Home महाराष्ट्र शिवाजीनगर रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा

शिवाजीनगर रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा

0

शिवाजीनगर परिसरात श्वान पथकातर्फे मंगळवारी नियमित तपासणी चालू असताना रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या शेजारील वेटिंग रूमजवळ अचानक एक बेवारस बॅग आढळून आल्याने एकच धावपळ झाली.

पुणे- शिवाजीनगर परिसरात श्वान पथकातर्फे मंगळवारी नियमित तपासणी चालू असताना रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या शेजारील वेटिंग रूमजवळ अचानक एक बेवारस बॅग आढळून आल्याने एकच धावपळ झाली. तब्बल चार तासांच्या परिश्रमांनंतर एसएसपीएमच्या मागील मैदानात बॉम्ब तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

या बॅगमध्ये फोन, कॅल्क्युलेटर, जुन्या वायरी, कपडे, खिळे असे सामान आढळल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या अफवेनंतर शिवाजीनगर आणि पुणे स्थानकांची पोलिसांनी कसून तपासणी केली, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी दिली.

शिवाजीनगर रेल्वे स्थानकाची मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास श्वान पथकातर्फे तपासणी सुरू असताना एका बेवारस बॅगजवळ श्वान थांबला. त्यामुळे पोलिसांनी दुस-या श्वानाला पाचारण केले. या श्वाननेही धोक्याची सूचना दिल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिसर मोकळा केला. तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने ही बॅग हलवण्यासाठी हालचाल सुरू केली. त्यासाठी महापालिकेचा ओपन डंपर मागवण्यात आला. विशेष यंत्रणेचा वापर करून ही बॅग आरटीओच्या शेजारील एसएसपीएम कॉलेजच्या मागील मोकळ्या मैदानात नेण्यात आली.

तब्बल चार तासांच्या परिश्रमानंतर बॅगेत अन्य सामान आढळल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, बॅगमधील औषधांमुळे श्वानाने चुकीची सूचना दिली असावी, याबाबत श्वानमास्टर नेमके स्पष्टीकरण देतील. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन दैठणकर यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version