Home टॉप स्टोरी वीरेंद्र तावडेच सूत्रधार

वीरेंद्र तावडेच सूत्रधार

0

सीबीआयची न्यायालयात माहिती, सचिन अंदुरेला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. त्याला पुणे शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे हल्लेखोर होते, तर दाभोलकरांच्या हत्येचा कट वीरेंद्र तावडेने रचला होता, अशी माहिती सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिली. तसेच सचिन आणि शरद सोबत आणखी दोघे जण होते. या प्रकरणी आता आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन प्रकाशराव अंदुरे याला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयात आणले असता, न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

न्यायालयामध्ये सीबीआयच्या वकिलांकडून १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण, विशेष न्यायाधीश अर्चना मुजुमदार यांनी त्याला ७ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे. सचिन अंदुरे हा प्रत्यक्ष मारेकरी आहे, त्याच्याकडून हत्यार आणि वाहन ताब्यात घ्यायचे आहे. त्याने ट्रेनिंग कुठे घेतले, कोणी त्याला ट्रेनिंग दिले होते याची माहिती आरोपीच्या चौकशीतून समोर येऊ शकते. त्यामुळे १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांकडून करण्यात आली होती. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून सचिन प्रकाशराव अंदुरे याला अटक केली होती. दरम्यान, माझ्या भावावरील आरोप चुकीचे असून, त्याला या प्रकरणात फसवले जात आहे, असा आरोप आरोपीचा भाऊ प्रवीण अंदुरे याने न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल, तर त्याला अटक केली जाईल अन्यथा सोडून देऊ, असे एटीएस अधिका-यांनी सचिनच्या कुटुंबीयांना सांगितले होते. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करून सीबीआयकडे सोपवण्यात आले.

शरद कळसकर आणि सचिन अंदुरे दोघे औरंगाबादचे आहेत. कळसकर केसापुरी गावचा रहिवासी आहे. तो कोल्हापुरात नोकरीला असल्याचे सांगायचा. सचिन अंदुरे कुंवारफल्ली राजाबाजार येथे राहतो. निराला बाजार येथे एका कपडय़ाच्या दुकानात तो कामाला आहे. पत्नी, भाऊ आणि एक वर्षाची मुलगी असा त्याचा परिवार आहे.

मे महिन्यात औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीत त्याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. सचिनच्या फेसबुक अकाऊंटवरून तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे स्पष्ट झाले.

श्रीकांत नावाच्या आणखी एका व्यक्तीला जालन्यातून अटक करण्यात आली असून, त्यामुळे पुढच्या काही दिवसांत आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मागच्या पाचवर्षांपासून तपास सुरु आहे. सचिन अणदुरेच्या अटकेने या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर पुण्यात असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ ते साडे आठ दरम्यान त्यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात बंदुकधा-यांनी अत्यंत जवळून त्यांच्यावर चार गोळया झाडल्या होत्या. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला होता.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. गोविंद पानसरे या दोन्ही हत्या प्रकरणात तपासाच्या प्रगतीबद्दल मुंबई उच्च न्यायलयाने नाराजी व्यक्त करुन सीबीआय आणि विशेष तपास पथकाची (एसआयटी) कानउघडणी केल्यानंतर दोन आठवडयांनी ही अटकेची कारवाई झाली आहे.

न्यायाधीश एससी धर्माधिकारी आणि न्यायाधीश भारती दानग्रे यांच्या खंडपीठासमोर दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकांवर सुनावणी झाली. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने राज्यातील स्थिती समाधानकारक नाही. पोलिसांवर दगड फेकले जात आहेत. जमाव रस्त्यावर आहे. बस जाळल्या जात आहेत. हे सर्व दु:खद आहे असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले होते.

दोन्ही हत्या प्रकरणातील मारेक-यांना पकडू न शकल्याबद्दल न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटी दोघांची कानउघडणी केली होती. तुम्ही अधिकारी काश्मीर ते त्रिपुरापर्यंत प्रवास करता पण रिकाम्या हाताने परत येता या शब्दात सुनावले व तपास अहवाल स्वीकारण्यास नकार दिला. सरकार बदलतील पण तुम्हाला तपास करावा लागेल. तुम्ही तुमच्या अहवालात तेच तेच सांगत आहात. अजून तपासात प्रगती का नाही झाली ? असा सवाल न्यायालयाने विचारला होता.

या सुनावणी दरम्यान, सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली. दाभोळकर हत्येचा कट वीरेंद्र तावडेने रचला होता. सचिन आणि शरदच्या मदतीने हा कट रचला होता. कट पूर्ण करण्याची जबाबदारी सचिन आणि शरदवर होती. त्यांच्यासोबत आणखी २ जण होते. दाभोळकरांवर सचिन आणि शरदनेच गोळ्या झाडल्याा. हत्येनंतर हत्येत वापरलेले हत्यारं आणि बाईक नष्ट केल्याचा संशय आहे अशी माहिती सीबीआयच्या वकिलांनी दिली. तसंच हा एक मोठा कट होता असा दावाही त्यांनी केला. सात दिवसांत सचिनची अजून चौकशी होणार आहे या चौकशीतून लवकरच आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

१०  जून २०१६ रोजी डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीच्या कार्यकर्ता विरेंद्र तावडेला नवी मुंबईतून सीबीआयने अटक केली होती. पनवेलमध्ये विरेंद्र तावडेच्या घरी धाड टाकण्यात आली होती. सीबीआयने चौकशी अंती अखेर विरेंद्र सिंग तावडेंला अटक केली होती. वीरेंद्र हा सनातनचा साधक आहे आणि हिंदू जनजागृती समितीशीही संबंधित आहे. तावडे हा डॉक्टर असून तो कान नाक घसा तज्ज्ञ आहे. सीबीआयने वीरेंद्र आणि सारंग आकोलकर यांच्या घरांवर छापे टाकले होते. त्यानंतर हे दोघे ईमेलने संपर्कात होते. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्ती सनातनशी संबंधित आहे, हा एक समान दुवा आहे.

‘प्रोजेक्ट दाभोलकर’
गोवा बॉम्बस्फोटातला संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि तावडे या दोघांनी २००८ ते २०१३ या कालावधीत एकमेकांना २०० इमेल्स पाठवले होते. दाभोलकरांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भात या मेलमध्ये संभाषण झाले असल्याचे सीबीआयच्या सूत्रांमार्फत समोर येते आहे. या कटाला ‘प्रोजेक्ट दाभोलकर’ असे नाव देण्यात आले होते. तसेच दाभोलकरांची हत्या करण्यासाठी त्यांना विदेशी बनावटीची बंदूक हवी होती. कारण, गावठी बनावटीच्या बंदूक निकामी होण्याची शक्यता असते आणि त्यांना ही जोखीम घ्यायची नव्हती. म्हणून त्यांना परदेशी बनावटीची बंदूकच हवी होती. तसेच ही बंदूक कोठून खरेदी करायची, या संदर्भातही त्यांच्यात इमेलवरून संवाद झाल्याचे समोर आले आहे.

कोण आहे वीरेंद्र तावडे?
>> तावडे मूळचा कोकणातल्या देवगड तालुक्यातील
>> तावडे हा कान -नाक – घसा तज्ज्ञ
>> पत्नीही वैद्यकीय व्यवसायामध्ये
>> सनातनचा साधक, हिंदू जनजागरण समितीशी संबंध
>> पनवेलमध्ये सनातनच्या आश्रमाजवळच तावडेचे घर
>> तावडे जवळपास आठ वर्ष साता-यात होता

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version