Home महामुंबई ठाणे रणरागिणींचा डोंबिवलीत रेल रोको!

रणरागिणींचा डोंबिवलीत रेल रोको!

0

सिग्नल यंत्रणेत बिघाड, पेंटोग्राफला आग असे प्रकार सातत्याने होत असताना रेल्वेचे नवे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून उपनगरीय लोकलसेवा उशिराने धावत आहेत.

डोंबिवली – सिग्नल यंत्रणेत बिघाड, पेंटोग्राफला आग असे प्रकार सातत्याने होत असताना रेल्वेचे नवे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून उपनगरीय लोकलसेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळी कार्यालय गाठण्याच्या घाईत असलेल्या नोकरदारांची तारांबळ उडत आहे.

याचा निषेध नोंदवत महिला प्रवाशांनी आंदोलन केले. बुधवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी रेल्वे रुळावर बसकण मारून पंधरा मिनिटे लोकल रोखून धरली.

डोंबिवली रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक पाचवरील १०.३४ मिनिटांची जलद लोकल पकडण्यासाठी प्रवासी रेल्वे फलाटावर उभे होते. १०. ५० झाल्यानंतरही लोकल रेल्वे स्थानकात आली नसल्याने आणि रेल्वे प्रशासनाकडून लोकलबाबत कोणतीही सूचना मिळत नसल्याने प्रवासी संतप्त झाले.

दररोज लोकल वेळेवर येत नसल्याने संतप्त महिला प्रवासी रेल्वे रुळावरच उतरल्या. तब्बल १५ मिनिटे उशिराने लोकल आल्याने रेल्वे रुळांवर उतरलेल्या महिलांनी लोकल रोखून धरली. त्यावेळी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. महिला प्रवाशांचे अचानक झालेल्या आंदोलनामुळे रेल्वे पोलीस आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

रेल्वे स्टेशनमास्तर यादव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी तातडीने धाव घेऊन महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. उद्यापासून वेळेत लोकल वेळेवर धावेल, असे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

लोकलसेवा वेळेवर धावत नाहीत, या संदर्भात रेल्वे विभागीय प्रबंधक मुकेश निगम यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. महिलांना रेल्वे रुळावर उतरावे लागल्याने रेल्वे प्रशासनाने बोध घ्यावा, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version