Home महाराष्ट्र येळकोट येळकोट जय मल्हार!

येळकोट येळकोट जय मल्हार!

0

‘येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट’चा जयघोष करत भंडारा व खोब-याची मुक्त उधळण करत राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील कोरठण खंडोबाच्या यात्रेत दुस-या दिवशी चार लाख भाविकांच्या मांदियाळीत खंडोबाचा पालखी सोहळा रंगला.

नगर- ‘येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट’चा जयघोष करत भंडारा व खोब-याची मुक्त उधळण करत राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील कोरठण खंडोबाच्या यात्रेत दुस-या दिवशी चार लाख भाविकांच्या मांदियाळीत खंडोबाचा पालखी सोहळा रंगला.

पिंपळगाव रोठा येथे कोरठण खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. राज्यातील लाखो भाविकांचे हे कुलदैवत असून; नगर जिह्यातील यात्रोत्सवाला प्रथम याच यात्रेने प्रारंभ होत असल्याने यात्रेला विशेष महत्त्व आहे.

सोमवारी पहाटेपासून यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर सकाळी चांदीच्या सिंहासनाचे व उत्सव मूर्तीचे अनावरण होऊन भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.

सोमवारी दुस-या दिवशीची पूजा पाहटे पारनेरच्या गटविकास अधिकारी राणी फराटे व मदन फराटे या दाम्पत्याच्या हस्ते महाभिषेक झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या.

दिवसभर तळी भांडार व देवदर्शन चालू असताना सुमारे पाच ते सहा लाख भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ व ‘सदानंदांचा यळकोट, कोरठण खंडोबाच्या नावानं चांगभलं’ या जय घोषाने खंडोबानगरी दुमदुमली होती.

पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे, तहसीलदार भारती सागरे यांनी यात्रेची पाहणी केली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे, आमदार सीताराम मामा घनदाट, पंचायत समिती सदस्य भास्कर शिरोळे यांनी देवदर्शन घेतले.

तर अनेक शेतकरी, भक्तांनी आपले बैल देवदर्शनाला आणले होते. पारनेर, शिरूर, जुन्नर आगाराने जादा ४० बसची व्यवस्था केल्याने भाविकांची सोय झाली. यात्रेच्या नियोजनासाठी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यांच्यासह विश्वस्त, ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

रात्री पिंपळगावरोठा गावात मुक्कामी असलेली खंडोबाची पालखी व छबीना मिरवणुकीने सकाळी ११ वाजता कोरठण खंडोबा मंदिराकडे येत असताना रस्ता गर्दीने फुलून गेला होता.

शेकडो युवक व खंडोबाची गीते म्हणणा-या महिलांमुळे वातावरण भक्तिमय बनले होते. देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यांनी पालखी सोहळा मंदिराच्या पायरीनजीक आल्यावर पालखी मानकरी व उपस्थितांचा गौरव केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version