Home टॉप स्टोरी राम रहीमच्या ‘डे-या’त मोठे घबाड

राम रहीमच्या ‘डे-या’त मोठे घबाड

0

बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात असलेला ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख व स्वयंघोषित बाबा राम रहीम सिंग याच्या कारनाम्यांनी सुरक्षा यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत.

सिरसा- बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात असलेला ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख व स्वयंघोषित बाबा राम रहीम सिंग याच्या कारनाम्यांनी सुरक्षा यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत. हरयाणातील सिरसा इथे असलेला राम रहीमचा मुख्य ‘डेरा’मधील दोन खोल्या भरून रोकड जप्त करण्यात आली आहे. अजूनही डे-याची झाडाझडती सुरूच असून आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.

सुमारे ८०० एकर जमिनीवर पसरलेल्या ‘डेरा’च्या आश्रमात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानुसार, पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची झडती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज सकाळी निमलष्करी दलाची ४१ पथके, लष्कराच्या ४ तुकडय़ा, पोलिसांचा ताफा, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब स्क्वॉडनं डे-यात प्रवेश केला.

जेसीबी मशीन आणि दहा लोहारही सुरक्षा यंत्रणांच्या दिमतीला असून आश्रमात सकाळपासून पाडकाम, खोदकाम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये आतापर्यंत अनेक डोळे दिपवणा-या गोष्टी समोर आल्या आहेत. रामरहीमने गडगंड संपत्ती जमवल्याचे या झडतीतून समोर आले आहे.

टीव्ही लाइव्ह प्रसारणासाठीची ओबी व्हॅन, नंबर नसलेली लेक्सस कार, कोणत्याही कंपनीचा उल्लेख नसलेली असंख्य औषधे सापडली आहेत. त्याशिवाय कम्प्युटरच्या हार्ड डिस्क, मोबाइल, बाबाच्या साम्राज्यात वापरले जाणारे प्लास्टिकचे चलनही आढळले आहे. या समांतर चलनाचा वापर आश्रमातील अंतर्गत गैरव्यवहारांसाठी करण्यात येत असावा, असा संशय आहे. आतापर्यंत पाच खोल्या सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version