Home ताज्या घडामोडी विघ्नहर्त्यांला विघ्न खड्डय़ांचे

विघ्नहर्त्यांला विघ्न खड्डय़ांचे

0

रस्त्यांवर शंभर टक्के खड्डे, करदाते मुंबईकर खड्डय़ातच

मुंबई – मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे आजही सुस्थितीत आहेत. दरम्यान, खड्डय़ांबाबत आलेल्या तक्रारींपैकी ९५ टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र रस्त्यांची खड्डय़ांमुळे झालेली चाळण पाहता या वर्षीही बाप्पाचे आगमन हे खड्डय़ातून होणार आहे. त्यामुळे या वर्षीही विघ्नहर्त्यांला खड्डय़ांच्या विघ्नातून मार्ग काढावा लागणार आहे.

वर्षाच्या १२ महिने खड्डे बुजवण्याचे काम प्रशासनाच्या माध्यमातून सुरूच असते. तरीही रस्त्यात खड्डे की, खड्डय़ात रस्ते हे गणित अद्याप सुटलेले नाही. खड्डे बुजवण्याच्या नावाखाली दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च होऊनही रस्त्यांवरील खड्डे काही केल्या कमी होत नाहीत. त्यामुळे करदात्या मुंबईकरांचे पैसे जातात कुठे, असा सवाल उपस्थित होतो.

सर्वाच्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. मुंबईतील व्हीआयपी रस्ते वगळता प्रत्येक रस्ता खड्डय़ातच गेला आहे. दरवर्षी खड्डय़ांच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत असतात. यावर्षीही खड्डय़ांबाबत तक्रारी आल्या. परंतु आलेल्या तक्रारींपैकी ९५ टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचा दावा पालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी केला आहे. खड्डे बुजवण्याचे काम पालिका प्रशासनाकडून होत असतेच. मात्र पावसाची उघडझाप सुरू असल्याने खड्डे पुन्हा पडतात. पावसाचे फक्त चार महिने असतात. बाकी आठ महिने उन्हाळा व हिवाळाच असतो. तरीही रस्त्यांवरील खड्डे सुस्थितीतच असतात. त्यामुळे खड्डय़ांचे खापर पावसावर फोडण्याचे काम प्रशासन करते, असा आरोप मुंबईकरांकडून होत आहे.

एमएमआरडीए, पीडब्ल्यूडीचेही खड्डे – महापौर
मुंबईतील रस्ते हे फक्त मुंबई महापालिका प्रशासनाचेच आहेत, असे नाही. एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, म्हाडा अशा विविध यंत्रणांच्या अखत्यारितही खड्डे आहेत. मात्र प्रत्येक वेळी लक्ष पालिका प्रशासनालाच केले जाते, असे सांगत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिवसेना व प्रशासनाची पाठराखण केली.

मंडप परवानगीसाठी सुट्टीला कार्यालय सुरू
मुंबई – मुंबईतील १,४६३  गणेशोत्सव मंडळांपैकी आतापर्यंत ५२७ मंडळांनाच मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. उर्वरित मंडळांना मंडपासाठी सुट्टीच्या दिवशीही परवानगी देण्यात येणार आहे. शनिवारी व रविवारी सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या तीन दिवसांत उर्वरित मंडळांना परवानगीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. गणेशोत्सव मंडळांसोबत झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी मंडपांच्या परवानग्या वेळेत मिळत नाहीत. परवानगीची समस्या यंदाही कायम राहिली आहे. गणशोत्सव जवळ आला असतानाही निम्म्याहून अधिक मंडळांना अजूनही परवानग्या मिळालेल्या नाहीत. ते टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version