Home महाराष्ट्र कोकण मेवा वृक्षवल्लीतील सत्पुरुष फणस!

वृक्षवल्लीतील सत्पुरुष फणस!

0

आमचा मुलुख आणि मलखातली माणसेच नव्हे तर मुलखातली झाडेपेडे सुद्धा अगदी अस्सल कोकणी आहेत. तसे पहायला गेले तर अगदी फणसासारखी.. आमच्या भागात फणसाला देव माणतात.

आमचा मुलुख आणि मलखातली माणसेच नव्हे तर मुलखातली झाडेपेडे सुद्धा अगदी अस्सल कोकणी आहेत. तसे पहायला गेले तर अगदी फणसासारखी.. आमच्या भागात फणसाला देव माणतात. सांगेली, आरवली गावात तर फणसाच्या झाडावर कुणी शस्त्रही उगारत नाही. आणि कुठेही फणसाचे झाड दिसले तरी त्या समोर या गावातील माणसे नतमस्तक होतात. सांगेलीचा गिरीजानाथ हा फणसाच्या खोडातूनच दर्शन देतो. उन्हाच्या वणव्यात स्वत:चे अंग पोळत असतानाही, आश्रयाला आलेल्या पशु-पक्ष्यांना, गुरा-वासरांना आणि माणसांना सुखाची सावली देणा-या वृक्षांना आमच्या संस्कृत कवींनी सत्पुरुष म्हटले आहे. वृक्षांचे हे जगणे केवळ परोपकारासाठीच असते. आमच्या कोकणी माणसाच्या वाटय़ाला हे वृक्षवैभव जेवढे आलेले आहे, तेवढे इतर भागातील माणसांच्या वाटय़ाला ते क्वचितच आले असेल. विविध जातींच्या आणि आकारांच्या वृक्षांचे कृपाछत्र आमच्या कोकणवर अनादिकाळापासून रंगवली धरून आहे.

कोकणातील अवघ्या वृक्षराजींत अग्रक्रमाने नाव घेतले जाते, ते आंब्या-फणसांचे. त्यातील आंब्याचे झाड आणि फळ सगळय़ा जगाच्या परिचयाचे. आंब्याच्या फळाला फळांचे राजेपण लाभलेले आहे. फणसाच्या वाटय़ाला एवढे मोठेपण मिळाले नसले तरी, त्यांच्यामधील ग-यांचा गोडवा मात्र सर्वाना हवाहवासा वाटतो.

झाडापेडांना भावभावना असतात; सुख-दु:खाच्या जाणिवा असतात, हे शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सिद्ध केलेले आहे. आमचा साधासा कोकणी शेतकरी त्यांच्याही पुढे आहे. येथील वृक्षराजींपैकी बहुतेकांचे स्वभावही त्याला माहीत आहेत. फणसाचे हळवेपण त्यानेच शोधून काढले आहे. त्याच्या मते फणसाचे झाड साध्या, सरळ आणि अत्यंत हळव्या स्वभावाचे आहे. त्याला भरल्या घरातील, एकमेकांवर प्रेम करणा-या मुलांमाणसांच्या कुटुंबाचा सहवास हवाहवासा वाटतो. अशा घराशेजारच्या परसातील फणस इतरांच्या मानाने लवकर फुला-फळांच्या बहराला येतो. अंगणाशेजारच्या फणसाच्या झाडाच्या मुळाशी तयार केलेल्या शेणाने सारविलेल्या दगडमातीच्या गोलाकार ओटय़ावर बसून सायंकाळच्या वेळी आपल्या माणसांसोबत गप्पागोष्टी करणे किती सुखकारक असते, हे कोकणी माणसाला पुरेपूर ठाऊक असते. अशावेळी ते झाडही त्यांच्या गप्पागोष्टीत आणि सुख दु:खातही सामील झाल्यासारखे दिसते.

अशा वृक्षवल्लींचे सोईरेपण लाभलेला आमचा कोकणी माणूस, त्यामुळेच की काय, अन्नवस्त्रांची कमतरता असली तरीही आनंदी आणि सुखी दिसतो. तो माणूस हे सगळे तेथील निसर्गाकडून विशेषत: झाडांपेडांकडून आणि त्यातही विशेष अशा सरळ हळव्या स्वभावाच्या कुटुंबवत्सल अशा फणसाच्या झाडाकडून शिकला असावा.

अशा या लोभस वृक्षाचे आणि त्याच्या गोड फळाचे वर्णन जुन्या मराठी पंडित कवींनी भरभरून केले आहे. ख्यातनाम कवयित्री इंदिरा संत यांनी फणसाच्या झाडाला, ‘कटिखांद्यावर लेवुनी बाळे’ असा उभारलेला कुटुंबवत्सल लेकुरवाळा म्हटले आहे!

