Home टॉप स्टोरी लोकसभा निवडणूक सहा टप्प्यात, १८ मे रोजी निकाल?

लोकसभा निवडणूक सहा टप्प्यात, १८ मे रोजी निकाल?

0

आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल- मे महिन्यांत पार पडणार असून देशभरात सहा टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल- मे महिन्यांत पार पडणार असून देशभरात सहा टप्प्यात मतदान होईल. ‘टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, १५ मे पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल आणि रविवार १८ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील, असे म्हटले आहे. यासाठी निवडणूक आयोगाने प्राथमिक पातळीवर संपूर्ण तयारी केली असून, लोकसभेसाठी तीन मार्चला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दुसरीकडे, निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा ते १० मार्च दरम्यान निवडणुकीची घोषणा होईल असे सांगण्यात आले. निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम या तीन राज्यांची विधानसभा निवडणूकही होणार आहे.

निवडणूक आयोग उमेदवाराच्या खर्चात वाढ करण्याचा विचार करीत असून ४० लाख असलेली ही खर्चाची मर्यादा ७० लाख रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर विधानसभेसाठी उमेदवार आता १६ लाख वरून २८ लाख रूपये खर्च करू शकेल. याची कायदा मंत्रालयातर्फे लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आयोगाने खर्चाची मर्यादा २५ लाखावरून ४० लाख केली होती.

या निवडणुकीत देशातील ८१.४ कोटी जनता मतदान करण्यास पात्र आहे. मतदान शांततेत आणि मुक्त वातावरणात होण्यासाठी १. २ लाख पोलिस अधिका-यांसह अर्ध सैन्य दल आणि निवडणूक अधिकारी मतदान केंद्रांवर सज्ज राहणार आहेत. नक्षली प्रभाव असलेल्या छत्तीसगड, झारखंड आणि ओदिशात प्रारंभिक टप्प्यातच मतदान घेण्यावर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

या लोकसभेची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभा स्थापन करणे गरजेचे आहे. दरम्यान, गेली लोकसभा निवडणूक १६ एप्रिल ते १३ मे यादरम्यान पाच टप्प्यांत झाल्या होत्या. १६ मे २००९ रोजी मतमोजणी झाली होती.

यावेळी १६/१७ मार्च होळी, ३१ मार्च- गुढीपाडवा, आठ एप्रिल- रामनवमी, १३/१४ एप्रिल- बैसाखी, मध्य एप्रिलमध्ये आसाममध्ये साजरा होणारा बिहु उत्सव, १४ एप्रिल आंबेडकर जयंती, १८ एप्रिल- गुड फ्रायडे आणि २० एप्रिल- इस्टर या सर्व सणांचा विचार करुन निवडणूक आयोगातर्फे निवडणूक कार्यक्रम आखला जात आहे.

[EPSB]

लोकसभा निवडणूक एप्रिलच्या मध्यापासून

लोकसभा निवडणूक पाच ते सहा टप्प्यांमध्ये होणार असून निवडणुकीची घोषणा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version