Home महाराष्ट्र कोकण विधिमंडळात पुन्हा गरजला कोकणचा बुलंद आवाज!

विधिमंडळात पुन्हा गरजला कोकणचा बुलंद आवाज!

0

तोच जोश, तोच आवेश, तोच आत्मविश्वास आणि तीच अभ्यासू मांडणी पुन्हा एकदा विधानसभा सदस्यांनी अनुभवली. कोकणचा बुलंद आवाज विधानसभेत पुन्हा दणाणला. प्रत्येक शब्दात कोकणबद्दल तळमळ व्यक्त होत होती.

तोच जोश, तोच आवेश, तोच आत्मविश्वास आणि तीच अभ्यासू मांडणी पुन्हा एकदा विधानसभा सदस्यांनी अनुभवली. कोकणचा बुलंद आवाज विधानसभेत पुन्हा दणाणला. प्रत्येक शब्दात कोकणबद्दल तळमळ व्यक्त होत होती.

प्रत्येक वाक्यात कोकणच्या लाल मातीचा गंध दरवळत होता. तोफगोळे बरसावेत, अशा आत्मविश्वासाने शब्द फेकले जात होते आणि विरोधी बाकांसह सत्ताधारी बाकावरून त्याला तितकाच दमदार प्रतिसाद मिळत होता.

काँग्रेसचे तरुण, तडफदार आमदार नितेश राणे यांच्या तडाखेबंद भाषणाने सभागृहासह विधान भवनातील प्रत्येक गॅलरीतील लोकांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अभ्यासू भाषणांची आठवण झाली!

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज त्या मानाने खूपच संथ आणि शांत पद्धतीने सुरू आहे. अधिवेशनातील शेवटून दुस-या आठवडयापर्यंतचे कामकाज तसे खूप थंडपणे सुरू होते; परंतु मुंबई आणि कोकणच्या

प्रश्नावर नियम २९३अन्वये विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर बोलत असताना आमदार नितेश राणे यांचा जो टिपेचा सूर लागला त्याची सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी तर प्रशंसा केलीच; पण विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्यासह अनेक ज्येष्ठ अधिका-यांनी खास भेटून नितेश राणे यांचे अभिनंदन केले.

तसे कोकणच्या कोणत्याही प्रश्नाबाबत नितेश राणे सभागृहात आणि सभागृहाबाहेर कायम आक्रमक असल्याचे वारंवार दिसून आले आहे. ज्या जनतेने आपल्याला मोठया आत्मविश्वासाने निवडून दिलेले आहे, त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याची आपली जबाबदारी आहे, याची जाणीव नितेश राणे यांच्या वागण्यात आणि सभागृहातील बोलण्यात दिसत असते.

विधिमंडळाच्या प्रत्येक आयुधांचा वापर करून ते कोकणचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळीच त्यांनी कोकणवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करून फक्त कोकणच्या प्रश्नावर नियम २९३ अन्वये प्रस्ताव घेऊन त्यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

ते म्हणाले होते, ‘‘विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते, तेव्हा विदर्भ आणि मराठवाडयातील प्रश्नांवर चर्चा होते. मुंबईत अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशन होते तेव्हा मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा होते. त्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी अशी चर्चा होणे गरजेही आहे. त्याबद्दल दुमत नाही; मात्र जितके विदर्भ, मराठवाडयाचे प्रश्न गंभीर आहेत, तितकेच कोकणचे प्रश्नही गंभीर होऊ लागले आहेत.

मात्र कोकणच्या प्रश्नावर कधीच चर्चा होत नाही. तेव्हा पुढे येणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी कोकणवर चर्चा घेण्यात यावी,’’ अशी अपेक्षा नितेश राणे यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात व्यक्त केली होती.

सभागृहात उपस्थित असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तो मुद्दा पटल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात ती चर्चा घेण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे गेल्या आठवडयात नियम २९३चा प्रस्ताव विधानसभेत चर्चेला आला; मात्र तो फक्त कोकणच्या प्रश्नावर नाही, तर मुंबई आणि कोकणच्या प्रश्नावर एकत्रित प्रस्ताव आलेला आहे.

अर्थातच प्रस्तावात मुंबईचा समावेश असल्याने बहुतेक वक्त्यांनी बोलत असताना मुंबईच्या प्रश्नांवरच आपली मते मांडणे जास्त महत्त्वाचे समजले. फारच कमी लोक कोकणच्या प्रश्नावर बोलले. खरे तर कोकणातील जनतेने शिवसेनेला भरभरून मताचे दान दिलेले आहे.

सध्या मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या १० सदस्यांपैकी पाच सदस्य कोकणातील आहेत. शिवसेनेने इतके दिलेले असताना शिवसेनेच्या फारच कमी आमदारांनी या प्रस्तावावर बोलताना कोकणचे प्रश्न मांडले. बहुतेक शिवसेनेच्या आमदारांनीही बोलत असताना मुंबईच्याच प्रश्नाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून आले.

कोकणच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी आमदार नितेश राणे यांचा नंबर आला, तेव्हा मात्र त्यांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. कोकणच्या विकासासाठी आम्ही फार मोठा निधी आणल्याच्या वल्गना सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाच्या आमदार आणि मंत्र्यांकडून केल्या जात आहेत, त्या कशा चुकीच्या आहेत, याची आकडेवारीच सभागृहात सादर करून त्यांनी सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडला. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून कोकणवर जो अन्याय होत आहे; त्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी, अशी आमची मागणी होती.

