Home प्रतिबिंब लढा आमचा सुरूच!

लढा आमचा सुरूच!

0

पंढरपूर येथे सुरू झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून मराठी रंगभूमीचा आढावा घेतला. मराठी रंगभूमी अधिक समृद्ध करण्यासाठी लढण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले आहे. त्या भाषणाचा संपादित भाग..

प्रथमच महत्त्वाचा प्रश्न समोर मांडतो. सहा वर्षापूर्वी १४ जून २००७ रोजी भरपावसात नाटय परिषदेच्या विरुद्ध यशवंत नाटय संकुलात प्रायोगिक व बाल रंगभूमीला जागा मिळावी, यासाठी आम्ही लढा दिला होता. आमचे नेते विजय तेंडुलकर व दामू केंकरे हे आज हयात नाहीत. पण, आमचा लढा थांबलेला नाही. या लढयातील मी एक साक्षीदार. असं असूनही परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने अध्यक्षपदासाठी माझे नाव सुचवले. माझी संमती घेण्यासाठी आलेल्या नाटय परिषदेच्या प्रतिनिधीने या लढयाची आठवण करून दिली. तरीही परिषदेने आपला हात पुढे केला, तो मी स्वीकारला, एवढयाचसाठी की, आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार परिषद व आम्ही करू व ही समस्या एकत्र बसून सामंजस्याने सोडवू.

पुढच्या वर्षीच्या नाटय संमेलनापर्यंत आमच्या मागण्या मार्गी लागाव्यात, अशी आशा आहे. दुर्दैवाने तसे नाहीच झाले तर मी त्याची कारणं आपल्यापुढे ठेवीन. मी आशावादी आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहीन.

रसिक हो, मराठी रंगभूमीवर निरनिराळ्या स्तरांतून सृजनकार्य घडते आहे. त्याची आजची स्थिती काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात जेवढे सृजनकार्य होत आहे तेवढे इतरत्र दिसत नाही. बाल रंगभूमी, हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक सर्व स्तरांवर नाटय निर्मिती व प्रयोग होतात. मी या सर्व स्तरांवर काम करणा-यांना भेटून आजची स्थिती, त्यांचे विचार, त्यांच्या अडचणी, मागण्या, तक्रारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला व तो इथे मांडणार आहे.

बाल रंगभूमी : रसिकहो, शालेय व बाल रंगभूमी हा पाया आहे. पाया मजबूत तर इमारत पक्की. पण, या पायाकडेच आम्ही दुर्लक्ष करतोय. बाल रंगभूमीला दुय्यम समजतो.
शालेय स्तरांवर नाटय स्पर्धा आयोजित होत असतातच. चार दशकांपूर्वी कुमार कला केंद्राच्या शालेय नाटय स्पर्धा आयोजित होत असत. गेली ३६ वर्षे वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान शालेय नाटय स्पर्धा आयोजित करीत आहे. महाराष्ट्र सरकारची बाल नाटय स्पर्धा सुरू आहेच. त्यातही बहुतांश शाळांचा सहभाग असतो. सरकारी पातळीवर बाल नाटय स्पर्धा सुरू आहेत, हे चित्र उत्साहदायी आहे.

आज बाल नाटयाचे प्रयोग आर्थिकदृष्टया न परवडणारे झाले आहेत. सरकार नाटय संस्थेच्या व्यावसायिक नाटय प्रयोगांना अनुदान देते. पण, बाल नाटय स्पर्धा आयोजित करण्यापलीकडे बाल रंगभूमीकडे पाहतही नाही. रजिस्टर्ड नाटय संस्थांना जसे अनुदान मंजूर होते तसेच रजिस्टर्ड बाल नाटय संस्थांना तसेच बाल नाटय प्रयोगांनाही अनुदान द्यावे. तसा अध्यादेश निघाला तर बाल रंगभूमीचे आजचे स्वरूप नक्की बदलू शकेल.

