Home व्यक्तिविशेष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

0

‘माझी मैना गावाकडं -हायली, माझ्या जीवाची होतीया कायली’ यासारख्या ठसकेबाज लावण्या आणि ‘फकिरा’, ‘वारणेचा वाघ’, ‘माकडीचा माळ’, ‘मास्तर’ यांसारख्या कादंब-या लिहिणा-या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. दि. १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली येथे मांग समाजात जन्मलेले अण्णाभाऊ अल्पशिक्षित असले, तरी त्यांनी लिहिलेल्या कादंब-या समाजमनाचा ठाव घेणा-या आहेत. त्यांच्या अंतर्मनाचा तो प्रकट हुंकार आहे. समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा हा साहित्यिक. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या जनसागरात गुंतलेला लढाऊ माणूस अण्णांनी आपल्या लेखणीतून उभा केला. ग्रामीण, पददलित आणि लाचारीचे जिणे जगणारी माणसे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी माणसे, त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली. फकिरासारखा जन्माने मातंग असणारा नायक, एक अजस्र् ताकदीचा व धैर्याचा महामेरू, भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या रणांगणात दीनदलितांच्या व उपेक्षितांच्या वतीने लढणारा नायक म्हणून त्यांनी ‘फकिरा’त उभा केला. फकिरा ही त्यांची कादंबरी त्या वर्षात प्रसिद्ध झालेल्या कादंब-यांत सर्वोत्कृष्ट ठरली. ३५ कादंब-या, ३ नाटके, ११ लोकनाटय़े, १३ कथासंग्रह आणि ७ चित्रपटकथा लिहिणा-या अण्णाभाऊंनी फक्कड लावण्याही लिहिल्या. शाहीर गवाणकरांच्या ‘लालबावटा’ कलापथकाद्वारा अनेक तमाशेही केले. जगण्यासाठी लढणा-या माणसांचे चित्रण करणा-या अण्णाभाऊंनी ‘मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची लंका, वाजतोय डंका चौहुमुलुखी’ अशा शब्दांत मुंबईचे चित्र रेखाटले. जनसामान्यांच्या या लोकशाहिरांचे दि. १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version