Home टॉप स्टोरी राधेमाँवर कारवाई करणे अशक्य

राधेमाँवर कारवाई करणे अशक्य

0

स्वयंघोषित गुरू राधे माँ हिच्या विरोधात अघोरी विद्या व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करणे अशक्य असल्याचे पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले.

मुंबई- स्वयंघोषित गुरू राधे माँ हिच्या विरोधात अघोरी विद्या व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करणे अशक्य असल्याचे पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली अॅड. फाल्गुनी ब्रह्मभट यांनी राधे माँ विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी जोशी-फणसाळकर यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. यात राधे माँ हिच्या विरोधात एकही पुरावा आढळला नसल्याचे पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

बोरिवली पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी मनोहर हिंदळेकर यांनी राधे माँ प्रकरणी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. सिनेकलाकार डॉली बिंद्रा यांच्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला असून ब्रह्मभट आणि इतरांच्या तक्रारीतील माहितीही बिंद्रा यांच्या मूळ तक्रारींशी मिळती-जुळती असल्याने सर्वांच्या तक्रारी एकत्र करण्यात आल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

सर्व तक्रारदार आणि राधे माँ यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदवण्यात आले असून घटनास्थळाचे पंचनामेही केले आहेत. मात्र राधे माँने जादूटोणा कायद्याचा भंग केल्याबाबत कोणताही संशयास्पद अथवा ठोस पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

तक्रारदार, साक्षीदार, संशयित आणि कथित जागेची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच पोलिसांनी आपला हा अहवाल प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर केला आहे.

ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि राधे माँ ची बेहिशेबी संपत्ती बाबत आयकर विभागाला कळवण्यात आले आहे. तसेच राधे माँकडून चालविल्या जाणा-या ट्रस्टमध्ये पैशांचा गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. हा तपास आपल्या अखत्यारित येत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version