तरुणाई रंगभूमी : रंगभूमीच्या प्रगतीच्या दृष्टीने महाविद्यालयीन नाटय स्पर्धा मोलाच्या आहेत. पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करते. एवढया सातत्याने व निष्ठेने स्पर्धा चालवणे सोपे नाही. मुंबईतील आयएनटी, सवाई व इतरत्र महाराष्ट्रात अशा अनेक स्पर्धाचे निरनिराळ्या संस्थांतर्फे वर्षभर आयोजन होते. नुकतीच राज्य पातळीवर नाटयसंपदेने महाविद्यालय पातळीवर स्पर्धा आयोजित केली होती. यातूनच मराठी रंगभूमीला तरुण ऊर्जा मिळत राहते. ‘कल्पना एक, आविष्कार अनेक’सारख्या स्पर्धातून लेखक-दिग्दर्शकांची कसोटी लागते. अशा लेखकांना उत्तेजन देणे गरजेचे आहे. व्यावसायिक व प्रायोगिक रंगभूमींना अशा उमलत्या लेखकांच्या शोधात असायला हवे. त्यासाठी नाटय निर्माता संघाने दीर्घाक स्पर्धा आयोजित केली. यातून काही नवीन नाटककार हाती लागतात का, हे कळून येईल. नाटय परिषदेच्याही सर्व शाखांवर एकांकिका स्पर्धेचे आयोजन होत आहे. त्याचबरोबर नाटय लेखन स्पर्धाही आयोजित होते. सर्वोत्कृष्ट नाटय लेखकाला बक्षीसही दिले जाते. माझी अशी सूचना आहे की, या स्पर्धेत तीन उत्कृष्ट नाटकांची निर्मिती परिषदेच्या शाखांनी करावी व नवोदितांना कार्यप्रवण करावे.

हौशी रंगभूमी : हौशी रंगभूमीवर काही कारणपरत्वे नाटयप्रयोग सादर केले जातात. वार्षिक महोत्सव असतो. महाराष्ट्र राज्य हौशी राज्य नाटय स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी नाटयनिर्मिती होते. हौसेखातर नाटय निर्मिती करणा-यांना हौशी नाटय संस्था म्हणावे. सरकारची ही हौशी नाटय स्पर्धा आता ६० वर्षाची होईल. एवढी प्रदीर्घ काळ चालणारी नाटय स्पर्धा भारतातील एकमेव स्पर्धा आहे. सुरुवातीच्या काळातील स्पर्धेतून रंगभूमीला अनेक नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ लाभले. त्या वेळच्या स्पर्धेतील प्रयोगांना प्रेक्षकांची तुडंब गर्दी होत असे. आता काय चित्र दिसते? स्पर्धेसाठी शेकडोंनी प्रवेश अर्ज येतात. कुठलेही नाटक स्पर्धेमध्ये सादर होते. त्याचा दर्जा पाहिला जातो का? स्पर्धेच्या प्रयोगाला प्रेक्षक असतो का? तेव्हा सरकारने पहिल्याप्रमाणे नवीन नाटकाची अट घालावी म्हणजे नवीन संहिता लिहिल्या जातील.
नाटय परिषदेशी संलग्न हौशी रंगमंच संघटना वर्षभरात मराठी रंगभूमीसाठी काय कार्य करते, हे कोणालाच माहीत नाही. म्हणून या संघटनेचा मी विचार करीत नाही. ती फक्त कागदोपत्री आहे, इतकेच.

प्रायोगिक रंगभूमी : प्रायोगिक नाटकाची व्याख्या कुणीच केलेली नाही. सरकारने व्यावसायिक नाटकाची व्याख्या केलेली आहे. पण प्रायोगिक नाटय प्रयोगांना अनुदान देण्याच्या अध्यादेशात व्याख्या न देता नुसतेच प्रायोगिक नाटक असे म्हटले आहे. सरकारची व्यावसायिक नाटकाची व्याख्या पाहिली तर त्या व्याख्येप्रमाणे काही प्रायोगिक नाटय संस्थांनाही ही व्याख्या लागू पडते.

नाटय परिनिरीक्षण मंडळ प्रायोगिक नाटकांना प्रमाणपत्र देते, ते कोणत्या आधारावर? नाटककाराने माझे नाटक प्रायोगिक असे अर्जात नमूद केले आहे म्हणून? कालचे यशस्वी प्रायोगिक नाटक आजचे व्यावसायिक नाटक होते. मग, त्यासाठी प्रमाणपत्र मिळवले जाते. पूर्वी व्यावसायिक किंवा प्रायोगिक अशी वेगवेगळी प्रमाणपत्र मिळत नसत. केवळ महसूल वाढावा म्हणून हे भेद केले गेले आहेत का?

