Home संपादकीय विशेष लेख विषबाधेने बदनाम तेजस.!

विषबाधेने बदनाम तेजस.!

0

दे शभरातील रेल्वेप्रवासात जी खानपानाची व्यवस्था असते यासंबंधी अनेक वेळा तक्रारीही रेल्वे मंत्रालयाकडे आल्या आहेत. कोकण रेल्वेमार्गावर मात्र आजवर प्रवाशांना ‘तेजस’इतका वाईट अनुभव कधीही आला नव्हता. कोकण रेल्वे बोर्डाने तेजस एक्स्प्रेसमधील उपलब्ध सोईसुविधा आणि हवे ते अन्नपदार्थ देण्याची असणा-या विशेष सुविधेचा उल्लेख करीत प्रवाशांच्या मनावर एक वेगळीच भुरळ पाडली होती. छत्रपती शिवाजी टर्मिनसला जेव्हा कोकण रेल्वे मार्गाकडे धावण्यासाठी तेजस एक्स्प्रेस उभी असते तेव्हा अनेक प्रवाशांच्या मनात एकदा तरी या तेजसने प्रवास केला पाहिजे, असे सहज येऊन जाते. संपूर्ण वातानुकूलित असलेली ही रेल्वे गाडी आणि स्वयंचलित दरवाजे यामुळे या तेजससंबंधीचे वेगळेच आकर्षण जनसामान्यांच्या मनात निर्माण झाले आहे.

सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना त्यांच्या कार्यकालामध्ये कोकणमार्गावर तेजस ही अशी संपूर्ण वातानुकूलित रेल्वे सुरू करण्यात आली. ज्यावेळी प्रथम कोकणच्या या रेल्वेमार्गावर तेजस धावली, त्यावेळी कोकणातील प्रवासी जनतेच्या मनात या तेजससंबंधीच्या वेगवेगळ्या कल्पना येऊन गेल्या. त्यानंतर आठवडाभरातच तेजसमधील प्रवाशांकडून एलसीडी स्क्रीन आदी वस्तू चोरीला गेल्याचे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. यामध्येही नाहक कोकणवासीयांची आणि मुंबईकर प्रवाशांची बदनामी झाली. मात्र, वास्तवात यासंबंधी प्रवाशांचा काहीही संबंध नव्हता हे देखील रेल्वे कर्मचा-यांनी केलेल्या चोरीच्या फुटेजमुळे जनतेसमोर आले. अशी ही तेजस रेल्वे प्रारंभापासूनच या ना त्या कारणाने सातत्याने माध्यमांमध्ये वाजतगाजत राहिली.

मात्र तरीही या तेजससंबंधीचे प्रवाशांच्या मनात असलेले आकर्षण कमी झालेले नाही. गेल्या आठवडाभरात कोकण रेल्वे मार्गावरून धावणा-या या तेजस रेल्वेगाडीतून ४८ प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. प्रवाशांनी खाल्लेले हे अन्न कुठल्या स्थानकावरून उपलब्ध झाले यासंबंधीची कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाकडून पुढे आलेली नाही. वास्तविक ज्या तेजसमध्ये अन्नातून विषबाधेची ही एवढी गंभीर घटना घडल्यानंतर त्याचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होणे आवश्यक होते. परंतु, यासंबंधित विभागाच्या दोन कर्मचा-यांना तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करून नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कशा रीतीने गुंडाळता येईल यासाठीच प्रयत्न चालविल्याची आता चर्चा होऊ लागली आहे. एकीकडे कोकणामध्ये प्रतिवर्षी पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. मोठय़ा प्रमाणावर पर्यटक कोकणामध्ये येत आहेत. बहुतांश पर्यटक कोकणातील पर्यटनासाठी येताना कोकण रेल्वे मार्गाचाच वापर करतात. तेजससारख्या प्रवाशांना आकर्षित करणा-या रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्याही वाढू शकते.

परंतु रेल्वे प्रशासनाकडून तेजसची होत असलेली बदनामी थांबविली गेली पाहिजे. यासाठी केवळ या अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेपुरतेच नव्हे, तर एकूणच कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासात प्रवाशांना अधिक आनंददायी आणि सुरक्षित प्रवास कसा करता येईल यासाठीचे प्रयत्न आणि सुविधा प्रशासनाने उपलब्ध केल्या पाहिजेत. यापूर्वीही रेल्वे गाडय़ांतून दिल्या जाणा-या अन्नासंबंधी तक्रारी झाल्या आहेत. कधी बिर्याणीमध्ये झुरळ सापडले आहे, तर कधी फ्रुट सॅलड संबंधीही रेल्वे प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. कदाचित रेल्वे प्रशासनाकडे यासंबंधीच्या लिखित स्वरूपाच्या तक्रारी केल्या गेल्या नसतील. परंतु या रेल्वे मार्गावर रेल्वे गाडय़ांमधून जे अन्नपदार्थ पुरविले जातात त्यासंबंधी मात्र अनेक प्रवाशांच्या तक्रारी राहिल्या आहेत. तेजस रेल्वेमधील ४८ प्रवाशांना झालेल्या विषबाधेमुळे रेल्वे प्रवासात मिळणारे अन्नपदार्थ प्रवाशांनी घ्यावेत की घेऊ नयेत, अशी साशंकताच यानिमित्ताने निर्माण झाली आहे. रेल्वे प्रवासामध्ये पुरविले जाणारे अन्नपदार्थ त्यासंबंधीचा दर्जा हा एक वेगळा चर्चेचा आणि लिखाणाचा विषय आहे. दोन वर्षापूर्वी राजधानी एक्स्प्रेसमधून दिले जाणारे अन्नपदार्थ कुठे बनविले जातात त्यासंबंधीची माहिती वृत्तपत्रांतून प्रसिद्धही झाली आहे.

यामुळे नेहमीच रेल्वे प्रवासात दिल्या जाणा-या अन्नपदार्थाविषयी प्रवासी जनतेमध्ये भीती निर्माण झालेली असते. परंतु अन्य कोणताही पर्याय नसल्याने जे उपलब्ध आहे, ते घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. यामुळेच मग ज्या प्रकारचे अन्नपदार्थ पुरवले जातात ते अन्नपदार्थ घेतले जातात. त्यातूनच गेल्या आठवडय़ात घडलेल्या तेजस एक्स्प्रेसमधील विषबाधेसारखे प्रकार घडतात. रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना चांगले दर्जेदार अन्न कसे मिळेल, हे पाहावे, एवढीच कोकणवासीयांची अपेक्षा आहे!
मोबाईल – ९४२२४३६६८४

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version