Home महामुंबई ठाणे वणव्यामुळे जुमापट्टी डोंगर काळाभोर

वणव्यामुळे जुमापट्टी डोंगर काळाभोर

0

नेरळ-माथेराच्या मध्यभागी असलेल्या जुम्मापट्टी येथे रविवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामध्ये तेथील डोंगरावरील झाडे व गवत जळाल्याने डोंगर काळाभोर झाला. 

नेरळ- नेरळ-माथेराच्या मध्यभागी असलेल्या जुम्मापट्टी येथे रविवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामध्ये तेथील डोंगरावरील झाडे व गवत जळाल्याने डोंगर काळाभोर झाला. मात्र, या आगीचे कुठलेही सोयरसुतक वनविभागाला नसल्याचे दिसून आले. कारण तेथून दोन किलोमीटर अंतरावर वनविभागाची चौकी असताना कोणताही कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोहोचला नाही. त्यामुळे वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवणे आदिवासी तरुणांना शक्य झाले नाही.

जुम्मापट्टी भागात वनविभागाने दहा वर्षापूर्वी एकॅशिया जातीच्या झाडांची लागवड केली. त्यावेळी असलेले वन अधिकारी सालुंखे यांनी त्यासाठी जुम्मापट्टी येथे नर्सरी देखील केली होती. त्याच वेळी या नर्सरीची देखभाल करण्यासाठी वन कर्मचा-यांसाठी निवासाचीही व्यवस्था केली होती. या ठिकाणी पाण्याची सुविधा असल्याने हजारोच्या संख्येने एकॅशिया झाडांची वाढ होऊ शकली.

पुढे नेरळ-माथेरान घाट रस्त्यावर हा सावली देणारा पट्टा अशी नवी ओळख या झाडांमुळे निर्माण झाली होती. परंतु आता जुमापट्टी येथील ही नर्सरीही बंद करण्यात आली आहे. तर या ठिकाणी आता कुठलाही कर्मचारी नसल्याने नर्सरीसाठी बंद असलेली जागा मोकळी होऊन मोकाट गुरांसाठी वापरली जात आहे. अशा या हिरव्या पट्टयाला रविवारी सायंकाळी वणव्यामुळे आग लागली.

या आगीत एकॅशिया जातीची झाडे जळून राख झाली आहेत. त्यामुळे हा हिरवा भाग काळाभोर झाला आहे. या आगीबाबत वनविभागाच्या कर्मचारी आणि अधिका-यांना जुम्मापट्टी येथील आदिवासींनी माहिती दिली. मात्र २४ तास सेवा देण्याचे बंधन असलेल्या वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची रविवारी सुट्टी असल्याने या ठिकाणी कुणीही पोहोचले नाही.

तर काही काही तरुण तेथून दोन किलोमीटर असलेल्या वनविभागाच्या हुतात्मा चौकात असलेल्या कार्यालयात पोहोचले. परंतु तेथेही कोणताही वन कर्मचारी नव्हता. त्यामुळे वेळीच उपाय न केल्याने डोंगर काळा झाला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version