नाटय परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षापासून सभासद व कार्यालयातील कर्मचारी बदलले आहेत. प्रमाणपत्रे वेळेवर मिळत नाहीत. एखाद्या चांगल्या नाटकाचा प्रयोग नाटय महोत्सवात असेल तर पूर्वी तात्पुरते प्रमाणपत्र मिळत असे. आता तेही मिळत नाही. कारण संहिता वाचून शिफारस करणारे बहुतेक सभासद मुंबईबाहेरचे आहेत. म्हणून निर्मात्यांना वेळच्या वेळी प्रमाणपत्रे मिळत नाहीत, अशा तक्रारी ऐकू येतात.

आपण पाहिलेत, बाल नाटय स्पर्धा होतात. हौशी नाटय स्पर्धा होतात. व्यावसायिक नाटकांच्या स्पर्धा होतात. पण प्रायोगिक नाटकांच्या स्पर्धा होत नाहीत. प्रायोगिक नाटकांची त्रिशंकूसारखी अवस्था होते. पण आजपर्यंत व्यावसायिक नाटकाला प्रगतिपथावर नेण्यात प्रायोगिक नाटकाचा फार मोठा वाटा आहे. प्रायोगिक नाटकांनी व्यावसायिक रंगभूमीला नव्या दमाचे नाटककार, दिग्दर्शक, नेपथ्यकार व अभिनेते मिळवून दिलेले आहेत. या वस्तुस्थितीकडे कानाडोळा करता येत नाही. काहींचे म्हणणे असे की, प्रायोगिक रंगभूमी व्यावसायिक रंगभूमीला पूरक आहे. काही म्हणतात समांतर आहे. मी म्हणतो दोन्ही असूनही ती स्पर्धक आहे.

‘सध्या महाराष्ट्रात प्रायोगिक नाटक चाललेलं नाही. आहे ते सगळं नॉन प्रोफेशनल अमॅच्युअर थिएटर आहे.’ ज्यांनी कुणी हे विधान केले आहे ते प्रायोगिक नाटयप्रयोग न पाहता केले आहे.

कोणत्याही क्षेत्राचा विकास, प्रगती व्हायची असेल तर अशा क्षेत्रासाठी औद्योगिक किंवा कोणत्याही व्यवसायात एक स्वतंत्र विभाग असतो. याचं नाव ‘आर अ‍ॅन्ड डी.’, रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट व त्यासाठी आवश्यक त्या पैशाची तरतूद केली जाते. म्हणूनच रंगभूमी या कला माध्यमाचा विकास करावयाचा असेल तर ‘आर अ‍ॅन्ड डी’ची कास धरली पाहिजे. प्रायोगिक रंगभूमीचे हेच कार्य आहे. त्यासाठी माझी चतु:सूत्री आहे. संशोधन, प्रयोगशीलता, प्रशिक्षण व नाटयानुभव ही प्रायोगिक रंगभूमीच्या कार्याची व्याप्ती.

संशोधनातून प्रगती
प्रयोगशीलतेतून चहुअंगांनी सर्व घटकांचा विकास
प्रशिक्षणाने आत्मभान
नाटयानुभवातून प्रगल्भता
प्रायोगिक नाटकांचे प्रयोग करण्यासाठी आम्हाला सर्व सोयींनी युक्त २५० आसनांपर्यंतची छोटी नाटयगृहे हवी आहेत. आमचा लढा त्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक धोरणात जिल्हा पातळीवर अशी छोटी नाटयगृहे बांधण्याचा प्रस्ताव आहे. अजून तो कागदावरच आहे. सरकारने नव्याने बांधलेले रवींद्र नाटय मंदिर म्हणजेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी. इथे तिस-या मजल्यावर छोटे थिएटर आहे. पण ख-या अर्थाने ते नाटकांसाठीचे नाही. हे थिएटर चित्रपटांसाठी आहे. तरीही आम्ही इथे नाटयप्रयोग करतो. त्यासाठी रस्त्यावरून तिस-या मजल्यावर सेट व इतर सामान पाय-या चढून घेऊन जातो. कारण ते मध्यवर्ती ठिकाण आहे. सगळ्या गैरसोयी सोसून तिथे प्रयोग करतो.

