Home टॉप स्टोरी शिवसेना केंद्रातील सत्ता सोडणार, महापालिकेचे काय ?

शिवसेना केंद्रातील सत्ता सोडणार, महापालिकेचे काय ?

0

आपल्या सोयीनुसार युती तोडणा-या शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टिकेनंतर आता केंद्रातील सत्तेतूनही बाहेर प़डण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई – आपल्या सोयीनुसार युती तोडणा-या शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टिकेनंतर आता केंद्रातील सत्तेतूनही बाहेर प़डण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे नरेंद्र मोदी सरकारमधील एकमेव मंत्री अनंत गीते मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यावरुन परतल्यानंतर अनंत गीते त्यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा देतील. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ही माहिती दिली. अनंत गीते अवजड उद्योग खात्याचे मंत्री आहेत.

जागावाटपावरुन शिवसेना-भाजपची २५ वर्षांची युती मागच्या आठवडयात तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महालक्ष्मी येथे झालेल्या जाहीरसभेमध्ये भाजपवर जोरदार आगपाखड केली होती. महायुती तुटण्यासाठी भाजपला जबाबदार धरले होते. पण त्याचवेळी राज्यात युती तोडणा-या शिवसेनेने केंद्र आणि मुंबई महापालिकेतील भाजप बरोबर असणारी युती कायम ठेवली होती. त्यामुळे सत्तेचे लोणी चाखत आपल्या सोयीनुसार युती तोडण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

काल रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांदिवलीतील जाहीरसभेमध्ये शिवसेना-भाजपवर जोरदार टिका करताना, शिवसेनेच्या युती तोडण्याच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली होती. राज्यात युती तोडता मग केंद्रात आणि महापालिकेत युती कशाला ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता. या मुद्यावरुन पुढे अडचणीत येणार असे दिसू लागताच शिवसेनेने केंद्रातील भाजपबरोबरची युती संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबई महापालिकेतील युतीबद्दल काय ? ते शिवसेनेने अजूनही स्पष्ट केलेले नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version