Home व्यक्तिविशेष विंदा करंदीकर

विंदा करंदीकर

0

‘देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणा-याचे हात घ्यावे’, ‘तुडुंब भरलीस मातृत्वाने, काजळ वाहवले गालावर, मोहोर गळाला मदिर क्षणांचा, कुणी प्रगटली निवले अंतर’ अशांसारख्या एकाहून एक सरस कविता लिहिणा-या कवी विंदा करंदीकरांचा आज जन्मदिन. दि. २३ ऑगस्ट १९१८ या दिवशी कोर्ले-धालवली ता.देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे गो. वि. करंदीकरांचा जन्म झाला. इंग्रजीचे प्राध्यापक असणा-या विंदांनी ‘स्वेदगंगा’, ‘धृपद’, ‘जातक’, ‘विरुपिका’, ‘संहिता’ असे कवितासंग्रह तर ‘राणीचे बाग’,‘परी ग परी’,‘सर्क सवाला’ यांसारखेच बालकवितासंग्रह दिले. ‘स्पर्शाची पावली’, ‘आकाशाचा अर्थ’ यांसारखे लघुनिबंध संग्रहाबरोबरच ‘अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’,‘परंपरा आणि नवता’ अशी साहित्यशास्त्रावरील पुस्तके लिहिली. पण विंदा आठवतात ते वसंत बापट आणि पाडगावकरांसह त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या काव्यवाचनामुळे! दर्जेदार मराठी कवितांना घरे मिळवून देण्याचा हा अफाट यशस्वी प्रयोग होता. मार्क्‍स आणि गांधीवादावर अढळ निष्ठा असणा-या विंदांनी पुरस्कारापोटी मिळालेले लक्षावधी रुपये सामाजिक संस्थांना देऊन ‘देणाराने देत जावे’,या आपल्या काव्यपंक्तीचा अनुभव रसिकांना दिला. केंद्र शासनाची चार, राज्य शासनाची दहा, आशान पारितोषिक, सोव्हिएत लँड गौरव पुरस्कार, मध्य प्रदेशचा कबीर सन्मान, महाराष्ट्र फौंडेशनचा गौरव पुरस्कार किती नावे सांगावीत? डझनवारी पुरस्कार लाभलेला हा जिंदादिल कवी. समाजाभिमुख कविता लिहिणारे विंदा ‘मानवाचे अंती गोत्र एक’ हे जसे लिहितात तसेच ‘सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी’ अशी भावगीतेही लिहितात. आज त्यांचा जन्मदिन.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version