दुसरं महत्त्वाचं, ही कला अकादमी आहे. कारण अकादमी म्हणजे कलेचं शिक्षण देणारी संस्था किंवा कलेला उत्तेजन देणारी संस्था. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी सुरू झाल्यापासून तिथे कोणत्या कलांचे शिक्षण दिले गेले किंवा दिले जात आहे?
मुंबईतील विलेपार्ले येथील साठय़े कॉलेजसारखी एक शैक्षणिक संस्था आम्हाला छोटे नाटयगृह उपलब्ध करून देते तर परिषदेला, महापालिकेला, सरकारला ते का जमू नये? किंवा एखाद्या मराठी उद्योजकालाही?

कामगार रंगभूमी : गिरणगाव जसं उद्ध्वस्त होऊ लागले. तसे गिरणी मालकांनी गिरण्या बंद करून मॉल उभे केले. त्यामुळे गिरणी कामगार गिरणगावातून हद्दपार झाले. सशक्त कामगार रंगभूमीची ऊर्जा संपत आली. तळागाळातल्या लोकांच्या समस्यांना तोंड फोडणारे लेखक कमी झाले. नाटयसंस्था राहिल्या नाहीत अशी आज अवस्था आहे.

लोक रंगभूमी : दादा कोंडके, काळू-बाळू, विठ्ठल उमप या महान कलाकारानंतर लोकनाटय पाहायला मिळेनासे झाले. महाराष्ट्रात काही विभागांत ते अजून टिकून आहे. मराठवाडयात भारूडी परंपरा अजून जिंवत आहे. कोकणात दशावतार, विदर्भातही खडी गम्मत. काही वर्षापूर्वी संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली या संस्थेने एक योजना यशस्वीरीत्या राबवली होती. शासनाने अशा पद्धतीने स्पर्धा किंवा महोत्सव सुरू केल्यास लोककलेला नव्या स्वरूपात पाहता येऊ शकेल.
याच पंढरपुरात काही वर्षापूर्वी होळीच्या दिवशी उत्पातांच्या शृंगारीक लावण्या पहाटेपर्यंत आम्ही ऐकत होतो. त्या लिहिल्या कोणी माहीत नाही. या लावण्या ध्वनिमुद्रित केल्या की नाही याची कल्पना नाही. मात्र हा लोकसंगीताचा ठेवा जपायला हवा.

संगीत रंगभूमी : पारंपरिक संगीत नाटकांची मधूनमधून पुनर्निमिती होते आहे. त्यांचे प्रयोगही प्रेक्षकांना आवडत आहेत. पण या पलीकडे नवीन संगीत नाटक रंगभूमीवर येत नाही. विद्याधर गोखले यांनी संगीत नाटकाच्या संहिता लिहून काही काळापुरती आशादायक परिस्थिती निर्माण केली होती. आज अशा संहिता लिहिल्या जात नाहीत. निर्मात्यांनाही संगीत नाटकाची निर्मिती करण्याचे धाडस होत नाही.
अशा सगळ्या समस्यांतून संगीत नाटक एक नव्या स्वरूपात कोणीतरी धाडसी निर्मात्याने रंगभूमीवर आणावे, अशी वाट पाहण्यावाचून आपण सध्यातरी दुसरे काही करू शकत नाही. अशी संगीत नाटकाची आजची परिस्थिती आहे.

विद्रोही रंगमंच : विद्रोही नाटकही मूळ धारेत येऊ द्या. तुमच्या व्यथा, आकांक्षा, राग प्रेक्षकांना कळू द्या. मला असे वाटते की मनातला हा विद्रोह नाटयरूपात बाहेर पडला तर मन शांत होऊ शकेल. विद्रोहाची धार बोथटही होऊ शकेल. कोणतीही कला जात-पात, धर्म टक्केवारी मानीत नाही. एकसंघ समाजाचे स्वप्न एकसंध कलेच्या माध्यमातून साकारू शकते. आपली राजकीय विचारप्रणाली काहीही असली तर ती मतपेटीतून व्यक्त करावी. कोणताही धर्म असो तो उंबरठयाच्या आत ठेवावा. म्हणजे तुम्हाला मुक्तपणे सृजनकार्य करता येऊ शकते. आपली बांधिलकी असलीच तर ती रंगभूमीच्या विकासाशी असावी, कोणत्याही राजकीय तत्त्वप्रणालीशी नसावी.
व्यावसायिक रंगभूमी : आता व्यावसायिक रंगभूमी कुणाला म्हणावे याची सरकारी व्याख्या आहे, तीच आपण गृहीत धरू. व्यावसायिक नाटयसंस्था याचा अर्थ ‘‘नाटयनिर्मिती करणे, त्याचे व्यावसायिक प्रयोग करणे व पूर्ण वेळ व्यवसाय आहे अशी संस्था’’

