Home संपादकीय तात्पर्य शिवसेनेची फरपट

शिवसेनेची फरपट

0

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला १८ जागा मिळाल्या. या जागा मिळण्यात शिवसनिकांचा पराक्रम किती आणि शिवसेनेच्या कार्याध्यक्षांची मर्दुमकी किती हा एक संशोधनाचा विषय आहे. पण हा सारा आपलाच प्रताप आहे असे मानून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव टाकून त्यांना नमवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नरेंद्र मोदी एरवी या दबावापुढे नमले असते पण हे नमो आता नमायच्या मन:स्थितीत नाहीत कारण त्यांचे सरकार काही शिवसेनेच्या टेकूवर अवलंबून नाही. अशा स्थितीत शिवसेनेने शहाणपणाने नमती भूमिका घेतली पाहिजे पण उद्धव ठाकरे नेहमीच्याच गुर्मीत चालले आहेत. महाराष्ट्रातही भाजपचे शिवसेनेवाचून फार काही अडेल अशी स्थिती नाही. शिवसेनेपेक्षा भाजपला रामविलास पासवान यांचा मोठा आधार आहे. पासवान यांच्या पक्षाचे फार मोठे खासदार निवडून आलेले नाहीत पण, बिहारात पासवान यांच्या पाठिंब्याने भाजपला दलित मतांचा आधार मिळू शकतो. पासवान यांच्या पक्षाची एवढी महती असतानाही ते आपल्या खात्यावर नाराज नाहीत. आणि असले तरीही त्यांना आता आपण या बाबतीत दबाव टाकावा अशी स्थिती नाही हे कळते. तेलुगू देसम आणि भाजप यांच्या युतीतही भाजप गरजू पक्ष आहे. तेलुगू देसमच्या वर्चस्वाचा फायदा भाजपला होत आहे पण अशा स्थितीतही तेलुगू देसमने केवळ एका मंत्रीपदावर समाधान मानले. समाधान झाले नसले तरीही असमाधान उघडपणे व्यक्त करण्याची ही वेळ नाही एवढे तारतम्य चंद्राबाबू नायडू यांच्याकडे आहे. उद्धवसाहेब आपल्या भोवतीच्या अनेक अपरिपक्व सल्लागारांच्या सल्ल्याने गोंधळून जात असतात. त्यांना आपण या बाबतीत किती ताणून धरावे हे कळत नाही. नवाज शरीफ यांना शपथविधीला निमंत्रित करावे की नाही हे ठरवण्यासाठी मोदींनी शिवसेनेला विचारले नाही. ते येत आहेत हे कळल्यावर शिवसेनेने नाराजीचे नाटक करायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भुवयांचे धनुष्य ताणले म्हणून मोदी घाबरून जाऊन शरीफ यांचे निमंत्रण रद्द थोडेच करणार होते? बाळासाहेब हयात असताना अशा प्रश्नात भाजपचे कोणी तरी नेते मुंबईत येऊन त्यांना भेटत असत आणि त्यांची समजूत काढत असत. मग बाळासाहेब संमती देत असत. वडीलधारे म्हणून त्यांचाही मान राखल्यासारखे होत असे. आता अशी काही स्थिती नाही. नवाज शरीफ यांना उद्धव ठाकरे यांनी विरोध केला तरीही मोदी यांनी त्या विरोधाची साधी दखलही घेतली नाही. शेवटी शरीफ यांच्या उपस्थितीतल्या कार्यक्रमाला ठाकरे सहकुटुंब हजर झाले. झाले म्हणजे हजर व्हावे लागले. या घटनेतून मोदी आपल्याला कुठपर्यंत हिंग लावणार याचा अंदाज उद्धव ठाकरे यांना यायला हवा होता. तरीही मंत्रिमंडळावरून आणि खात्यावरून ठाकरेंना नाटक करायची काय गरज होती. पण अनंत गीते यांना टाकावू खाते दिले आहे असा आकांडतांडव केला गेला आणि पुन्हा एकदा मोदींनी शिवसेनेची जागा दाखवून दिली. मोदींनी सर्वानाच हे बजावून सांगितले आहे की, आपण देऊ तेच खाते घ्यावे लागेल. ज्यांना ते पसंत नसेल त्याने ते सोडून द्यावे. गीते यांच्या बाबतीत त्यांनी याच इशा-याची पुनरुक्ती केली असणार. म्हणून आधी आदळआपट आणि नंतर मुकाटपणे मिळेल ते खाते स्वीकारणे असा प्रकार घडला. आता आणखी मंत्री घेण्यावरून याच प्रकाराची पुनरावृत्ती होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version