मात्र त्याच प्रस्तावात मुंबईलाही समाविष्ट केले आणि आपोआपच सर्वाचे लक्ष मुंबईच्या प्रश्नाकडे केंद्रित झाले आणि कोकणच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. खरे तर कोकणच्या प्रश्नावर राज्यातील इतर लोकांनी बोलावे, अशी अपेक्षा नाही.

किमान कोकणातून निवडून येणा-या आमदारांनी तरी कोकणवर बोलायला हवे होते. शिवसेनेला तर कोकणातील जनतेने भरघोस यश दिले. पाच-पाच कोकणातील लोक मंत्री झाले; पण त्यामुळे कोकणातील जनतेच्या पदरात काय पडले आहे, हा खरा प्रश्न आहे.

शिवसेनेचे आमदार-मंत्री इथे सभागृहात काही बोलत नाहीत; मात्र तिकडे गावाला जाऊन आम्ही कोकणच्या विकासाठी फार मोठा निधी आणला असल्याच्या थापा झोकात मारत असतात. मी आज त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडणार आहे, असे सांगून नितेश राणे म्हणाले की, विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थराज्यंमत्री दीपक केसरकर यांनी कोकणासाठी मोठमोठे आकडे दिल्याच्या घोषणा केल्या.

६०० कोटी कोकणसाठी आणले, असे सांगितले. कोकणच्या विकासासाठी सहाशे कोटी मिळाले, हे ऐकून मलाही बरे वाटले; परंतु जेव्हा मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असा कोणताही निधी मंजूर झाल्याची माहिती मला कुणीही आजपर्यंत देऊ शकलेले नाही. अर्थराज्यमंत्र्यांनी ६०० कोटी कोकणाला देणार, असे जाहीर केले तेव्हा मी लगेच त्यांच्या कार्यालयाला पत्र लिहून हे ६०० कोटी नेमके कोणत्या कामासाठी आले आहेत, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

तर त्यांच्या कार्यालयाने मला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती घ्या, असे सांगितले. मी जिल्हाधिका-याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला ६०० कोटी कोणकोणत्या कामासाठी आले आहेत, याची माहिती पत्र पाठवून विचारली. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले की, नियोजन विभागाला विचारा, मी नियोजन विभागाला पत्र लिहिले तर त्यांनी पुन्हा सांगितले, पालकमंत्र्यांच्या पीएला विचारा. म्हणजे कुणीही नीट माहिती देऊ शकलेले नाही.

पुन्हा म्हणाले की, पर्यटनासाठी १०० कोटी आणले आहेत. मी प्रत्यक्ष माहिती घेतली तेव्हा केवळ ३४ लाख रुपयांची तरतूद केली असल्याचे समोर आले असल्याचे नितेश राणे यांनी सभागृहात आकडेवारीसह दाखवून दिले, तेव्हा विरोधी पक्षांच्या बाकावरील सदस्यांनी जोरदार बाके वाजवून नितेश राणे यांच्या भाषणाचे कौतुक केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. त्याचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केला आहे; परंतु पर्यटनासाठी येणारे लोक कायदा आणि सुव्यवस्था पाहून येथे येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बेकायदा धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.

मटका, जुगार, वेश्याव्यवसाय बोकाळला आहे, असे होणार असेल तर तिथे पर्यटनासाठी कोण येईल? कोकणातील पर्यटन वाढावे म्हणून आघाडी सरकारच्या काळात ‘सी वर्ल्ड प्रकल्प’ आणला होता. जगात या प्रकल्पाला भेट देणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा प्रकल्प झाला असता तर स्थानिक तरुणांना मोठया प्रमाणात रोजगार मिळाला असता; मात्र गेल्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्णपणे रेंगाळलेला आहे, असे नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले.

खरे तर तीन दिवस रेंगाळलेली कोकणची चर्चा पुढे पुढे ढकलली होती; परंतु गुरुवारी चर्चा कराच, असा आग्रह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी धरला. नितेश राणे बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते.

बहुतेक पत्रकार, प्रेक्षक, अधिकारी गॅलरी रिकाम्या झाल्या होत्या. सभागृहातही काही मोजकेच आमदार होते; पण नितेश राणे यांचा आवाज आणि बोलण्याचा जोश ऐकून पुन्हा पत्रकार आणि अधिकारी गॅलरी गजबजली.

लॉबीत असलेले अनेक आमदारही सभागृहात येऊन बसले. आपल्या ३५ मिनिटांच्या तडाखेबंद भाषणाने नितेश राणे यांनी सभागृह अक्षरश: जिंकून घेतले. भाषण आटोपून नितेश राणे निघाले तेव्हा अनेक आमदारांनी आपल्या आसनावरून उठून नितेश राणे यांच्याशी हस्तांदोलन करत अभिनंदन केले.

सभागृहातून बाहेर आल्यानंतर विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी खास अभिनंदन केले. प्रत्येक जण आम्हाला नारायण राणे यांच्या भाषणाची आठवण झाल्याचे आवर्जून सांगत होता. कोकणचा बुलंद आवाज पुन्हा विधानसभेत दुमदुमला, अशीच प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडत होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version