माझ्या पिढीतील निर्मात्यांच्या अशा संस्था होत्या. प्रभाकर पणशीकरांची ‘नाटयसंपदा’ मोहन वाघांची ‘चंद्रलेखा’ आणि मोहन तोंडवळकरांची ‘कलावैभव.’
आज असे निर्माते व अशा संस्था किती? पूर्णवेळ व्यवसाय करणारे किती व पार्टटाइम व्यवसाय करणारे किती? याचा शोध घ्यावा लागेल. मुख्य व्यवसायात कमावलेल्या नफ्यातून नाटयव्यवसायात गुंतवणूक होत आहे. कार्पोरेट सेक्टर असे स्वरूप नाटयव्यवसायाला येऊ पाहते आहे. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप बदलते आहे, मन्वंतर घडते आहे. हसवणूक कमी होताना दिसतेय. एरव्ही विनोदी नाटकांनी धुमाकूळ घातला होता. आज आशयघन, वैचारिक, समस्याप्रधान नाटकांची निर्मिती होते आहे. नवीन आशयाची, नवीन मांडणीची व मुख्यत्वेकरून सेलिब्रिटी अभिनेते/ अभिनेत्री यांना घेऊन ही नाटके सादर होत आहेत. कालचे स्ट्रगलर आज सेलिब्रिटी झाले आहेत. प्रेक्षकही या नाटकांना गर्दी करताना दिसताहेत. मी या बदलाचे स्वागत करतो. आज मराठी रंगभूमीवर एकाचवेळी पन्नासहून अधिक नाटकांचे प्रयोग सुरू आहेत. ही माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. एवढे सृजनकार्य आज महाराष्ट्रात चालले आहे.

मी नाटयनिर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना भेटलो व त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रशांतनी अडचणींचा पाढा वाचला. या अडचणींना तोंड देत रंगभूमीचा प्रवास चालू आहे.

रंगमंच कामगार संघटना : नाटयप्रयोग ज्याच्या जिवावर उभा होतो तो रंगमंच कामगार संघटनेच्या काही फार महत्त्वाच्या मागण्या आहेत. रंगमंच कामगाराला काम करताना मोठे अपघात होतात, तातडीचे उपचार करावे लागतात, त्यासाठी परिषदेने एक ठराव मंजूर करावा व अशा रंगमंच कामगाराला ‘म्युनिसिपालटीच्या हॉस्पिटलमध्ये तातडीने मोफत उपचार करून घेण्याची सुविधा असावी. कामगारांना स्वत:ची घरे नाहीत. ते एकतर ट्रकमध्ये किंवा गोडाउनमध्ये झोपतात. रंगमंच कामगार संघटनेच्या पदाधिका-यांनी असे सुचविले आहे की, गिरणगावात अनेक इमारती उभ्या राहताहेत अशा इमारतींमध्ये रंगमंच कामगारांसाठी काही खोल्या राखीव ठेवाव्यात.

परिषदेने ज्येष्ठ रंगमंच कामगारांना पेन्शन सुरू केली आहेच. त्यांच्याशिवाय अजून काही ज्येष्ठ कामगार आहेत, पण ते आता वयोमानाने कष्टाचे काम करू शकत नाहीत, अशा कामगारांना शासनाकडून पेन्शन मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. परिषदेतर्फे सर्वाचा सन्मान होतो तसाच सन्मान रंगमंच कामगारांचा व्हावा. कारण त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. रंगमंच कामगार संघटनेने अजून एक इच्छा दर्शविली आहे, परिषदेच्या विषय नियामक मंडळात त्यांचा प्रतिनिधी आहे तसाच एक प्रतिनिधी परिषदेच्या कार्यकारिणीवर असावा.

