Home महाराष्ट्र वाढदिवसाचे होर्डिंग लावल्यास हकालपट्टी

वाढदिवसाचे होर्डिंग लावल्यास हकालपट्टी

0

मनसेच्या कोणत्याही पदाधिकारी,  कार्यकर्त्यांनी वाढदिवसांचे होर्डिंग लावल्याचे आढळल्यास संबंधितांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात येणार आहे.

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) कोणत्याही पदाधिकारी, गटनेते, कार्यकर्ते यांच्या वाढदिवसांचे होर्डिंग लावल्याचे आढळल्यास संबंधितांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, अशी तंबी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याचे ठरवले आहे. शनिवारी पुण्यात आयोजित केलेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी पक्षात कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असे ठणकावून सांगितले.

लवकरच पक्षीय संघटनेत फेरबदल करणार आहे. पक्षाने ज्याच्यावर जी जबाबदारी दिली, त्याच्या चौकटीतच त्याने काम करावे लागेल. आपले काम सोडून इतर कामांत हस्तक्षेप केल्यास पक्षाबाहेर जाल. मागील काळात अनेकांनी बेशिस्तपणा केला तो खपवून घेतला. पण यापुढे बेशिस्तपणा मला चालणार नाही अशा इशारा राज यांनी नेते, पदाधिका-यांना दिला.

राजकारणात फक्त निवडणूक महत्वाची नसते. केवळ मते मिळवण्यासाठी जनतेकडे जाऊ नका. त्यांचे प्रश्न सोडवणे महत्वाचे असते. फक्त रक्तदान शिबीर, फळं आणि वह्या वाटप करु नका तर लोकांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवा. जनतेची मने जिंका मग आपोआप मते मिळतात, असे ते म्हणाले.

कोणालाही कसलीही तक्रार अथवा सूचना करायची असेल, आपल्या येथे कोणते उपक्रम राबवता येतील, विभागातील समस्या काय आहेत याची माहिती connectrajthackeray@gmail.com या मेल आयडीवर पाठवा, असे आवाहन राज यांनी केले आहे. तसेच फक्त तक्रारीच करू नका तर काही चांगले उपक्रम सुचवा, असेही राज यांनी शेवटी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version