Home महामुंबई लहान मुलांना मूत्रपिंडाचा सर्वाधिक धोका

लहान मुलांना मूत्रपिंडाचा सर्वाधिक धोका

0

मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना आता लहान मुलांमध्येही हा आजार आढळून येऊ लागला आहे.

मुंबई – मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना आता लहान मुलांमध्येही हा आजार आढळून येऊ लागला आहे. वाडिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या मुलांपैकी ५ ते १० टक्के मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे पाहायला मिळत आहेत. २०१२-१३मध्ये फक्त ६४९ लहान मुलांना ‘हेमोडायलिसिस’ द्यावे लागत होते. पण आता दरवर्षी १,१०० हून अधिक मुलांना ‘हेमोडायलिसिस’ देण्याची गरज भासते, असे वाडिया रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.

मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेले एक हजाराहून अधिक नवीन रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. तर दहा हजार लहान मुलांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात येत आहेत. मूत्रपिंड खराब होऊ लागल्याने या लहान मुलांना ‘हेमोडायलिसिस’वर राहावे लागत आहे. ही सर्व लहान मुले गरीब कुटुंबातील असल्याने प्रत्यारोपणाचा खर्च पालकांना परवडण्याजोगा नसतो. त्यामुळे, हेमोडायलिसिसवर राहणा-या मुलांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये वाढत्या मूत्रपिंड विकारासंदर्भात पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २०१०पासून रुग्णालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांद्वारे मुलांना मूत्रपिंड विकारापासून कसे वाचवता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. यंदाच्या वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. यात मूत्रपिंडाची काळजी घ्या, असे संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आले. या शिबिरात १००हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते, असेही डॉ. बोधनवाला यांनी सांगितले.

लहान मुलांना कसा होतो मूत्रपिंड विकार

लहान मुलांना मूत्रपिंड विकार कसा होईल, असे आपल्याला वाटते. पण मुलांनाही तो होऊ शकतो. याची बरीच कारणे आहेत. लहान मुलांची शरीररचना व शरीर प्रक्रिया प्रौढांपेक्षा बरीच वेगळी असते. त्यामुळे बालपणातील व प्रौढ वयातील मूत्रपिंडाचे विकार, त्यामागील कारणे आणि त्यावरील उपचार यात बरेच अंतर आहे. प्रौढांमधील मूत्रपिंड विकारांचा उगम प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब यापासून सुरू होतो; परंतु बालवयात हे दोन आजार क्वचितच आढळून येतात. बालवयात आनुवंशिक आजार, जन्मजात व्यंग, जंतुसंसर्ग हे मूत्रपिंड विकारास प्रामुख्याने कारणीभूत ठरतात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version