Home क्रीडा सुधीर नाईक यांना केलेली शिवीगाळ शास्त्रीला भोवणार

सुधीर नाईक यांना केलेली शिवीगाळ शास्त्रीला भोवणार

0

पाचव्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेक़डून झालेल्या मानाहानीकारक पराभवासाठी संघ संचालक रवी शास्त्री यांनी पिच क्युरेटरला जबाबदार धरले आहे.

मुंबई – वानखेडे स्टेडियमवरील पाटा खेळपट्टीवरून क्युरेटर सुधीर नाईक यांना केलेली शिवीगाळ भारताचे संघ संचालक (टीम डायरेक्टर) रवी शास्त्री यांना भोवण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नाईक यांनी तक्रार दाखल केल्याने शुक्रवारी (३० ऑक्टोबर) होणा-या एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करणार असल्याचे एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी आणि उन्मेश खानविलकर यांनी मंगळवारी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेच्या डावानंतर खेळपट्टीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना शास्त्री यांनी अपशब्द वापरले. गोलंदाजी प्रशिक्षक बी. अरुण यांनी माझे सहकारी म्हामुनकर यांना लक्ष्य केले, असे एमसीएचे क्युरेटर (खेळपट्टी बनवणारे) सुधीर नाईक यांनी एमसीएकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, सुधीर नाईक यांनीही शास्त्री यांना जशास तसे उत्तर दिल्याचे समजते.

पाचव्या वनडेतील गोलंदाजांच्या धुलाईचे खापर शास्त्री यांनी खेळपट्टीवर फोडले आणि नाईक यांना उद्देशून अपशब्द वापरले. शास्त्री यांच्या शिवीगाळीची दखल एमसीएपूर्वी बीसीसीआयनेही घेतली आहे. ‘‘शास्त्रींनी नाईक यांना केलेल्या शिवीगाळीप्रकरणाची दखल बीसीसीआयने घेतली आहे. विश्वचषकापूर्वी पर्थमध्ये भारतीय पत्रकाराला उद्देशून अपशब्द वापरल्यानंतर आम्ही जे केले, तेच करू,’’असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

माजी कसोटीपटू आणि क्रिकेट समालोचक संजय मांजरेकरनेही शास्त्री यांच्या वागण्यावर आक्षेप नोंदवला आहे. ‘‘सुधीर नाईक यांना उद्देशून अपशब्द वापरण्यापूर्वी शास्त्री यांनी त्यांचे योगदान आणि वयाचा मुलाहिजा बाळगायला हवा होता. त्यांच्यासारख्या व्यक्तीला असे वागणे अशोभनीय आहे,’’ असे मांजरेकरने म्हटले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version