Home टॉप स्टोरी शेतक-याच्या आत्महत्येचे संसदेत तीव्र पडसाद

शेतक-याच्या आत्महत्येचे संसदेत तीव्र पडसाद

0

‘आप’च्या रॅलीमध्ये राजस्थान येथील गजेंदर सिंह या शेतक-याने बुधवारी केलेल्या आत्महत्येचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेत उमटले.

नवी दिल्ली- ‘आप’च्या रॅलीमध्ये राजस्थान येथील गजेंदर सिंह या शेतक-याने बुधवारी केलेल्या आत्महत्येचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेत उमटले. या आत्महत्येबद्दल खासदारांनी मोदी सरकारला धारेवर धरले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कॉँग्रेसने केली आहे.

लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर सर्वपक्षीय खासदारांनी गजेंदर सिंह याच्या आत्महत्येबद्दल दु:ख व्यक्त केले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. तसेच या प्रकरणी अन्य कामकाज रद्द करून चर्चा करण्याची मागणी कॉँग्रेसने केली. त्यावर सरकारनेही चर्चेला तयार असल्याचे सांगितले. राज्यसभेतही या घटनेबाबत आपला तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनीच निवेदन करावे या घटनेची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली.

लोकसभेत निवेदन करताना पंतप्रधान म्हणाले की, देशात अनेक वर्षापासून शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतक-यांच्या समस्या जुन्याच असून त्यावर आता तोडगा काढणे गरजेचे आहे. शेतक-यांच्या प्रश्नांवर सर्वानी मिळून मार्ग काढणे गरजेचे आहे. शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकार कोणाचीही सूचना स्वीकारण्यास तयार आहे. मानवी जीवनापेक्षा कोणतीही बाब मोठी नाही. शेतक-यांनी आत्महत्या करू नये म्हणून सामूहिक प्रयत्न करायला हवेत, असे त्यांनी सांगितले.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन देताना सांगितले की, गजेंदर सिंह हा झाडावर चढलेला असताना आपच्या रॅलीतील पक्षाचे कार्यकर्ते टाळ्या वाजवत होते तसेच घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी त्यांना घोषणाबाजी बंद करण्याची विनंती केली. वस्तुत: आत्महत्येपासून संबंधीत व्यक्तीला परावृत्त करण्यासाठी त्याच्याशी चर्चा करावी लागते. मात्र, आपचे कार्यकर्ते घोषणाबाजीत रमले होते.

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा ‘आप’ने इन्कार केला आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी त्या शेतक-याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप ‘आप’ने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. तर भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version