Home टॉप स्टोरी शाहरूख खान भाजपासाठी व्हिलन

शाहरूख खान भाजपासाठी व्हिलन

0

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानने देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या विरोधात टीकास्त्र सोडल्यावर तो भाजपासाठी खलनायक ठरला आहे. 

नवी दिल्ली- बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानने देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या विरोधात टीकास्त्र सोडल्यावर तो भाजपासाठी खलनायक ठरला आहे.  त्याची टीका झोंबल्याने मध्य प्रदेशातील भाजपा नेते कैलाश वर्गीय, खासदार योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची यांनी शाहरूखची संभावना पाकिस्तान धार्जिणा, देशद्रोही अशी करत त्याच्या व दहशतवादी हफीज सईद याच्या भाषेत कोणताही फरक नसल्याचे तोंडसुख घेतले होते. मात्र शाहरुखच्या बाजूने बॉलिवुड उभे राहिल्याचे पाहून आणि ही टीका अंगलट आल्याचे लक्षात आल्यावर भाजपाने बुधवारी या वाचाळवीरांना समज देत सारवासारव केली.

आपल्या वाढदिवसाला झालेल्या पत्रकार परिषदेत शाहरूख खानने देशात असहिष्णूता पराकोटीची वाढली असल्याची टीका केली होती. त्यावर विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची व भाजपाचे खासदार आदित्यनाथ यांनी शाहरुखवर तोफ डागली होती.

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काही लेखक आणि डाव्या विचारसरणीचे कलाकार देशविरोधी तत्त्वांमध्ये सामील झाले आहेत. ते आता दहशतीची भाषा बोलत आहेत. त्यांचे वक्तव्य भाजपा विरोधी नाहीत पण राष्ट्रविरोधी आहे. दुर्देवाने आता शाहरुख खानही त्यामध्ये सहभागी झाला आहे. शाहरुखने पाकिस्तानात चालते व्हावे, असेही आदित्यनाथ म्हणाले.

शाहरूखने वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही असे सांगून ते म्हणाले की, भारतातील बहुसंख्यांनी त्याचे चित्रपट पाहणे बंद केल्यास तो सर्वसामान्य माणसांसारखा रस्त्यावर फिरताना दिसेल हे त्याने चांगले लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला.

भारतात राहणे अशक्य होत असल्याने शाहरूख व अन्य व्यक्तींनी पाकिस्तानात यावे. पाकिस्तानात राहावे, असे इस्लामचे म्हणणे आहे, असे आमंत्रण हफीज सईदने टिव्टरवरून दिले. त्यावर आदित्यानाथ म्हणाले की, शाहरूख तेथे जात असल्यास आम्ही त्याचे स्वागतच करतो.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनीही ट्विटरवरून टिवटिव केली होती. शाहरुख भारतात राहतो, पण त्याचा आत्मा पाकिस्तानात असून तो राहतो मात्र भारतात, असे म्हटले होते. या विधानांवर चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर या वाचाळवीरांची टीका अनावश्यक असून, भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तशी भूमिका नसल्याचा बचाव भाजपाने केला.

शिवसेना महिरा खानचे काय करणार?

भाजपाने टीका केल्यानंतर किंग खानला गोंजारणारी शिवसेना ‘रईस’ या त्याच्या आगामी चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खानबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कारण भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यास शिवसेना कायम विरोध करत आली आहे. शाहरूख मुस्लीम असल्याने त्याला लक्ष्य करू नये.

भारतातील मुस्लिम हे सहिष्णू असून केवळ मुस्लिम असल्याने शाहरूखवर टीका करता कामा नये, असे शिवसेनेच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधाची खिल्ली उडवणारा  एक फोटो सोशल मीडियावर टाकून महिराने शिवसेनेला खिजवले आहे. भगव्या वेशभूषेतील एका पाकिस्तानी दिग्दर्शकासोबत काढलेल्या या फोटोत ‘महिरा को भगावो’ असा फलक दिसतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version