Home महामुंबई लोकसभा, विधानसभेसाठी मनसेची तयारी सुरू

लोकसभा, विधानसभेसाठी मनसेची तयारी सुरू

0

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आतापासूनच सज्ज झाली असून राज ठाकरे पक्षाच्या पदाधिका-यांसाठी शुक्रवारी भरगच्च कार्यक्रम जाहीर करणार आहेत. 

मुंबई- आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आतापासूनच सज्ज झाली असून राज ठाकरे पक्षाच्या पदाधिका-यांसाठी शुक्रवारी भरगच्च कार्यक्रम जाहीर करणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे नवे संपर्क अध्यक्ष या वेळी जाहीर केले जातील. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांचा बारकाईने अभ्यास करून त्यानुसार पक्षाने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

आझाद मैदानातील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काढलेला मोर्चा आणि जाहीर सभा यांतून मनसेने चांगलेच शक्तिप्रदर्शन केले. या शक्तिप्रदर्शनामुळे पक्षाच्या कार्यकत्यांमध्येही जोष निर्माण झाला आहे. या अनुकूलतेच्या पार्श्वभूमीवरच आगामी निवडणुकांच्या तयारीची राज ठाकरे यांची रणनीती आहे. अर्थात यशस्वी शक्तिप्रदर्शन हे तात्कालिक कारण असले, तरी राज यांनी सहा महिन्यांपासून विविध भागांतील पक्षाची परिस्थिती आणि स्थानिक मुद्दे यांची बारकाईने माहिती घेतली आहे. त्याच्या आधारेच पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम देण्यात येईल.

गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज यांनी पक्षाचे संपर्क अध्यक्ष हे पद बरखास्त केले. त्या पदांवर नव्याने नेमणुका झाल्या नव्हत्या. शुक्रवारच्या मेळाव्यात नव्या संपर्क अध्यक्षांची घोषणा होणार आहे. महापालिका निवडणुकीत मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये पक्षाने चांगला जम बसवला आहे. तेथे पक्ष आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच पक्षस्थापनेपासूनच दुर्लक्ष झालेल्या राज्यातील ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष देण्यासाठीही कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. मुंबईचे संपर्क अध्यक्ष यापुढे जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यक्रमांची अंमलबजावणी करून पक्षप्रमुखांना अहवाल देतील.

महापालिका निवडणुकीत पुणे, नाशिक वगळता मुंबई, ठाण्यातील कामगिरीवर राज समाधानी नाहीत. गटबाजीचा पक्षाला फटका बसल्याचे मतही त्यांनी व्यक्त करून फेरबदलाची भूमिका जाहीर केली होती. मात्र सहा महिन्यांनतरही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. राज ठाकरे यांनी कार्यकत्यांकडून पदाधिका-यांबाबतच्या तक्रारी लेखी मागितल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या मतांची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. आगामी निवडणुकीत आणखी चांगली कामगिरी करायची, तर फेरबदलही महत्त्वाचे आहेत, असे या पत्रांमुळे लक्षात आले. त्यामुळे हे फेरबदलही लवकरच अपेक्षित आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version