Home अध्यात्म वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा

वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा

0

पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठय़ा प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ माझ्याचकरिता सांगितला आहे, तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचन करावे. ग्रंथ लिहिणा-याची तीव्र इच्छा असते की, त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे. त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मथितार्थ लक्षात आणावा. भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच; मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले.

साधन आणि वाचन असले की साधक कधीही मागे पडायचा नाही. उपनिषदे, गीता, योगवासिष्ठ, यांसारखे वेदान्तपूर्ण ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे आवश्यक असते. गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्मसंन्यास, यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे, हे लक्षात ठेवून ती वाचावी. वेदान्त हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे. समजा, आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठय़ा रस्त्याने जातो आहोत. वाटेत एक माहितगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखविली. त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो. तसे, उपासनेच्या मार्गामध्ये स्वत:चा दोष स्वत:ला कळत नाही, आपले मन ताळ्यावर राहत नाही. अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो.
– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version