Home टॉप स्टोरी राष्ट्रपतींच्या भाजपाला कानपिचक्या

राष्ट्रपतींच्या भाजपाला कानपिचक्या

0

उत्तर प्रदेशातील दादरी प्रकरणाने मोदी सरकारवर समाजाच्या सर्व स्तरातून जोरदार टीका होत असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील दादरी प्रकरणाने मोदी सरकारवर समाजाच्या सर्व स्तरातून जोरदार टीका होत असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. विविधता, एकता व सहिष्णुता या आपल्या सांस्कृतिक मूल्यांमुळेच भारत शेकडो वर्षापासून एकसंध राहिला आहे. या प्रमुख मूल्यांना गमावून चालणार नाही, अशा कानपिचक्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी भाजपाला उद्देशून दिल्या.

ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी लिहिलेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, भारताच्या सांस्कृतिक मूल्यांना धक्का लावण्याचा प्रयत्न करणे अयोग्य आहे. या देशात शेकडो वर्षाच्या सांस्कृतिक परंपरेत विविधता, एकता व सहिष्णुता नांदत आहे. या मूल्यांच्या बळावर हा देश शेकडो वर्षे एकसंध राहिला आहे. भारतीय संस्कृती आणि समाजरचनेचा गाभा असलेल्या या नीतिमूल्यांचा -हास होऊ देता कामा नये.

भारतावर अनेक आक्रमणे झाली, अनेकांनी शेकडो वर्षे भारतावर राज्य केले. तरीही भारतीय संस्कृती अभेद्यपणे त्यातून तावून सुलाखून बाहेर पडली. भारतीय संस्कृतीतील या मूळ मूल्यांमुळेच आपण अभेद्य राहिलो. या बाबीची सर्वानी मनात नोंद घेणे गरजेचे आहे, असा टोला त्यांनी भाजपाचा उल्लेख न करता लगावला. ही बाब सर्वानी लक्षात ठेवल्यास आपली लोकशाही अधिकाधिक विकसित होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.

भाजपा हा द्वेष पसरवणारा पक्ष

बिहार- सत्तेवर येऊन १६ महिने झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. भाजपाला केवळ जातीय तणाव पसरवण्यात रस आहे, असा घणाघाती आरोप कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

बिहार निवडणुकीत बेगुसराई व शेखपुरा येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान मोदी सरकारच्या कारभारावर व भाजपाच्या जातीय राजकारणावर जोरदार टीका केली.  मोदी सतत परदेशांचे दौरे करत असून भारतात त्यांना फिरायला वेळ नाही. अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौ-यात विविध कार्यक्रमांत त्यांनी १६ वेळा कपडे बदलले, अशी टीकाही त्यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version