Home संपादकीय तात्पर्य ललित मोदींची पुन्हा विकेट

ललित मोदींची पुन्हा विकेट

0

ललित मोदी यांनी ‘आयपीएल’मध्ये केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांची भारतीय क्रिकेट क्षेत्रातून हद्दपारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होतीच; पण, त्यांना जोपर्यंत राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये स्थान होते तो पर्यंत त्यांची हकालपट्टी पूर्ण होणार नव्हती. त्यांनी नाना लटपटी आणि खटपटी करून  तिथले आपले स्थान टिकवून ठेवले होते. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांची या संघटनेचा सदस्य आणि अध्यक्ष म्हणून निवड झाली होती आणि तीही वादग्रस्त पद्धतीने झाली होती. त्यांच्या या निवडीत अनेक अडचणी होत्या; पण त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून ही निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. त्यांनी या पदावर निवडणूक करून घेऊन धन्यता मानली असली तरीही आता राजस्थानातल्या ३३ जिल्हा क्रिकेट असोसिएशन्स पैकी २३ असोसिएशनने ठराव करून त्यांना या पदावरून बडतर्फ केले आहे. या पदाच्या आधारावरच त्यांनी बीसीसीआयचेउपाध्यक्षपद मिळवले होते. आता हे पद हातून गेल्यामुळे त्यांचा ‘बीसीसीआय’वर निवडून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर होताच त्यांच्या जागेवर सध्याचे राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अमिन पठाण यांनी त्यांचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. ते हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. मोदी यांच्या विरोधात हा ठराव करतानाच त्यांच्या गटातून निवडून आलेल्या अन्य तिघा पदाधिका-यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. या बडतर्फीने राजस्थान क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांच्यातला ब-याच दिवसांचा वाद संपला आहे. राजस्थान असोसिएशनने मोदी यांनी अध्यक्ष निवडल्यापासून बीसीसीआयने राजस्थान असोसिएशनवर बहिष्कार टाकला होता, तो आता मागे घेण्यात आला आहे. पण मोदी यांनी हा सारा खेळ नाकारला आहे. आपल्याला बडतर्फ करण्याचा हा ठराव ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष एन श्रीनिवास यांची फूस दिल्याने घेतला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मोदी यांनी त्यांना बडतर्फ करण्यासाठी बोलावण्यात आलेली बैठक बेकायदा असल्याचा दावा तर केला आहेच पण आपल्या अधिकारात त्यांनी अमिन पठाण यांची ती वादग्रस्त निवड रद्द करीत असल्याचे जाहीर केले आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशन ही संघटना मोदी यांच्या पाठीशी असल्याचे कितीही सांगितले जात असले तरीही ‘बीसीसीआय’ने तिच्या अध्यक्ष पदी मोदींची निवड झाल्यापासून या संघटनेची कोंडी करायला सुरुवात केली होती. ‘बीसीसीआय’कडून मान्यता मिळून घेतल्या जाणा-या सगळ्या प्रकारच्या देशातल्या सामन्यांपासून ‘बीसीसीआय’ने राजस्थानला दूर ठेवले होते. राजस्थान असोसिएशनच्या सा-या कामकाजासाठी पैशाची मोठी गरज आहे. पण ‘बीसीसीआय’ने या संघटनेची सारी रसद बंद केली होती. अशा अनुदानापैकी २९ कोटी रुपयांची रक्कम येणे बाकी होती. ती हाती पडत नव्हती. ‘बीसीसीआय’च्या या निर्णयामागे आणि अडवणुकी मागे राजकारण आहे, असे मोदी यांचे म्हणणे आहे; पण हा या दोघांत सुरू असलेल्या कोर्टबाजीचा परिणाम होता. मे महिन्यात तर मोदी यांना दुस-यांदा अध्यक्ष करण्यात आले. तेव्हा तरी ‘बीसीसीआय’ने राजस्थानातल्या संघटनेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण राजस्थानातल्या जिल्हा संघटनांना लवकरच वा-याची दिशा कळली आणि त्यांनी मोदी यांचा हात सोडला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version