Home व्यक्तिविशेष शंकर बाबाजी पाटील

शंकर बाबाजी पाटील

0

‘धिंड’,‘नाटक’,‘मिटिंग’ यासारख्या ग्रामीण कथांच्या रसिकांपर्यंत पोहोचलेल्या शंकर बाबाजी पाटील यांचा आज जन्मदिन. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे दि. ८ ऑगस्ट १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. सुरुवातीस आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर कार्यक्रम सहाय्यक अधिकारी असणा-या पाटील यांनी १९५९ मध्ये एशिया फौंडेशनच्या शिष्यवृत्तीतून ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला व टारफुला ही कादंबरी लिहिली. प्रामुख्याने ग्रामीण कथाकार व चित्रपट कथाकार म्हणून लौकिक मिळवलेल्या शंकर पाटील यांचा १९६० ते ७० हा कथालेखनाचा बहाराचा काळ होता. ग. प्र. प्रधानांसह आठवी ते दहावीसाठी साहित्य सरिता या वाचनमालेचे संपादन करणारे पाटील महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती मंडळावर मराठी विषयाचे विशेष अधिकारी होते.

‘वळीव’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ‘भेटीगाठी’, ‘धिंड’, ‘बावरी शेंग’, ‘खुळय़ाची चावडी’, ‘फक्कड गोष्टी’, ‘खेळखंडोबा’, ‘आभाळ’ असे सरस कथासंग्रह देणा-या पाटील यांनी ‘गल्ली ते दिल्ली’,‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’ अशी वगनाटय़े लिहिली. त्यांच्या अनेक कथासंग्रहांना व चित्रपट कथांना राज्य शासनाचे पुरस्कार लाभले. ‘पिंजरा’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘पाहुणी’, ‘लक्ष्मी’, ‘भुजंग’ यांसारख्या अनेक चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या. ग्रामीण जीवनाचा शिल्पकार व तेथील माणसांचा वेध घेणा-या कथा लिहिणा-या शंकर पाटलांना खरी प्रसिद्धी लाभली ती धिंडसारख्या कथांच्या कथनामुळे! ५९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले हे शंकर पाटील. आज त्यांचा जन्मदिन.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version