Home टॉप स्टोरी लोकसभा दिवसभरासाठी तहकूब

लोकसभा दिवसभरासाठी तहकूब

0

कोळसा गैरव्यवहार प्रकरणी भाजपसह मित्रपक्षांनी लोकसभेत गोंधळ घातल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. 
नवी दिल्ली- कोळसा गैरव्यवहार प्रकरणी भाजपसह मित्रपक्षांनी लोकसभेत गोंधळ घातल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. कोळसा गैरव्यवहार प्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, या कालच्या मागणीवर भाजप आजही ठाम राहिले. या प्रकरणावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात बुधवारी पुन्हा विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सुरुवातीला एक तास नंतर अर्धा तास आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सभागृहात चर्चा पुरी झाली आता राजीनामाच हवा, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे 2006 ते 2009 या दरम्यान कोळसा मंत्रालय असताना त्या काळात खाणींचे वाटप करताना एक लाख 86 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. त्यामुळे विरोधक पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे.

कॅग अहवालाबाबत चर्चेला सरकार तयार आहे, असे सरकारकडून आश्वासन मिळाले असले तरी विरोधक ऐकायला तयार नव्हते. विरोधीपक्षाचे सदस्य घोषणा देत होते, तर राज्यसभेतही विरोधकांनी याच विषयावर कामकाज रोखून धरले. या तणावात लोकसभेचे कामकाज दुपारी बारापर्यंत तर राज्यसभेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच अवघ्या काही मिनिटातच विरोधकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रचंड गोंधळ सुरू केला. जोपर्यंत पंतप्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत या घोटाळ्यावर कोणतीही चर्चा होणार नाही, अशी भुमिका विरोधकांनी घेतली. त्याचवेळी संसदीय कामकाजमंत्री पवन बन्सल यांनी विरोधकांची मागणी गैर असल्याचे सांगितले. तसेच विरोधकांना संसदेचे कामकाज चालू देता गोंधळ घालून ते अडवण्यातच रस आहे असे दिसते, असा आरोपही त्यांनी केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version