प्रेक्षक : रंगभूमीचे वर्तुळ प्रेक्षकांशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही. प्रयोग होतो तो भिन्नभिन्न अभिरुचीच्या प्रेक्षकांसाठी, सर्व समाजाची एकच अशी अभिरुची असत नाही, पण सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की प्रेक्षकांना थोडा विरंगुळा हवा आहे. धकाधकीच्या व गतिमान आयुष्यात त्यांना थकवा घालविण्यासाठी थोडेसे रिलॅक्स व्हायचे आहे आणि मानसशास्त्रीयदृष्टया ते योग्यही आहे. मग अशा विनोदी नाटकांनाच प्रेक्षक गर्दी करतात. प्रेक्षक गर्दी करतात म्हणून विनोदी नाटकांचा भडिमार होतो. हे दुष्टचक्र आहे; पण समाजात असाही काही टक्का प्रेक्षक आहे, ज्यांची बौद्धिक भूक आहे अशा प्रेक्षकांसाठी वैचारिक, समस्याप्रधान, चर्चा नाटक व जीवनातील अनेक अंगे दाखविणारी नाटके रंगमंचावर यायला हवीत. ती येतातही. आज विरंगुळाप्रधान नाटकांची संख्या थोडी कमी झाली आहे व इतर उत्कृष्ट नाटकांचे प्रयोग वाढत चालले आहेत. हा शुभशकून आहे. आणि अशा नाटकांनाही प्रेक्षक गर्दी करताना दिसतात.

नाटककार : शिरवाडकरांपासून ते शफाअत खानपर्यंतच्या नाटककारांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले. आजचा एक नाटककार डॉ. विवेक बेळे ३-४ वर्षानी एक सकस नाटक लिहितो. तो बहुप्रसवा नाही. तसेच सुरेश चिखले, संतोष पवार, संजय पवार, चिन्मय मांडलेकर, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर, प्रशांत दळवी, राजीव नाईक, शफाअत खानसारखे नाटककार अजून लिहीतच आहेत.

स्त्री नाटककारांमध्ये इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र व सुषमा देशपांडे यांचा उल्लेख जरूर करायला हवा. डॉ. आनंद नाडकर्णी मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांचीही मानसशास्त्रीय नाटके प्रयोगात आहेत. शिवाय धर्मकीर्ती सुमंत हा तरुण नाटककार नव्या सामाजिक विषयाला भिडतो आहे. आजचे तरुण नाटककार जसजसे अनुभवाने समृद्ध होत जातील तसतसे त्यांच्या नाटयकृतीत सकसपणा व विविधता येईल अशी आशा आहे. उद्याचे नाटककार फक्त शहरी विभागातून येणारे असतील असे नाही ते ग्रामीण भागातूनही येऊ शकतात. उदाहरण अगदी ताजे आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड..’चे. ग्रामीण भागातील तरुणांना नाटयलेखनासाठी प्रवृत्त करावे लागेल. मार्गदर्शनही करावे लागेल. त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. अशा तरुणांचा शोध घेऊन नाटयलेखन कार्यशाळा आम्ही घेणार आहोतच. आशा आहे की अशा प्रयत्नातून हा महत्त्वाचा घटक भावी रंगभूमीला मिळणार आहे.

समीक्षा : पूर्वसुरींच्या संमेलनाध्यक्षांनी नाटय समीक्षेबद्दल नाराजी व्यक्त केलेली आढळते. समीक्षकांवर त्यानंतर खूप तोंडसुख घेतलेले आहे. ते माझ्या वाचनात आले आहे. मला वाटते की कोणतीही समीक्षा करण्यासाठी एकच फुटपट्टी असत नाही. त्यामुळे कलेची समीक्षा व्यक्तिसापेक्ष असते. समीक्षकांची अभिरुची, माध्यमाची जाण, अभ्यास, विचारांची बांधिलकी यातूनच समीक्षा लिहिली जाते. त्यामुळे एकाची समीक्षा किंवा परीक्षण दुस-या समीक्षकासारखे नसते. मराठी दैनिकातून दर आठवडयाला एका नाटकाची समीक्षा/परीक्षण येते म्हणजे वर्षात ५०च्या आसपास. पण रंगभूमीवर वर्षात ५० पेक्षा जास्त नाटकांची निर्मिती होते. म्हणजे वर्षभरातील सर्वच नाटकांची समीक्षा होत नाही. समीक्षक मग निवडक नाटकांचीच समीक्षा लिहितो. इतर नाटकांची दखल घेतली जात नाही. काही वेळा नाटक बंद पडता पडता समीक्षा लिहिलेली आढळेल. पूर्वीसारखे शुभारंभाच्या प्रयोगाना समीक्षक हजर असत नाहीत, त्यांना वेळ मिळेल तेव्हाच ते प्रयोग पाहतात.
समीक्षकांच्या बाबतीत मी म्हणेन तुम्ही मुक्तपणे समीक्षा लिहा. त्यातले चांगले वाईट आम्ही समजून घेऊ. तुम्ही या रंगभूमीच्या व्यवहारातील एक भाग आहात, असे मी मानतो.

