Home टॉप स्टोरी शिवसेना सत्तेच्या मिठाला जागली!

शिवसेना सत्तेच्या मिठाला जागली!

0

सरकारच्या शेतक-यांप्रती संवेदनहीन कारभाराबद्दल विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

नागपूर- शिवसेना राजीनामे का देत नाही? दरवेळी अवमान गिळून शांत का बसते? याचे एकच कारण आहे. ते फक्त सत्तेच्या खाल्ल्या मिठाला जागत आहेत आणि खाल्लेल्या मिठाशी जागण्यात काहीच गैर नाही. त्यामुळे शिवसेना राजीनामे देत नसल्याबद्दल आम्ही आजवर केलेली टीका चुकीची होती, असा उपरोधिक हल्लाबोल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. दरम्यान, सरकारच्या शेतक-यांप्रती संवेदनहीन कारभाराबद्दल विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

सरकार म्हणून काम करताना झालेल्या चुका स्वीकारून त्या दुरुस्त करण्याची काँग्रेस आघाडी सरकारची मानसिकता होती. म्हणूनच आमचे सरकार १५ वर्षे टिकले, पण भाजप-शिवसेनेच्या सरकारची चुका स्वीकारण्याची मानसिकता नाही. उलटपक्षी ते चुका दडपू पाहत आहेत. त्यामुळे हे सरकार जाणार, हे नक्की असून, या सरकारची ‘एक्सपायरी’ आता संपल्याची घणाघाती टीका विखे-पाटील आणि मुंडे यांनी केली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे आयोजित विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारवर घणाघाती टीका करताना ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात असे दळभद्री, खोटारडे आणि फसवणूक करणारे सरकार आजवर कधीही झालेले नाही. या सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. प्रारंभी सरकारने दावा केला की, ८९ लाख शेतक-यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली जाईल. ४० लाख शेतक-यांचा सातबारा कोरा होईल. परंतु, आता एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर फक्त ३७ लाख शेतक-यांना जेमतेम १५ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. सरकारच्या अटी आणि निकषांमुळे कर्जमाफी योजनेची वाट लागली.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत लावलेले व्यंगचित्रांचे लक्षवेधी फलक लावण्यात आले होते. अलिकडेच चचेर्चा विषय ठरलेल्या ‘फिटनेस चॅलेंज’च्या आधारे राज्यातील ज्वलंत समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधणारा व्यंगचित्रांचा एक फलक या ठिकाणी उभारण्यात आला होता. त्यासंदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले की, विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पंतप्रधानांनी स्वीकारले.

शिवसेना सत्तेच्या मिठाला जागली!

विरोधकांनी यावेळी शिवसेनेवरही जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणा भीमदेवी थाटात नाणार प्रकल्प रद्द होणार असल्याची घोषणा केली. परंतु, भाजपने नाणार प्रकल्प लावून धरल्याने शिवसेनेची अब्रू गेली आहे. शिवसेनेच्या सतत मवाळ, नमती भूमिका का घेते, याचे कारण आपल्याला नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेला कळाले. हे सरकार म्हणजे न पटणा-या नवरा-बायकोचा संसार आहे. नवरा कसाही असो, मात्र तो संसार टिकावा म्हणून महिला वडाला फे-या मारतात. तीच भूमिका शिवसेना पार पाडते आहे. खरे तर भाजपच्या या सरकारचा प्राण केव्हाच गेला असता. पण शिवसेनेच्या रूपातली आधुनिक सावित्री भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याने हे सरकार अजून जीवंत आहे. शिवसेना जशी आपल्या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधते, तसेच त्यांनी आता आपल्या गळ्यात भाजपच्या नावाचे मंगळसूत्रही घालून घ्यावे आणि सुखाने संसार करावा, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.

तत्पूर्वी मंगळवारी सकाळी विरोधी पक्षातील सर्व गटनेत्यांची बैठक विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, सुनील तटकरे, जोगेंद्र कवाडे, शेकापचे जयंत पाटील, शरद रणपिसे, हेमंत टकले, प्रकाश गजभिये आदी नेते उपस्थित होते. जनतेशी निगडीत ज्वलंत समस्यांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला आणि सरकार आपली जबाबदारी पूर्ण करण्यात साफ अपयशी ठरल्याने सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version