Home मध्यंतर उमंग वयाचं बंधन नसलेलं.. निस्सिम! शहामृगी प्रेम

वयाचं बंधन नसलेलं.. निस्सिम! शहामृगी प्रेम

0

प्रेमाला वयाचं बंधन नसतं, तर ते चिरतरुण असतं. तसंच ही भावना केवळ मनुष्यप्राणीच उत्तम प्रकारे व्यक्त करू शकतो असेही नाही. तर ही प्रेमभावना माणसांप्रमाणेच प्राणी-पक्ष्यांमध्येही तितकीच अतूट असते. म्हणूनच म्हणतात ना की, प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे..

तुम्हाला शहामृगाच्या बाबतीतली एक गोष्ट माहिती आहे का? नर किंवा मादी शहामृग आयुष्यात एकदाच आपल्या साथीदाराची निवड करतात. आपल्याला योग्य साथीदार मिळाला की, ते दोघंही जिवंत असेपर्यंत एकमेकांच्या सोबतीने राहतात.

आयुष्यभरात कधीही ते एकमेकांची साथसंगत सोडत नाहीत. पण जंगलासारख्या अनिश्चित ठिकाणी जिथे जीवनमरणाचा भरवसा धरता येत नाही अशा ठिकाणी वावरताना जर काही कारणाने यातील एका शहामृगाचा मृत्यू झाला आणि तो मृत्यू त्या मृत शहामृगाचा साथीदार, सोबती असलेल्या दुस-या शहामृगाच्या दृष्टीस पडला तर तो दुसरा शहामृग ताबडतोब अन्नत्याग करतो आणि बरोबर वीस दिवसांनी मरतो.. धस्स होतं ना?

काय हे निस्सिम प्रेम.. हे प्रेम.. ही साथ एका पक्ष्याकडून व्यक्त होताना खरेच हरखून जायला होतं. इतकं प्रेम..! इतकी निस्सीम साथ पक्ष्यांच्या विश्वात असते? खरंच वाटत नाही. कारण आज जागोजागी रक्ताची नाती रक्तबंबाळ होत असताना, हे पटवून घेणं खरंच कठीण होतं. कारण अशा माणसांना पशूही म्हणता येत नाही, कारण पशूंचाही तो अपमानच होईल.

मात्र शहामृगात ही प्रेमभावना ओतप्रोत भरलेली आहे. कारण ते दोघं एकमेकांप्रति एकरूप झालेले आहेत. म्हणूनच दुस-या शहामृगाला आपल्या जोडीदाराचा मृत्यू सहनच होत नाही. मात्र साथीदाराचा झालेला मृत्यू दुस-याला कळलाच नाही तर तो जगतो. पण हे जग थोडं वेगळंच आहे.

आपण रोज सकाळी फिरायला जातो तेव्हा अशा माणसातल्या शहामृगाच्या जोडय़ा आपल्याला ब-याचदा भेटतात. खूप भावतं त्यांचं ते निरागस एकमेकांना जीव लावणं.. प्रेम व्यक्त करणं. आमच्या जवळच शिवाजी पार्कसारखं मोठं मैदान असल्यामुळे आणि दादरसारख्या गर्दीच्या ठिकाणी आता मोकळा श्वास घेण्यासाठी सकाळी बरोबर साडेआठ वाजता एक आजोबा टी शर्ट, ट्रॅक पँट, स्वेटर घालून आपल्या केस पिकलेल्या सुरकुतलेल्या गोड आजीच्या हाताला धरून हळूहळू चालत येतात. दोघांनाही कमी ऐकायला येत असावं बहुतेक. त्यामुळे एकमेकांशी बोलताना ते दोघंही मोठय़ाने बोलत असतात. पण या त्यांच्या बोलण्यात कोणताही त्रागा नसतो की, एकमेकांबाबत कोणताही न्यूनगंड जाणवत नाही. यात गंमत म्हणजे ते आजोबा आजीला काहीतरी विचारत असतात.. पण त्या आजी मात्र वेगळंच ऐकतात. मग दोघं एकमेकाचं बोलणं समजून घेऊन काहीतरी बोलतात. ते ऐकून आजोबा आजीकडे बघून मस्त हसतात. मला मात्र त्यांच्यात शहामृग दिसतो.

मग ते दादरमधील शिवाजी मंदिरमध्ये नाटकं पाहायला जाणारे आजी-आजोबा असो वा चित्रपटगृहातील चिरतरुण युगुलं असो दोन्हीही आपापल्या परीने प्रेम व्यक्त करत असतात. ब-याचदा  नाटक वा चित्रपट बघायला जातो तेव्हा अशा शहामृगाच्या जोडय़ा असतातच.

आजीच्या छोटय़ाशा अंबाडय़ावर किंवा पोनीवर मोग-याचा मस्त सुगंधी गजरा असतो.. आजोबांनी तो आपल्या थरथरत्या हातानी माळलेला असतो, आजोबा कडक इस्त्रीच्या शर्ट-पँटमध्ये असतात, तर आजी नाजूक किनार असलेल्या साडीत भावतात.. मध्यंतरात एकमेकांचा हात धरून ते हळूहळू बाहेर जातात..

बटाटेवडा खातात.. कॉफी पितात मग पुन्हा नाटक पाहायला आत येतात.. नाटक संपलं की, एकमेकांना सांभाळत टॅक्सीतून घरी जातात. हे शहामृगाचं प्रेम नाही का? किती रसिक, म्हातारपण आहे हे..! खरंच सुखावह वाटतं.

एकदा दिवाळी पहाटच्या निमित्ताने सांगीतिक मैफलीला गेलो होतो. तर या मैफलीलाही निम्म्याहून अधिक शहामृगाच्या जोडय़ाच होत्या. असं एकमेकात झोकून देणं.. ओतून एकमेकांबाबत व्यक्त होणं यालाच शहामृगी प्रेम म्हणतात. माझं काय आता वय झालं. संपलं सगळं असं जगणं यांना मान्यच नाही.

इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते कुठून यांच्यात.. वृद्धपण असंच गोड असावं असं ज्यांना वाटत असेल, त्या पती-पत्नींनी त्यांच्यातील नातं तरुण्यकाळापासून जपावं. सुख चालून येतं. यासाठी हवं शहामृगी निस्सिम.. ओतून जाणारं प्रेम!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version