Home महामुंबई ठाणे शैक्षणिक साहित्यावर नवी मुंबई महापालिकेचा ११ कोटींचा खर्च

शैक्षणिक साहित्यावर नवी मुंबई महापालिकेचा ११ कोटींचा खर्च

0

नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे बालवाडी ते ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खरेदीवर ११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे बालवाडी ते ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खरेदीवर ११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या संदर्भातील खर्चाला नुकतीच स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त आबासाहेब ज-हाड यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळण्यात अडचणी निर्माण होऊ नये, याची दक्षता घेतली आहे. यासाठी त्यांनी आचार संहितेपूर्वीच शालेय शैक्षणिक साहित्यांचा पुरवठा करणा-या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. शाळा सुरू होऊन महिना-दोन महिने झाले तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळत नव्हते. त्यात भरीस भर म्हणून यंदा नेमक्या लोकसभा निवडणुका आल्याने या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर निविदा काढणे व त्या स्वीकारून कंत्राटदारांनी साहित्याचा पुरवठा करणे या कामाला बराच अवधी लागला असता. त्यामुळे यंदाही मागील वर्षीप्रमाणे ‘ये रे माझ्या मागल्या’अशी स्थिती उद्भवली असती.

मात्र आबासाहेब जऱ्हाड, शिक्षण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगिरे व त्यांच्या अधिका-यांनी दाखवलेल्या सर्तकतेमुळे यंदा विद्यार्थ्यांना वेळेत शालेय साहित्य मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यानुसार शिक्षण विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यातच यासाठीच्या निविदा प्रसिद्ध करून नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत त्यांना मंजुरी घेतली.

यात बालवाडी ते ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नियमित गणवेश, पीटी गणवेश, बूट व मौजे (नियमित व पीटी), रेनकोट, स्काउट गाइड गणवेश व वह्या व शैक्षणिक साहित्य खरेदीचा समावेश आहे. या खरेदीसाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली असून, या साहित्य वाटपास सुरुवातदेखील झाल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version