Home कोलाज या सम हाच

या सम हाच

0

गोकुळ अष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती अलीकडेच साजरी करण्यात आली. हा उत्सव आला की श्रीकृष्णाविषयी असलेल्या अनेक भाव-भावनांची गाणी आसमंतात निनादू लागतात.

‘‘किती सांगू मी सांगू कुणाला।
आज आनंदी आनंद झाला।
आज आनंदी आनंद झाला।।
आज गोकुळात रंग खेळतो हरी।
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी।।’’

गोकुळ अष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती अलीकडेच साजरी करण्यात आली. हा उत्सव आला की श्रीकृष्णाविषयी असलेल्या अनेक भाव-भावनांची गाणी आसमंतात निनादू लागतात. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी आपलं सांस्कृतिक जीवन व्यापून टाकलं आहे.

वैयक्तिक चारित्र्य रामासारखं असावं. मात्र व्यवहारात, प्रपंचात श्रीकृष्णाचं अनुकरण करावं असं म्हणतात. श्रीराम सत्यवचनी होता, तर श्रीकृष्ण सत्य प्रस्थापित करणारा होता. रामाला एक रावण मारावा लागला, तर श्रीकृष्णाने अखेपर्यंत चोहीकडे पसरलेल्या रावण प्रवृत्तीशीच युद्ध केलं. सज्जनांवर झालेले अन्याय आणि ते अन्याय करणा-यांचे अपराध ठळकपणे जगासमोर येणं हे श्रीकृष्णनीतीचं मुख्य सूत्र होतं.

श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं. श्रीकृष्ण पूर्णावतार समजला जातो. श्रीकृष्णाचं चरित्र हे एक कृतीशील चरित्र आहे. नीतीतत्त्वाच्या मागे प्रबळ मन आणि कृतिशूर मनगट म्हणजे कृतीला शौर्याची जोड हे श्रीकृष्णाच्या जीवनकार्याचं वैशिष्टय़ आहे. म्हणूनच त्याने नुसता संख्येला भाळणारा नव्हे तर प्रशिक्षित असा लोकसंग्रह केला. समर्थ म्हणतात,

‘सकळ लोक एक करावे।
शक्तीबुद्धीने भरावे।
बळे करूनी पसरावे।
म्लेंच्छावरी।।

हेच त्याचं तत्त्वज्ञान होतं. हे तत्त्वज्ञान तो जगाला कधी शक्तीने, कधी युक्तीने, कधी छळाने, कधी कपटाने त्याने आपल्याभवती असलेल्या सर्व दुष्ट शक्तींना आपला हिसका दाखवला. असे अनेक प्रसंग, अनेक कथा आपल्याला श्रीकृष्ण चरित्रात दिसतात.

श्रीकृष्णाचं बाळकृष्ण स्वरूप हा त्याच्या चरित्रातला पहिला अंक आहे. हे चरित्र खूप रसाळपणे गाईले जाते. त्याच्या बाललीला गाताना कवींच्या काव्यांना भावार्थाचा मोहोर येतो. कल्पनांचे मोर पिसारा फुलवून नाचू लागतात. रसकोकिळा आनंदाने कुहुकुहु करू लागतात. काव्यसृष्टीच रोमांचित होते. जन्माने आंधळा असलेला सूरदास त्या शामसुंदराला पाहण्यासाठी डोळस झाला आणि म्हणू लागला.

मैया मोरी मैं नही माखन खायो।
चार पहर बंसीवर भटक्यौ।
सांझ परे घर आयो।।

तर ‘मै तो हरिचरणकी दासी’ असं म्हणणा-या मीरेचे आणि सूरदासाचे अनुकरण करीत शेकडो कवींच्या कल्पना श्रीकृष्णाच्या बाललीलेवर लुब्ध झाल्या. मराठी संतांनीही आपली रांगडी भाषा मऊ केली, संतवाणी म्हणते,

घेऊनिया चक्रगदा।
हाची धंदा करितो।
भक्ता राखी पायापाशी।
दुर्जनासी संहारी।।

बालपणी सर्व गोकुळवासीयांना त्याने आपल्या रूपा-गुणाने मोहून टाकलं. त्यांच्यावर गारूड केलं. आलेल्या संकटांशी दोन हात केले. सर्व सवंगडय़ांशी प्रेमाने बरोबरीच्या नात्याने वागला. त्यांच्या घासातला घास खाल्ला. गोप-गोपींसह रास खेळला. पण कंसाच्या निमंत्रणामुळे जेव्हा तो गोकुळाच्या बाहेर पडला त्यानंतर एकदाही परत गोकुळात गेला नाही.

