Home टॉप स्टोरी लोकसभा वेठीस, आंध्रतील १८ खासदार निलंबित

लोकसभा वेठीस, आंध्रतील १८ खासदार निलंबित

0

मिरची पूड स्प्रे फवारुन लोकसभेत हाणामारी करणा-या आंध्रतील १८ खासदारांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले.

नवी दिल्ली- देशाच्या संसदेच्या इतिहासात गुरुवारी आणखी एक लाजिरवाण्या अध्यायाची नोंद झाली. संसदेमध्ये सातत्याने गोंधळ घालून कामकाज रोखून धरण्याच्या वृत्तीबाबत पंतप्रधानांनी बुधवारी चिंता व्यक्त केली असतानाच, गुरुवारी खासदारांनी गोंधळाची परिसीमा गाठली.

आजच्या प्रकाराने आमची मान शरमेने खाली गेली आहे. भारताच्या संसदीय लोकशाहीचा जगात आदर केला जातो. मात्र, या प्रकारामुळे तो एक लोकशाहीला कलंक आहे.  – मीरा कुमार, सभापती

 लोकशाहीला अशा प्रकारे कमी लेखता येणार नाही. दोषी खासदारांना कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून आज जो निंदनीय प्रकार घडला, तशा घटना पुन्हा होणार नाहीत. – डॉ. निलेश राणे, खासदार

लोकसभेमध्ये हमरीतुमरी आणि माइकची मोडतोड करण्याबरोबरच एका खासदाराने चक्क मिरचीच्या फवा-याचा मारा दुस-या खासदारांवर केला. अतिशय तीव्र असलेल्या या फवा-यामुळे घुसमटलेल्या तीन खासदारांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर सभागृहात गोंधळ घालणा-या सीमांध्रमधील १८ खासदारांना निलंबित करण्यात आले. या प्रकारामुळे देशाच्या व संसदेच्या प्रतिष्ठेला बट्टा लागला असल्याची खंत लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी व्यक्त केली.

तीव्र फवा-यामुळे अनेक घुसमटले

तेलंगण विधेयकाची ओळख करून देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर काँग्रेसने नुकतेच निलंबित केलेले खासदार आणि उद्योगपती एल. राजगोपाल यांनी सभागृहात आणलेला मिरचीचा फवारा सर्वत्र फवारण्यास सुरुवात केली. त्यांच्या अनपेक्षित कृतीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. या फवा-याची सर्वाधिक झळ विनयकुमार पांडे, पूनम प्रभाकर आणि बलराम नाई या तीन खासदारांना बसली. या तीव्र फवा-यामुळे ते घुसमटले आणि जोराने खोकू लागले. त्यांच्या डोळ्याची आग होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्यापाठोपाठ इतरही बरेच खासदार डोळ्यांची आग होऊन डोळ्यात पाणी आलेल्या आणि घुसमटलेल्या अवस्थेत बाहेर पडत असताना दिसत होते.

आणखी एका खासदाराचा गोंधळ

राजगोपाल यांनी मिरचीच्या फवा-याची फवारणी केल्यावर तेलगू देसम पक्षाचे खासदार वेणुगोपाळ रेड्डी यांनी सभागृहाच्या सरचिटणीसाचा माइक तोडून टाकला आणि संगणकाची स्क्रीन फोडून टाकली. दुसरीकडे लोकसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत (वेलमध्ये) तेलंगण विरोधक आणि समर्थक अशा दोन्ही बाजूंचे खासदार उतरले आणि त्यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. राज्यसभेतही तेलंगण विरोधकांनी गोंधळ घातला आणि सभापतींसमोरचा माइक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. टीडीपीचे खासदार सी.एम. रमेश यांनी सभागृहातील माइक उखडून टाकल्यावर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

घडलेल्या या प्रकारावरून संसदीय कामकाजमंत्री कमल नाथ यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. तेलंगण विधेयकाला आधी पाठिंबा जाहीर करून नंतर विरोध करण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळे भाजपची कूटनीती पूर्णपणे उघड झाली असल्याचे नाथ यांनी सांगितले. हा सर्व गोंधळ सुरू राहिल्यावर दुपारी मीरा कुमार यांनी आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करणा-या १८ खासदारांना निलंबित केले. निलंबित खासदारांमध्ये एल. राजगोपाल, वेणुगोपाळ रेड्डी यांचा समावेश होता. गोंधळ घालणा-या खासदारांना निलंबित केल्यानंतरही सभागृहाचे कामकाज सुरळीत न झाल्याने अखेर कामकाज सोमवापर्यंत तहकूब करण्यात आले. तेलंगणबाबतचे विधेयक सादर झाले असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला तरी आम्हाला तो अमान्य आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सांगितले. हे विधेयक सादर करताना योग्य प्रक्रियेचा अवलंब केला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मिरचीपूड फेकणारे खासदार एल राजगोपाल यांच्यासह ध्वनीक्षेपक तोडणारे टीडीपीचे खासदार एम. वेणूगोपाल रेड्डी यांना निलंबित केले आहे. यांच्यासह सब्बम हरी, अनंथा व्यंकटरामी रेड्डी, रायपती संबासिवा राव, एसपीवाय रेड्डी, एम श्रीनिवासुलु रेड्डी, व्ही अरुण कुमार, ए साई प्रताप, सुरेश कुमार शेतकर, केआरजी रेड्डी, बापी राजू कनुमुरी आणि सुखेंदर रेड्डी (सर्व काँग्रेस) तसेच निरामली सिवाप्रसाद, निम्माला क्रिस्तप्पा, के. नारायणा राव (सर्व टीडीपी) आणि वाय एस जगनमोहन रेड्डी, एम राजामोहन रेड्डी (वायएसआर काँग्रेस) या खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version