Home महामुंबई म्हाडाचा पणन विभाग एकत्र येणार!

म्हाडाचा पणन विभाग एकत्र येणार!

0

म्हाडाच्या पणन विभागाच्या परिसरातील दलालीवर नजर ठेवण्यासाठी तळमजल्यावर असलेला हा विभाग पहिल्या मजल्यावर एकत्रित आणला जाणार आहे.

मुंबई- म्हाडाच्या पणन विभागाच्या परिसरातील दलालीवर नजर ठेवण्यासाठी तळमजल्यावर असलेला हा विभाग पहिल्या मजल्यावर एकत्रित आणला जाणार आहे. येत्या काही दिवसांत हा बदल होणार असल्याने लाभार्थ्यांची खालून वर व वरून खाली अशी धावपळ थांबणार आहेच; पण दलालांच्या तावडीतूनही सुटका होणार आहे.

म्हाडातील पणन विभाग अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो. सोडत, घरांचा ताबा प्रक्रिया आदी महत्त्वाची कामे या विभागामार्फत केली जातात. त्यामुळे या विभागात लाभार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते.

पणन विभागाची कार्यालये तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर आहेत. हे विभाग एकत्रित नसल्याने आतापर्यंत लाभार्थ्यांना फाइली हातात घेऊन खाली-वर धावपळ करावी लागते. या विभागाच्या परिसरात दलालांचा राबता असल्याने त्यांना दलाली करण्यास ब-यापैकी वाव मिळतो. दोन्ही विभागांकडे धावपळ करणा-या लाभार्थ्यांचीही तारांबळ उडत असल्याने हे कामकाज एकत्रित असेल तर नीटपणे नजर ठेवता येऊ शकते. शिवाय खालून वर वरून खाली फाइल नाचवण्यात लागणारा वेळही वाचू शकेल, असा म्हाडाने विचार केला आहे.

सध्या निवडणुका असल्याने म्हाडात वर्दळ कमी आहे. त्यामुळे म्हाडाने पहिल्या मजल्यावर कार्यालयाची डागडुजी करणे सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत तळमजल्यावरील सर्व कागदपत्रे पहिल्या मजल्यावर हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. म्हाडाने दलालीला चाप लावण्यासाठी कार्यालयाच्या सर्व मजल्यावर व परिसरात सीसीटीव्ही कॅमे-यांचे जाळे तयार केले आहे. कार्यालयातील रचनात्मक बदलही करण्यात येत असल्याने यापुढे दलालीला चाप बसणार आहे.

पणन विभागाचे एकाच मजल्यावर कामकाज असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे येथील हालचाली टिपतील, या भीतीने दलालांची नाकेबंदी होणार आहे.

कर्मचारी, अधिका-यांना समन्वय करता येईल. तसेच निर्णय प्रक्रियाही तातडीने होईल, असे म्हाडाला वाटते आहे. दोन महिन्यांपूर्वी तळमजल्यावर असलेल्या पणन विभागातील एका महिला कर्मचा-यावरील लाच प्रकरणाच्या आरोपानंतर म्हाडाने येथील कर्मचा-यांत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला होता. हेही कारण विभाग एकत्रित आणण्याचे असू शकते. या बदलांमुळे मात्र म्हाडाच्या कार्यालयात कामासाठी येणा-या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version