अवघ्या कोकणाशी फणसाचे जन्मजन्मांतरीचे नाते आहे. तो येथील मुलांमाणसांशी, गुरांढोरांशी, पशु-पक्ष्यांशी कौटुंबिक नाते जोडून राहिला आहे. माणसांची ‘जाग’ असलेल्या घरांशेजारी, भरल्या ‘आवाठात’ तो अधिक सुखी आणि तृप्त दिसतो. वस्तीपासून दूर निर्मनुष्य माळरानावर उभे असलेले फणसाचे झाड उदास दिसते! ते केवळ कर्तव्यबुद्धीने जगत असल्यासारखे भासते! उलट, घराशेजारच्या परसात सगळय़ा आबालवृद्धांशी बोलत, अंगाखांद्यांवरच्या आपल्या लेकरांना हय़ा सगळय़ा मुलांमाणसांची ओळख सांगत तो मोठय़ा डौलाने जगत असतो. अंगावर भरपूर काटे असले तरी आत रसाळ ग-यांची दाटी असलेले हे फणस इथल्या कोकणी माणसाच्या अंतर्मनाचे खरे दर्शन घडवितात. अंतर्मनाची ही ठेवण येथील माणसाने फणसाकडून घेतली की, फणसाने कोकणी माणसाला दिली, हे एक अजूनही न उलगडलेले नाते आहे!

फणसाची दातृत्वाची, दान देण्याची वृत्ती, उदार कर्णाच्या दातृत्वालाही मागे टाकणारी आहे. आपल्या अवतीभवतीची मुलेमाणसे, गुरेवासरे आणि आपापली गाणी गात भिरभिरणारी पाखरे सुखाने जगताना दिसली की तो खरोखर तृप्त झाल्यासारखा डोलतो. बघता बघता त्याच्या अंगावर सुखाचे शहारे येतात आणि त्याचे रुपांतर मुळापासून शेंडय़ापर्यंत घोसांनी लगडणा-या फणसाच्या काटेरी फळात होते. ही फळे त्याच्या उभ्या अंगावर वाढतातच, पण केव्हा केव्हा त्याच्या पाळा-मुळातल्या मातीतूनही वर येताना दिसतात! मग त्याच्या मालकाची अवस्था, ‘‘देता किती घेशील दो करांनी!’’ अशी होते!!

कोकणी माणूस आणि फणस यांचे हे मैतर दोघांनाही माहीत असते आणि म्हणूनच, कधीकाळी एखाद्या ‘भुकाळ’ माणसाने अशा फणसाच्या झाडावरचे एखादे मूळ चोरून नेले तर, तो मालक अशा चोरीची सहसा बाहेर वाच्चताही करीत नाही, गप्प राहतो. चोरी झाली हे त्या झाडाला आणि मालकालाही ठावे असते. पण त्यासाठी मालकाने त्या चोराला दोष द्यायचा नाही; त्याला अपशब्द, शिवीगाळ करायची नाही. कारण ते फणसाच्या झाडाला बिलकूल आवडणारे नसते. चुकून त्या मालकाने या प्रकाराची कुठे वाच्चता केली, अथवा शिव्या-गाळींचा प्रकार घडला, तर पुढच्या मोसमात ते झाड फुलत-फळत नाही! अशा मूकपणाने ते झाड आपले दु:ख व्यक्त करते.

फणस, हे झाडाचे नावसुद्धा किती सरळ, साधे आहे! त्या नावात कोठे नावालाही काना, मात्रा, वेलांटी अथवा जोडाक्षराचे अस्तित्व नाही. फणसाचा हा स्वभाव सर्वाच्या परिचयाचा आहे. आजही ग्रामीण भागात जनता भाजी म्हणून फणसाची ख्याती कायम आहे. काही लग्न समारंभात, मोठय़ा कार्यक्रमात फणसाची भाजी मोठय़ा आग्रहाने तयार केली जाते. एकूणच भाजीसाठी लागणारा कमी कालावधी आणि चविष्ट तसेच आमच्या मुलखात फणसांची संख्याही जास्त.. यामुळे ‘फणसाच्या भाजीला’ गरिबांची भाजी म्हणून ख्याती मिळालीच आहे. या फणसावर अलिकडे मोठय़ा प्रक्रिया ही सुरु आहेत. वर्षभर फणसाची भाजी खायलाही मिळत आहे, असो..

त्या दिवशी भ्रमंती करत असताना वड पिंपळाच्या झाडीत फणसाचे झाडाने लक्ष वेधून घेतले. अनेक झाडांच्या मगरमिठीतही त्याने आपले अस्तित्व टीकवून ठेवले होते.

पायरीचे, पिंपळाचे, अष्टाचे अथवा वडाचे झाड, वृक्षराजींमधील एका विशिष्ट वर्गात मोडते. अशा वृक्षांची पिकलेली फळे पाखरे मोठय़ा आवडीने खातात. हय़ा फळांच्या मोसमात त्या झाडांवर पाखरांचा चिवचिवाट दिवसभर चालू असतो. अख्खे झाडच चिवचिवत असते.

