Home महामुंबई विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारा अटकेत

विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारा अटकेत

0

 व्यावसायिक वादातून मित्राला धडा शिकवण्यासाठी विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणा-यास गुन्हे प्रकटीकरण कक्ष ८ ने नुकतीच अटक केली आहे.

मुंबई – व्यावसायिक वादातून मित्राला धडा शिकवण्यासाठी विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणा-यास गुन्हे प्रकटीकरण कक्ष ८ ने नुकतीच अटक केली आहे. संदीप उन्नी मेनन असे त्याचे नाव आहे. संदीप हा आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि कोचिंग क्लासेससाठी सॉफ्टवेअर विकसित करतो. दरम्यान, पोलिस त्याची चौकशी करत आहेत.संदीप हा मूळचा केरळ येथील रहिवासी असून, तो सध्या विलेपार्ले येथे राहत आहे.

संदीप हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये आणि नामांकित कोचिंग क्लासेससाठी व्हच्र्युअल ई-क्लासचे सॉफ्टवेअर विकसित करतो. संदीप याची काही दिवसांपूर्वीच ओमान येथील क्युबूस विद्यापीठात काम करणा-या अंबरीश पारीख याच्याशी ओळख झाली होती.

अंबरीश शनिवारी पवई आयआयटी येथे ई-परीक्षेसाठी आला होता. त्याच वेळी व्यावसायिक कारणावरून त्या दोघांमध्ये भांडण झाले. त्यामुळे संदीपने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने शनिवारी रात्री साडेआठ वाजता विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यालयात फोन करून गो-एअरलाइन्सच्या मुंबईहून दिल्लीला जाणा-या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. तसेच अंबरीश पारीख ही व्यक्ती देखील त्याच विमानातून प्रवास करणार असल्याचे सांगितले.

या घटनेची दखल घेऊन विमानास सुरक्षितस्थळी नेऊन तपासणी करण्यात आली. मात्र, बॉम्ब अथवा स्फोटके न आढळल्याने अंबरीशला सोडून देण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास विमान दिल्लीला रवाना झाल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण कक्ष ८ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिली. दरम्यान, त्यानंतर या प्रकरणाचा कक्ष ८ ने तपास सुरू केला. मोबाइल लोकेशनवरून पोलिसांनी संदीपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संदीपने मोबाइल कंपनीला पत्ताही चुकीचा दिल्याचे आढळले.

सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याला अंधेरी-कुर्ला रोड येथून अटक केल्याची माहिती कक्ष ८ च्या पोलिस निरीक्षक ज्योत्सना रासम यांनी दिली. अंबरीश याच्याशी व्यावसायिक कारणांवरून भांडण झाल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी हा दूरध्वनी केल्याची कबुली संदीपने पोलिसांना दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version