विकेंद्रीकरण : व्यावसायिक रंगभूमी मुंबईत केंद्रित झाली तर प्रायोगिक रंगभूमी मुंबई व पुण्यात. पूर्वीसारखे आठवडेच्या आठवडे दौरे करणे निर्मात्यांना व स्थानिक संस्थांनाही आर्थिकदृष्टया परवडत नाही. त्यामुळे मुंबई-पुण्याबाहेर फारसे प्रयोग होऊ शकत नाहीत. मग ही नाटके महाराष्ट्राच्या कानाकोप-यात कशी पोहोचणार? नाटय परिषदेकडे प्रस्ताव मांडतो की, त्या त्या वर्षाच्या उत्कृष्ट प्रायोगिक नटकाचे प्रयोग स्थानिक दिग्दर्शक व कलाकार यांच्याकडून करून घ्यावेत आणि त्या त्या शाखेच्या परिघात याचे प्रयोग करावेत. म्हणजे त्या त्या शाखेत सृजनकार्य सुरू होईल.

शासकीय अनुदाने : महाराष्ट्रात शासनातर्फे नाटयसंस्थांना निरनिराळ्या कारणांसाठी अनुदान दिले जाते. संस्थांना अनुदान-रजिस्टर्ड नाटय संस्थांना किंवा सांस्कृतिक कार्य करणा-यांना असे अनुदान तीन वर्षाची मंजूर होते. माझी सूचना आहे की, महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणा-या ज्या संस्थांनी अनुदानासाठी अर्ज केला असेल, अशा संस्थांच्या गेल्या तीन वर्षाचा आर्थिक ताळेबंद व कार्याचे अहवाल पाहावे. ज्या संस्था सातत्याने कार्य करतात त्यांचा प्रथम विचार करावा आणि अशा संस्थांना एक वर्षाआड अनुदान मंजूर करावे. त्यामुळे अशा सातत्याने भरघोस कार्य करणा-या संस्थांना आर्थिक भार कमी होईल व हे सातत्य टिकून राहील.

प्रयोगांसाठी अनुदान : नांदेड येथील नाटयसंमेलनात अनुदान देण्याचा प्रस्ताव होता त्या वेळी मी प्रथम जाहीरपणे सांगितलं की, हे अनुदान प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगांना मिळायला हवे. त्याची आवश्यकता प्रायोगिक नाटयसंस्थांना आहे. विजय केंकरे यांनीही व्यावसायिक नाटयप्रयोगांना अनुदानाची गरज नाही, असा विचार मांडला.

आज आमचे म्हणणे मान्य झाले आहे आणि प्रायोगिक नाटयसंस्थांच्या प्रयोगाला अनुदान देण्याचा अध्यादेश निघाला आहे. पण त्यात ब-याच त्रुटी आहेत आणि तो बदलून घेणे आवश्यक आहे. आज राष्ट्रीय पातळीवर दोन अंकी नाटकांपेक्षा दीड ते पावणे दोन तासांची नाटके सादर होतात. हाच न्याय प्रायोगिक नाटकाला लावावा.
राष्ट्रीय स्तरावर मराठी रंगभूमी : आता शेवटी महत्त्वाचा प्रश्न : महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या वेळी भारताच्या राजधानीत महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना झाली. उद्देश फार महत्त्वाचा होता, महाराष्ट्राची सर्व थरातील प्रगती देशाला कळावी. महाराष्ट्रातील सांस्कृतिक घडामोडींना राष्ट्रीय पातळीवर योग्य रितीने प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त राजधानीत मराठी नाटकांचे महोत्सव भरवावेत.

