Home महाराष्ट्र राज्याला मिळणार अतिरिक्त १.२५ लाख मतदानयंत्रे

राज्याला मिळणार अतिरिक्त १.२५ लाख मतदानयंत्रे

0

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ७,६६६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, अर्जांची छाननी आणि अर्ज मागे घेतल्यानंतर जवळपास चारहजार उमेदवार शर्यतीत रहातील असा अंदाज आहे.

मुंबई – राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ७,६६६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, अर्जांची छाननी आणि अर्ज मागे घेतल्यानंतर जवळपास चारहजार उमेदवार शर्यतीत रहातील असा अंदाज आहे.

उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे मतदान यंत्रांची मागणीही वाढणार आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत ६५९३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जांची छाननी आणि अर्ज मागे घेतल्यानंतर ३५५९ उमेदवारांमध्ये लढत झाली. यावेळी राज्यातील प्रमुख पक्षांमधील युती आणि आघाडी तुटल्यामुळे उमेदवारी अर्जांमध्ये १६ टक्के वाढ झाली आहे.

यंदा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची सरासरी संख्या पंधरापेक्षा जास्त असू शकते. काही मतदारसंघांसाठी दोन किंवा काही ठिकाणी तीन मतदान यंत्रे लागू शकतात असे निवडणूक अधिका-यांनी सांगितले. राज्याकडे स्वत:ची एक लाख दहाहजार मतदान यंत्रे असून, आणखी १.२५ लाख मतदान यंत्रे  अन्य राज्यांकडून घेण्यात येतील असे निवडणूक अधिका-यांनी सांगितले.

एका मतदान यंत्रामध्ये निवडणूक चिन्हासह पंधरा उमेदवारांचा समावेश करता येऊ शकतो. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात ९०,४०३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. मतदान यंत्राबरोबरच निवडणूक आयोग धाड पथकांची संख्याही वाढवणार आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोग सात ते आठ धाड पथके तैनात करतो पण यावेळी उमेदवार संख्या वाढल्यामुळे धाड पथकांची संख्याही वाढणार आहे. निवडणूक निरीक्षकांचे पैसे आणि मद्य वाटपावर बारीक लक्ष असेल.

निमलष्करी दलाच्या ३५ तुकडया मंजूर झाल्या असून, राज्यातील संवेदनशील नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तुकडया तैनात करण्यात येणार आहेत. राज्यात एकाच टप्प्यात १५ ऑक्टोंबरला मतदान होणार असून, १९ ऑक्टोंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version