Home व्यक्तिविशेष विष्णुदास अमृत भावे

विष्णुदास अमृत भावे

0

मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास अमृत भावे यांचा आज स्मृतिदिन. सन १८१८ मध्ये सांगली येथे जन्मलेले विष्णुदास भावे चिंतामणराव पटवर्धनांकडे नोकरीस होते. १८४२ मध्ये कर्नाटकातून आलेल्या भागवत नाटक मंडळींचे खेळ पाहून चिंतामणरावांनी विष्णुदासांना असे खेळ करण्यास सांगितले. १८४३ मध्ये विष्णुदासांनी सीता स्वयंवर या स्वरचित नाटकाचा खेळ केला. हाच मराठी रंगभूमीचा शुभारंभ! पुढे विष्णुदासांने रामायण व महाभारताच्या कथानकावर नाटके लिहिली. अशाप्रकारे लिहिलेली सुमारे ५० नाटय़कविता संग्रह नावाने १८८५ मध्ये प्रसिद्ध झाली. १८५१ नंतर भावे यांनी आपल्या खेळांचे दौरे सुरू केले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेपट व रंगभूषा हे सर्व सांभाळणा-या भावे यांनी १८६१ पर्यंत हा व्यवसाय केला. त्यांची नाटके पद्यमय व प्राचीन मराठी आख्यानांशी संबंधित असत. आपल्या नाटय़ाख्यानांचा स्वरसाज चढवताना भावे विविध रागरागिण्या व त्यांच्या मिश्रणांचा प्रभावीपणे वापर करत. नाटय़प्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटक मंटळी विष्णुदासांनीच प्रथम उभी केली. अशा या मराठी रंगभूमीच्या जनकाने दि. ९ ऑगस्ट १९०१ रोजी आपल्या जीवनपटावर अखेरचा पडदा टाकला. आज त्यांचा स्मृतिदिन.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version