पंढरपूर येथील ९४व्या अ.भा. मराठी नाटयसंमेलनात प्रसन्न भावमुद्रेत अरुण काकडे

एक मे या दिवशी महाराष्ट्र स्थापना दिवसाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

करावे तसेच वसंत नाटय महोत्सव आयोजित करावा आणि राष्ट्रीय पातळीवर मराठीचा झेंडा फडकत ठेवावा.

मित्रांनो, यातले आज काहीही घडत नाही. महाराष्ट्र परिचय केंद्र हल्ली याबाबतीत काय करतेय कुणालाच ठाऊक नाही. २००० सालापासून हे महोत्सव बंद पडलेत. महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होत नाहीत.

साहित्य संमेलनाध्यक्षांना वर्षभर अभ्यास दौ-यासाठी काही रक्कम दिली जाते. त्यात त्यांनी महाराष्ट्रभर फिरून साहित्यिक उपक्रमांचा अभ्यास करावा आणि वर्षाअखेरच्या साहित्य संमेलनाच्या वेळी अभ्यासाचा अहवाल व खर्चाचा हिशोब सादर करावा, अशी योजना आहे. अशाच प्रकारची योजना नाटयसंमेलनाध्यक्षांसाठी असावी असे मला वाटते.
रंगभूमीवरून आपण जेव्हा सृजनप्रवासाला निघतो तेव्हा आपण आत्मशोधाच्या प्रवासाला निघतो. अंगभूत प्रेरणातून आपल्याला प्रेक्षकांना काही दाखवायचे आहे, सांगायचं आहे! त्यांच्याशी रंगसंवाद साधायचा आहे. आपल्यातल्या उर्मीना आविष्कृत करायचे आहे आणि अशा आविष्कारातून प्रेक्षकांना अंतर्मुख करावयाचे आहे. आपला हा आत्मशोध शेवटच्या श्वासापर्यंत चालू असतो. माझ्याबाबतीत असेच घडणार आहे.

बोधी नाटय परिषद

बोधी कला संगिती.. बोधी नाटय परिषदेचे संस्थापक प्रेमानंद गज्वी यांची मते जाणून घेतली. ते म्हणतात ही theatre of knowledgeज्ञान रंगभूमी आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे नाटयलेखन कार्यशाळा आयोजित होतात. मला असं वाटतं बोधी कला संगितीने मूळ धारेत यावे. म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना एक नवीन विचार करणारे नाटक पाहण्याचा योग येईल. मी बोधी नाटयलेखन कार्यशाळेत सामील झालेल्या सिद्धार्थ तांबे यांचे ‘जाता नाही जात’ हे नाटक मूळ धारेतच सादर केलं. प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद लाभला. डॉ. लागूंनीही गज्वीचे नाटक ‘किरवंत’ केलंच ना? बोधी नाटय परिषद अ. भा. मराठी नाटय परिषदेला संलग्न करावी किंवा तसे न करताही मुख्य धारेत तुमची नाटके सादर करा. प्रेक्षकांनाही theatre of knowledgeी ची नाटके पाहण्याची सवय लागेल.

नाटयकला शालेय अभ्यासक्रमात असावी

सरकारने शालेय रंगभूमीचा विचार करून नाटयकलेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा. यासाठी तज्ज्ञांकडून अभ्यासक्रम ठरवावा लागेल. महापालिकेच्या व खासगी शाळांतून हा विषय शिकवला गेला पाहिजे, अशी योजना तयार करावी. त्यासाठी पहिले पाऊल म्हणजे शिक्षकांना नाटय कलेचे शिक्षण द्यावे लागेल किंवा आज निरनिराळ्या विद्यापीठातील नाटय विभागातून प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेल्या कलाकारांच्या अशा शाळांतून नियुक्त्या करण्याचा विचार करावा लागेल. संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांना नाटयकलेचं शिक्षण मिळालं तर त्यांच्याकडून भावी काळात रंगभूमी उजळून निघेल. आणखी एक सूचना आहे. शाळेच्या वार्षिक परीक्षेच्या गुणात जसे खेळाच्या प्रावीण्याबद्दल अधिक गुण मिळवले जातात त्याचप्रमाणे रंगभूमीवर प्रावीण्य मिळवणा-या विद्यार्थ्यांच्या वार्षिक गुणात अधिक गुण मिळवावेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version