Home महामुंबई ठाणे रक्तचंदनाच्या तस्करीचे धागेदोरे गुजरातपर्यंत

रक्तचंदनाच्या तस्करीचे धागेदोरे गुजरातपर्यंत

0

कर्जत तालुक्यातील नारळेवाडी येथील राजू फार्ममधून ताब्यात घेण्यात आलेले रक्तचंदन रविवारी दुपारी वनविभागाच्या डेपोमध्ये हलवण्यात आले.

नेरळ- कर्जत तालुक्यातील नारळेवाडी येथील राजू फार्ममधून ताब्यात घेण्यात आलेले रक्तचंदन रविवारी दुपारी वनविभागाच्या डेपोमध्ये हलवण्यात आले. नेरळ पोलिसांचे पथक या प्रकरणी मुंबई आणि गुजरातमध्ये तपासासाठी रवाना झाले आहे.

चोरीला गेलेल्या कंटनेरमधून राज्यात तोडीसाठी बंदी असलेल्या रक्तचंदनाची तस्करी करण्याचा प्रयत्न कर्जत तालुक्यातील नारळेवाडी येथील राजू फार्ममध्ये सुरू होता. कंटेनरमध्ये रक्तचंदनाचे ओंडके भरले जात असताना पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने छापा टाकला. या छाप्यात १० टन रक्तचंदन हस्तगत करण्यात आले.

या कारवाईवेळी राजू फार्मचा मालक अकबर हुसेन, त्याचा मित्र शब्बीर खान आणि समीम खान हुसेन पठाण व त्यांचे साथीदार वाहनातून पळून गेले. मात्र, पोलिसांनी गुजरात पासिंग असलेली कार ताब्यात घेतली. या प्रकरणी पोलिसांनी रशीद खान पठाण या कारचालकाला ताब्यात घेतले. तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने ही गुजरात आणि पाँडेचेरी भागातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कंटेनरमध्ये २८० आणि राजू फार्ममधून ४० रक्तचंदनाचे ओंडके पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी सकाळी हे रक्तचंदन नेरळ पोलीस स्थानकाच्या प्रांगणात ठेवण्यात आले. त्यावर वनविभागाचे शिक्के मारण्यात आले व नंतर कळंबजवळील पोही येथील वनविभागाच्या गोदामात हे रक्तचंदन नेण्यात आले.

या ठिकाणी वन अधिकारी आर. बी. घाडगे, वनपाल योगेश महाजन, सचिन धिंदले, वनरक्षक पात्रे, कातकडे, केरे तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, उपनिरीक्षक मुकुंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत गोदाम सील करण्यात आले.

पोलीस आणि वनविभागाने केलेल्या या कारवाईत १५ लाख किमतीचा कंटेनर, कार, तीन कोटी २० लाखांचे रक्तचंदन ताब्यात घेण्यात आले. या राजू फार्ममधून अनेकदा कंटेनरची ये-जा येथील स्थानिकांनी पाहिली आहे. त्यामुळे या बाबत सखोल तपास होण्याची गरज आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version