पक्ष्यांच्या चोचीतून अथवा विष्टेतून दुस-या एखाद्या झाडाच्या फांदीच्या खोबणीत पडलेले ते बी यथावकाश तेथेही रुजते. इतर झाडे अशा परक्या वंशवाढीला सहसा थारा देत नाहीत. फणस अथवा त्याच्यासारखी काही हळवी झाडे मात्र त्यांना ‘असू दे’ म्हणून वाढू देतात.

वट-पिंपळाची ही जात इतर बाबतीत सन्माननीय आणि पूजनीय वगैरे असली तरी हय़ा बाबतीत मात्र ज्यांच्या अंगाखांद्यावर लहानाची मोठी झाली त्यांनाच खाऊन जगण्याच्या प्रयत्नात असतात. फांदीमधील इवलेसे दिसणारे अशा वृक्षांचे रोपटे वाढत असताना आपले एखादे पाळ जमिनीपर्यंत खाली सोडते. जमिनीत घुसून ते अन्न मिळविते आणि बघता बघता, त्या झाडाशी लडिवाळपणे वागून त्याला मिठीत घेते! ही मिठी त्या फणसासारख्या झाडाच्या बाबतीत मगरमिठी ठरते.

हा आक्रमक प्रकार त्या झाडाला जाणवतो त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. हय़ा नव्या अजगरी विळख्यात ते मूळचे झाड आकसून जाते निर्जीव होते; तरीही चिवटपणे त्या अत्याचाराशी सामना देत राहते! चोहोंबाजूंनी प्रतिकूल अवस्थेने घेरलेले असतानाही त्या परिस्थितीवर आकांताने मात करुन जगण्याची प्राण्याची जी दुर्दम्य इच्छा असते तिला जिर्जीविशा असे म्हणतात.

अशाही अवस्थेत अशा मगरमिठीत, देहाचा चोळामोळा झालेला त्या झाडाला, साधा श्वास घेणेही अवघड होऊन जाते तरीही ते झाड तो जीवघेणा अन्याय आणि आक्रमण मुकेपणाने सहन करीत राहते. तशाही अवस्थेत ते झाड आपले जगणे नाकारीत नाही! त्या अत्याचारी झाडाच्या विळख्यातील एखाद्या नखाएवढय़ा फटीतूनही, अस्तित्व संपत आलेल्या फणसाची एखादी छोटीशी फांदी आपले डोके बाहेर काढते; एवढेच नव्हे तर, त्या इवल्याशा फटीतून कधीकधी त्या फणसाचे एखादे गोजिरवाणे बाळही, त्या राक्षसी आक्रमणाची पर्वा न करता स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची धडपड करताना दिसते.

धन-संपत्ती आणि स्वार्थ, प्रतिष्ठा यांच्या मागे, धाप लागेपर्यंत धावण्याची धडपड करणा-या माणसाचे अशा निसर्ग-दृश्यांशी कसलेच सोयर-सुतक नसते. तो केवळ धन-प्रतिष्ठेचा ‘सोयरा’ असतो! त्याचे बाकी कुणाशीही कसलेही नाते नसते.

फक्त निसर्गाशी नाळनाते असलेल्या डोळस आणि संवेदनशील मन असणा-या माणसालाच अशी दृश्ये मूकपणे काही सांगत असतात. अशा निसर्ग दर्शनाने त्यांच्या जीवनात त्यांना आजवर न उलगडलेली काही कोडी उलगडू लागतात. जिजीविशा जागी होते आणि त्याचवेळी, त्यांचे निसर्गाशी भावंडपणाचे नाते जुळू लागते.

आक्रमक वृक्षाच्या अशा अत्याचारी विळख्यात, प्राणांतिक वेदनांनी व्याकूळ झालेल्या अवस्थेतही जीवननिष्ठा आणि जीवनमूल्यांची जपणूक करण्याची जीवघेणी धडपड करणारे ते फणसाचे झाड, मानवी जीवनातील कितीतरी घटनांचा अर्थ सांगून जाते?.

हजारो यावनी सैनिकांच्या गराडय़ात, चार मोजक्या सहका-यांना सोबत घेऊन बाजीप्रभू देशपांडे कित्येक तास का लढत राहिले? मूर्तिमंत मृत्यू समोर उभा ठाकलेला असतानाही, कोवळय़ा वयाचा अर्जुनपुत्र अभिमन्यू, कौरव रचित चक्रव्युहाचा भेद, एकाकीपणाने, घायाळ अवस्थेत का करीत राहिला? प्रतापगडाच्या पायथ्याशी, रेडय़ाची ताकद असलेल्या अफजलखानाच्या अजगरी विळख्यात श्री शिवछत्रपतींना आपली स्वाभिमानी मान स्वत: होऊन का द्यावी लागली? जीवनमूल्यांची आणि जीवननिष्ठांची जोपासना करणारा निसर्ग आपणाला मानवी जीवनाचाही अर्थ उलगडून सांगत असतो. मात्र त्याचे हे ‘सांगणे’ समजणारे संवेदनशील मन आपणाजवळ हवे?

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version