समाजधारणेसाठी चारी वर्णाची आवश्यकता आहे हे श्रीकृष्णाने स्वत:च्या वागण्यातून सिद्ध केले. सांदिपनी ऋषींच्या आश्रमात वेदाध्ययन करून ब्राह्मण्याची दीक्षा घेतली. वेळोवेळी अनेक युद्धे करून क्षत्रिय धर्म आचरणात आणला. गोकुळ वृंदावनातला दही-दुधाचा व्यापार म्हणजे वैश्यवृत्तीच होती. प्रथम स्वत:चे पाय धुवून घेण्याची योग्यता असतानाही राजसूय यज्ञात ब्राह्मणांचे पाय धुण्याची कामगिरी अंगावर घेतली.

स्वत: उत्तम योद्धा असूनही कौरव-पांडव युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले. त्यावेळी सारथी झालेल्या श्रीकृष्णाची सावधानता युद्धाच्या प्रसंगी अनेक वेळा रक्षण करताना दिसते. युद्धात जेव्हा अर्जुनाच्या बुद्धीवर भावनांनी ताबा मिळवल्याचे लक्षात आले, तेव्हा त्याची आत्मशक्ती जागृत केली. श्रीकृष्णाच्या अखंड सावधानतेचे कवच पांडवांच्या भोवती नसते तर पांडव विजयी झाले नसते.

महाभारत हा जय नावाचा इतिहास आहे. त्यात अनेक पात्रे असली तरी त्यातला मुख्य नायक हा श्रीकृष्णच आहे. त्याला हा संहार घडवायचाच होता. ‘विनाशायच दुष्कृताम्’ हे त्याचं ब्रीद होतं. ‘ऐश्वर्य, धर्म, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य’ हे महानतेचे सहा गुण भारतीय संस्कृती मानते. या सहाही गुणांनी श्रीकृष्ण चरित्र ओतप्रोत परिपूर्ण आहे.

निष्ठांचं पूर्णत्वही भारतीयांना फार महत्त्वाचं वाटतं. श्रीकृष्ण चरित्रात धर्मनिष्ठा, राजनिष्ठा, समाजनिष्ठा, स्त्रियांविषयी मधुर आणि आदरनिष्ठा आणि प्रखर ज्ञाननिष्ठा यांचं दर्शन घडतं. श्रीकृष्णाचं अद्भुत चरित्र हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्वार्ध आहे. पण त्या व्यक्तिमत्त्वाचं विराट विश्वरूपदर्शन रणांगणावर श्रीमद् भगवद् गीतेच्या रूपानं चिरंजीव ठरलं आहे.

‘गीता नोहे शास्त्र। हे तो संसार जिणते शस्त्र’ असं श्री ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे आज एकविसाव्या शतकातही जगण्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानाने केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक विचारवंतांना, अभ्यासकांना प्रभावित केले आहे.

एकाच कृतीतून अनेक गोष्टी साधणे हे श्रीकृष्णाचे वैशिष्टय़ होते. साधनशुचितेचा अतिरेक न करता ज्याचा परिणाम अनिष्ट होतो, त्या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी योग्य नसतात. म्हणून विश्वकल्याणासाठी अनेक प्रसंगी श्रीकृष्णाने ‘साम, दाम, दंड, भेद’ अशा सर्व प्रकारच्या नीतीचा उपयोग केला.

प्रत्येक आव्हानाचे रूपांतर संधीत करून ती पुरेपूर उपयोगात आणली. आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करत असताना इतरांना सुखी करणे हे त्याच्या तत्त्वज्ञानाचे सूत्र आहे. म्हणून काव्यगत, शिल्पगत, चित्रगत, भूमिगत अशा अनेकविध स्वरूपात प्रकट झालेल्या या श्रीकृष्णाविषयी म्हणावंसं वाटतं, ‘या सम हाच.’

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version