Home टॉप स्टोरी विरोधकांचा गदारोळ सुरुच, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विरोधकांचा गदारोळ सुरुच, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

0

ललित मोदी प्रकरणावरुन विरोधकांचा गदारोळ सुरु राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

नवी दिल्ली – आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदी प्रकरणावरुन विरोधकांचा गदारोळ सुरु राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. सकाळपासूनच विरोधकांनी लोकसभेत विविध मुद्यांवरुन गदारोळास सुरुवात केली यामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले होते.

ललित मोदी वादप्रकरण तसेच अन्य मुद्यांवरुन काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. कामकाज सुरु होताच काँग्रेस नेत्यांनी फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच काळ्या फिती लावून निषेधही दर्शवला.

यावेळी काँग्रेस नेत्यांसह काही तृणमूल काँग्रेसचे खासदारही होते. बडे मोदी मेहेरबान तो छोटे मोदी पहेलवान, पीएम चुप्पी छोडो असे या फलकांवर लिहिण्यात आले होते.

लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी वारंवार अपील करुनही विरोधकांचा गदारोळ सुरुच होता. त्यामुळे सुरुवातीला बारा वाजेपर्यंत त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

लोकसभेसह राज्यसभेतही विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही. विरोधकांच्या गोंधळामुळे सकाळपासून तीन वेळा राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. ललित मोदी वादप्रकरण, व्यापम घोटाळा प्रकरणावरुन विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घातला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version