागात जाऊन भटक्या कुत्र्यांना पकडले जाते. श्वानदंशामुळे होणा-या आजारांपासून या कर्मचा-यांचे संरक्षण व्हावे म्हणून वर्षातून एकदा लस
दिली जाते.

कुत्र्यांचा सुळसुळाट असलेले परिसर
कल्याण पश्चिम : आधारवाडी, बेतूरकरपाडा, खडकपाडा, वायलेनगर, ठाणकरपाडा, टिळक चौक-अहिल्यादेवी चौक परिसर, रामबाग, जोशीबाग, बिर्ला महाविद्यालय परिसर, भावानीनगर, इंदिरानगर, सिंधीगेट, मोहने परिसर, यादवनगर, रेल्वे-एसटी-केडीएमसी बस स्थानक परिसर, उंबर्डेगाव.

कल्याण पूर्व : कोळसेवाडी, नांदिवली गाव, काटेमानवली, नेतवली, कचोरेगाव, चेतना शाळा परिसर, सूचक नाका, चक्की नाका, खडेगोळवली.

डोंबिवली पश्चिम : गरिबाचा वाडा, गुप्ते रोड, उमेशनगर, बावनचाळा परिसर, ठाकूरवाडी
डोंबिवली पूर्व : सावरकर रोड, छेडा रोड, टिळक पथ, औद्योगिक वसाहत, रेल्वे स्थानक परिसर.

पालिका रुग्णालयात लस उपलब्ध नाही
केडीएमसी हद्दीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू असताना दुसरीकडे मात्र पालिकेच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयांत श्वानदंशावरील लस उपलब्ध नाही. श्वानदंश झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन सुमारे १५०० रुपये खर्च करून लस टोचून घ्यावी लागते.

निर्बिजीकरणाचा खर्च
कुत्रा पकडणे – सोडणे – १४० रुपये
प्रथमोपचार, देखभाल (६ ते ७ दिवस) – २९० रुपये
शस्त्रक्रिया लसीकरण – ४५० रुपये
प्रत्येक कुत्र्यावरील एकूण खर्च – ८८० रुपये

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version